Homeडेली पल्सजहांगीर आर्ट गॅलरीत...

जहांगीर आर्ट गॅलरीत अनुभवा रंगलेपनातील चित्राविष्कार!

चित्राविष्कार

चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या ‘मंत्राक्षरे’ आणि चित्रकार सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील चित्रकृतींचे एकत्रित प्रदर्शन सध्या मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी (फोर्ट) येथे सुरू आहे. रंगलेपनातील हा चित्राविष्कार सोमवार, १ जानेवारी २०२४ पर्यंत कलारसिकांना अनुभवता येणार आहे.

चित्राविष्कार

सुभाष जमदाडे आणि सुरेश गोसावी यांनी आपल्या कलाशिक्षणाची सुरुवात पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून केली. याआधी दोघांचीही अनेक एकल प्रदर्शने पुणे व मुंबई येथे झाली होती. मात्र, मुंबईत अशाप्रकारचे एकत्रित चित्रप्रदर्शन पहिल्यांदाच या दोन्ही ख्यातनाम चित्रकारांनी भरविले आहे. त्याचा कलानुभव घेण्याची उत्तम संधी यानिमित्ताने रसिकांना लाभली आहे.

चित्राविष्कार

सुभाष जमदाडे सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर सुलेखनातून चित्रकृती (पेंटिंग) साकारण्याचे कलाप्रयोग ते सातत्याने करत असतात. या प्रदर्शनात चित्रांच्या माध्यामतून त्यांनी हिंदू संस्कृतीतील ‘अध्यात्म व उपासना मंत्र’ यावर सर्जनात्मक आविष्कारातून विलोभनीय कलाकृती साकारल्या आहेत. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून एका उच्च अध्यात्मिक

चित्राविष्कार

पातळीवर घेऊन जातो. चित्रातील अक्षर-आकारांची कलात्मक रचना, सुलेखनात्मक पार्श्वभूमी, रंगसंगती, रंगलेपनातील पोत, चित्रातील छायाप्रकाश, गतिमानता यामुळे कलाकृती पाहताना मनात ऊर्जात्मक भक्ती स्पंदने निर्माण होतात. विशेषत: ‘ओंकार’ हा एक वैश्विक पवित्र ध्वनी असून, त्याचे अवकाशातील चित्रात्मक ब्रह्मांड स्वरूप पाहताना अदृश्य सकारात्मक ऊर्जेचा अनुभव कलारसिकांना येतो. त्यांच्या अनोख्या शैलीतील श्री गणेशाचे अदभुत अमूर्त रूप पाहताना साक्षात चैतन्याचा अविष्कार वाटतो.

चित्राविष्कार

सुरेश गोसावी हे चित्रकलेचे निःस्सीम भक्त आहेत. सर्वकाही विसरून भक्तिरसात तल्लीन होत, मनाची शांती या माध्यमातून लाभते अशी त्यांची चित्रकला आहे. या चित्रकलेतून एक नवी उमेद व ऊर्जा मिळते. कलारसिक त्याला शक्ति म्हणून संबोधित करू शकतात. नैराश्यातून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते. मग ती कोणत्याही निराळ्या स्वरूपात असो. सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या चित्रमालिकेतून याचा प्रत्यय सर्व कलारसिकांना पाहयला मिळतो. कुतूहल व निरागसतेचे रूप म्हणजे लहान मुले, भक्तीचे रूप म्हणजे वारकरी आणि शक्तीचे रूप म्हणजे महाकाय हत्ती, श्रद्धास्थानी देवदेवतांची अनोखी रूपे, अशा अनेक प्रतीकात्मक घटकांच्या सहज, सोप्या मांडणीतून आणि प्रभावी रंगलेपनातून गोसावी यांनी केलेला चित्राविष्कार पाहताना मनाला भक्तिमय, सुखद व अंतर्मुख करणारा अनुभव येतो. जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन स्वरुपात या सर्व कलाकृती कलारसिकांस पाहता येणार आहेत. आवर्जून भेट द्यावी, असे हे चित्रकृती प्रदर्शन आहे.

चित्राविष्कार

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content