Friday, November 22, 2024
Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे, अजितदादांकडून...

उद्धव ठाकरे, अजितदादांकडून नाना पटोलेंवर पाळत?

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतला पेच अधिकच गडद होऊ लागला असून सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाळत ठेवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच हा आरोप केल्याने आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वतः नाना पटोले यांनी यावर नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादीकडून याला देण्यात उत्तरामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्तेत आल्यापासून काँग्रेसला पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न सत्तेतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. १०० युनिटपर्यंतच्या मोफत विजेचा प्रश्न असो किंवा पदोन्नतीतले आरक्षण असो, काँग्रेस यामध्ये तोंडावर आपटली आहे. मराठा समाजासाठी कार्यरत असलेली सारथी संघटनाही काँग्रेसला सोडावी लागली. अशा सर्व विषयांची जंत्री सध्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चिली जात आहे. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सत्तेतल्या वाट्याबद्दल काँग्रेस जरा जास्तच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

आपल्यावर पाळत ठेवली जाते

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागताच काँग्रेसने स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली. काँग्रेसच्या या भूमिकेला छेद देताना पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला. परंतु काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. लोणावळ्यात तर पक्षाच्या एका शिबिरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. त्यांनी स्वबळाची भाषा केली तर चालते, मात्र आम्ही केली तर चालत नाही, असे ते म्हणले. पुण्यात बारामतीचे पालकमंत्री आहेत. पण एकतरी काम होते का? पुढच्यावेळी येथे आपला, आपल्या पक्षाचा पालकमंत्री बसला पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सुरक्षाव्यवस्था नको असल्यास तसे सांगा

शरद पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी लहान माणसांच्या म्हणण्यावर आपण प्रतिक्रिया देत नसल्याचे सांगत नाना पटोले यांना उडवून लावले. याच शिबिरात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोलिसांकरवी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला. त्यानंतर मात्र राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पटोले यांच्यावर पलटवार करताना ते पुरेशा माहितीअभावी असा आरोप करत असल्याचे सांगितले. त्यांन तसेच काँग्रेसचे मंत्री व नेते यांना सुरक्षाव्यवस्था नको असल्यास त्यांनी तसा अर्ज द्यावा. सुरक्षाव्यवस्थेच्या माध्यमातून पाळत ठेवली जात नाही, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी व शिवसेनेला भरले कापरे

नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे राष्ट्रवादी तसेच शिवसेनेला कापरे भरले आहे. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी. परंतु ती नेमकी कशी ठेवली जात व नेमकी का ठेवली जात आहे ते पटोले स्वतःच सांगू शकतील, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मग महाराष्ट्र कसा विश्वास ठेवणार?

महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकमेकांवर किती विश्वस ठेवतात हे नाना पटोले यांच्या आरोपांवरून दिसून आले आहे. जर या तीन पक्षांच्या नेत्यांचा एकमेकांवर विश्वास नसेल तर महाराष्ट्रातली जनता यांच्यावर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

नानांनी केली सारवासारव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रसिद्धीमाध्यमांशी भाष्य केले नसले तरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून सुरूंग लावला जात असल्याची भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तियांकडे बोलून दाखविल्याचे समजते. या साऱ्या घडामोडींनंतर नाना पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही आणि जे काही असतील ते आम्ही चर्चेने सोडवू. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी आपण केव्हाही चर्चा करू शकतो, असे सांगत त्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content