Homeहेल्थ इज वेल्थसध्याच्या लसी कोविडच्या...

सध्याच्या लसी कोविडच्या डेल्टा प्रकारावर प्रभावी!

सर्वसामान्यपणे डेल्टा प्लस म्हटला जाणारा कोरोनाचा B.1.617.2.1 प्रकार अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40 ते 60 टक्के अधिक संक्रमणकारी आहे. ICMRने याविषयी हाती घेतलेल्या अभ्यासानुसार, सध्याच्या लसी डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी कार्य करतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी लस घेतली आणि कोविडयोग्य वर्तणुकीचे पालन केले तर भविष्यकाळात येणाऱ्या लाटा नियंत्रित तसेच प्रलंबित करता येतील, असे INSACOGचे सहअध्यक्ष  : डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे.

INSACOG अर्थात द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टीयमचे सहअध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांच्या चाचण्या आणि नंतरचा पाठपुरावा यासाठी आखून दिलेल्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SOP), डेल्टा प्रकाराला मोठ्या प्रमाणात संक्रमणकारी करण्यासाठी कारणीभूत घटक, त्याचा प्रसार रोखण्यासाठी जनुकीय परीक्षणाचा उपयोग याबद्दल नुकतीच तपशीलवार माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचा हा गोषवारा..

INSACOG, हा कोविड-19 महामारीच्या संदर्भात विषाणूच्या संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेला भारत सरकारचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ यांच्या 28 प्रयोगशाळांचा संघ आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 25 डिसेंबर 2020ला INSACOG ची स्थापना केली.

नुकताच INSACOG चा विस्तार करण्यात आला. या विस्तारामागे कोणता विचार आहे?

या विषाणूची चिंताजनक रूपे आणि संसर्गाचा प्रसार यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा अधिक मोठ्या क्षेत्रावर फैलाव होण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळविता येईल. डिसेंबर 2020मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या संघात 10 प्रयोगशाळांचा समावेश होता. मात्र नुकत्याच आणखी 18 प्रयोगशाळा या संघात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

SARS-CoV-2च्या विषाणूचा जनुकीय परीक्षणात्मक अभ्यास करणे आणि संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणाची हाती आलेली माहिती, वैद्यकीय तसेच साथरोगविषयक उपलब्ध आकडेवारी यांचा एकमेकांशी परस्परसंबंध जोडून विषाणूचे हे प्रकार अधिक संक्रमणकारी आहेत की नाहीत, ते सामान्य प्रतिकारशक्तीवर मात करू शकतात का किंवा तीव्र संसर्ग करू शकतात का, लसीच्या प्रभावाला खिंडार पाडू शकतात का आणि सध्याच्या निदानविषयक चाचण्यांचा वापर करून त्यांचा संसर्ग निश्चित करता येऊ शकतो का हे पाहण्यासाठी प्रयोगशाळांचे  सशक्त जाळे निर्माण करणे हा या विस्तारामागचा उद्देश होता.

त्यानंतर NCDC अर्थात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र या माहितीचे विश्लेषण करते. संपूर्ण देशाचे अनेक भौगोलिक विभाग पाडण्यात आले असून प्रत्येक प्रयोगशाळेकडे एका विशिष्ट विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही एकूण 180 ते 190 समूह तयार केले आहेत आणि प्रत्येक समूहात सुमारे 4 जिल्हे समाविष्ट केले आहेत. नियमित स्वरुपात तपासणीसाठी घेतलेले नमुने आणि ज्यांच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे, तीव्र संसर्ग झाला आहे आणि इतर अनेक वेगळी वैद्यकीय लक्षणे आहेत अशा रुग्णांचे नमुने गोळा करून क्रमनिर्धारणासाठी प्रादेशिक प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. देशातील प्रयोगशाळांची जनुकीय क्रमनिर्धारणाची सध्याची क्षमता आता प्रतिमास 50,000 नमुने इतकी आहे. यापूर्वी प्रतिमास 30,000 नमुने तपासण्याची त्यांची क्षमता होती.

कोविड

विषाणूच्या विविध रूपांची चाचणी करून मागोवा घेण्यासाठी देशात कोणत्या प्रकारची यंत्रणा उपलब्ध आहे?

भारतामध्ये एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाची (IDSP) उत्तम प्रकारे स्थापित यंत्रणा आहे. नमुने गोळा करणे आणि विविध जिल्हे किंवा संरक्षणात्मक ठिकाणांहून प्रादेशिक जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांकडे (RGSL) पाठविणे यातील समन्वय साधण्याची जबाबदारी IDSP पार पाडते. चिंताजनक रूपे (VoC) आणि विषाणूंची दखलपात्र रूपे (VoI) तसेच धोकादायक दखलपात्र रूपे आणि उत्परिवर्तन झालेली इतर रूपे यांचे जनुकीय क्रम निर्धारण निश्चित करणे आणि ओळख पटविणे यासाठी RGSLs जबाबदार असतात. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC) यांच्याबाबतची माहिती थेट केंद्रीय तपासणी विभागाकडे सादर केली जाते जेणेकरून, राज्य तपासणी अधिकाऱ्याशी समन्वय साधून या नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध निश्चित करता येतील. हे नमुने नंतर नियुक्त जैव-बँकेकडे पाठविले जातात.

सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाच्या अशा जनुकीय उत्परिवर्तनाची ओळख निश्चित झाल्यानंतर RGSLs ही माहिती शास्त्रीय आणि वैद्यकीय सल्लागार गटाकडे (SCAG) सादर केली जाते. विषाणूच्या महत्त्वाच्या धोकादायक रूपांविषयी तसेच इतर उत्परिवर्तनीय रूपांविषयी SCAGमध्ये चर्चा केली जाते आणि गरज वाटली तर ते नमुने अधिक तपासणीसाठी केंद्रीय तपासणी विभागाकडे पाठविले जातात.

संबंधित माहिती आणि नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध NCDCचा भाग असलेल्या IDSPकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ यांना, जैवतंत्रज्ञान विभागाला आणि संबंधित राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येते.

शेवटी, विषाणूची नवीन उत्परिवर्तित रूपे, चिंताजनक रूपे यांचे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते, त्यांचा शास्त्रीय अभ्यास हाती घेऊन या रूपांची संसर्ग करण्याची क्षमता, विषारीपणा, लसीची या रूपांच्या बाबतीत परिणामकारकता आणि या रूपांचे प्रतिकारशक्तीला चकवा देण्याचे गुणधर्म याबाबत अधिक माहिती मिळविली जाते. 

जगाच्या चिंतेचा विषय म्हणून डेल्टा रूपावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकाराला इतके गंभीर का म्हटले जाते?

B.1.617.2 म्हणजे डेल्टा हे कोविड-19 विषाणूचे एक रूप आहे. ऑक्टोबर 2020मध्ये भारतात सर्वात प्रथम या प्रकाराचा शोध लागला आणि हा प्रकार भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार मानला जातो. नव्या रुग्णांपैकी 80% रुग्ण विषाणूच्या याच प्रकाराने बाधित झालेले दिसून आले. या रूपाचा उगम महाराष्ट्रात झाला आणि त्याने उत्तरेला, देशाच्या पश्चिम भागाला धरून वाटचाल केली आणि नंतर देशाच्या मध्यवर्ती आणि पूर्वेकडील देशांमध्ये त्याचा संसर्ग आढळून आला.

या विषाणूच्या पृष्ठभागावरील टोकदार भागातील प्रथिनांमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे ते विषाणूला पेशीच्या पृष्ठभागावरील ACE2 रिसेप्टर्सशी अधिक घट्टपणे बांधून ठेवतात. त्यामुळे त्याचे अधिक उत्तम संक्रमण होते आणि हा विषाणू मानवी प्रतिकारक्षमतेला चांगल्या प्रकारे चकवा देऊ शकतो. कोरोना विषाणूच्या पूर्वी प्रचलित असलेल्या अल्फा प्रकारापेक्षा हा डेल्टा प्रकार 40 ते 60 टक्के अधिक संक्रमणकारी आहे आणि आता तो युनायटेड किंगडम, अमेरिका आणि सिंगापूरसह जगातील 80हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे.

कोविड

विषाणूच्या इतर रुपांपेक्षा डेल्टा अधिक गंभीर आजाराला कारणीभूत आहे का?

डेल्टा प्रकारामध्ये झालेली काही उत्परिवर्तने अनेक केंद्रबिंदू असलेला प्रजीव समूह निर्माणकारी  शकतात असे अभ्यासाअंती दिसून आले आहे. त्याशिवाय, मनुष्य पेशीवर हल्ला केल्यावर तो वेगाने स्वतःची प्रतिरूपे तयार करतो. त्यामुळे फुफ्फुसांसारख्या अवयवांमध्ये शक्तिशाली दाह निर्माण होतो. मात्र, डेल्टा प्रकाराने अधिक गंभीर आजार होतो असे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. या प्रकाराने  भारतात, दुसऱ्या लाटेमुळे बाधित वयोगट आणि मृत्यू यांचे एकूण चित्र पहिल्या लाटेसारखेच आहे.

डेल्टा प्रकारापेक्षा डेल्टा प्लस प्रकार अधिक धोकादायक आहे का?

डेल्टा प्लस रूपाचे AY.1 आणि AY.2 हे प्रकार आतापर्यंत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमधील 55 ते 60 रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. नेपाळ, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, पोलंड  आणि जपान या देशांमध्ये AY.1 हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून आला असून त्यामानाने AY.2  हा प्रकार कमी वेळा दिसून आला आहे.

विषाणूच्या डेल्टा रुपाविरुद्ध लस प्रभावीपणे कार्य करते का?

होय. सध्या देण्यात येणाऱ्या लसी डेल्टा प्रकारांविरुद्ध प्रभावी असल्याचे ICMRने यासंदर्भात केलेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे.

देशाच्या काही भागांत अजूनही बाधितांमध्ये वाढ दिसून येत आहे. असे का?

देशाच्या बहुतेक भागात आता कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. काही भागांमध्ये, विशेषतः ईशान्येकडील भागात आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये चाचण्यांचे पॉझिटीव्हिटी दर जास्त दिसत आहेत, त्यापैकी बरेचसे डेल्टा रूपाने बाधित असू शकतील असे आहेत.

कोरोनाच्या भविष्यातील लाटा थांबविता येतील का?

हा विषाणू संवेदनक्षम आणि संसर्गाची जास्त प्रमाणात शक्यता असलेल्या लोकांना बाधित करतो. लोकसंख्येचा मोठा भाग बाधित केल्यावर या विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसतो. मात्र, कोविड झाल्यामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर तो पुन्हा हल्ला करतो. विष्णूच्या अधिक संसर्गक्षम प्रकारांची निर्मिती झाली तर बाधितांची संख्या वाढते. याचाच अर्थ असा की, लोकसंख्येचा मोठा भाग या विषाणूच्या ज्या रूपाप्रती अधिक संवेदनशील आहे त्या रूपाने हल्ला केला तर पुढची लाट येणे क्रमप्राप्त आहे.

दुसरी लाट अजून ओसरली नाही. अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या लक्षणीय भागाचे लसीकरण होईपर्यंत सर्वांनीच कोविडयोग्य वर्तणुकीचे आचरण केले तर भविष्यात येणाऱ्या लाटांवर नियंत्रण मिळविता येईल आणि त्या थोपविता येतील. कोविड-19 संसर्गाला थांबविण्यासाठी लोकांनी लसीकरण करून घेणे आणि कोविडयोग्य वर्तणुकीचे आचरण करणे आवश्यक आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content