Homeपब्लिक फिगरयापुढे नौदलात भारतीय...

यापुढे नौदलात भारतीय परंपरेनुसार होणार पदांचे रँकिंग!

यापुढे नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील. त्याचप्रमाणे भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सिंधुदूर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ही घोषणा केली. कोणत्याही देशासाठी  नौदल क्षमतेचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे हे जाणून त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.

आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे.  नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून  प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल, असे ते म्हणाले.

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले की, हा इतिहास केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून, त्यामध्ये भारताचे विजय, धैर्य, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि सृजनशीलता, कौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीच, अशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदर, आणि सूरत येथील 80पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला.

कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवण, आचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

वारसा आणि  विकास, हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी दिल्लीबाहेर लष्कर दिन, नौदल दिन इत्यादीसारखे सशस्त्र सेना दिन आयोजित करण्याच्या नवीन परंपरेबद्दल सांगितले कारण यामुळे या सोहोळ्याची व्याप्ती भारतभर वाढते आणि नवीन ठिकाणे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरतात.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ सोहोळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतो, ज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळाली; ज्याचा स्वीकार गतवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावेळी करण्यात आला.

पंतप्रधानांनी अनुभवलेल्या क्रियात्मक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट फ्री फॉल, हाय स्पीड रन्स, स्लिदरिंग ऑप्स ऑन जेमिनी अँड बीच असॉल्ट, एसएआर डेमो, व्हीईआरटीआरईपी आणि एसएसएम लाँच डिल, सीकिंग ऑप्स, डंक डेमो आणि सबमरीन ट्रान्झिट, कामोव्ह ऑप्स, न्यूट्रलायझिंग एनिमी पोस्ट, स्मॉल टीम इन्सर्शन-एक्स्ट्रॅक्शन (एसटीआयई ऑप्स), फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड डिस्प्ले, कंटिन्युटी ड्रिल, हॉम्पाइप डान्स, लाइट टॅटू ड्रमर्स कॉल आणि सेरेमोनिअल सनसेट यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content