Homeएनसर्कलमकरंद अनासपुरे एसटीचे...

मकरंद अनासपुरे एसटीचे सदिच्छादूत!

एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटीदेखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहोचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा

एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस स्वच्छ व टापटीप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छादूत मकरंद अनासपुरे यांची ओळखदेखील ग्रामीण भागापर्यंत आहे. त्यांचं सामाजिक कामदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फायदा एसटीला होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

इलेक्ट्रिक बससेवेमुळे प्रदूषणही कमी

आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहोचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. आम्ही गेल्या आठ-नऊ महिन्यांत राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ८ कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवासी याचा लाभ घेत आहेत. यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी वळत आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. यावेळी बोलताना सदिच्छादूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला. एसटी प्रवासातल्या वाहक-चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले. यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी… एक मिनिट महाराष्ट्रासाठी, या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content