Homeडेली पल्सआगीचे संकट, चिमुकलीची...

आगीचे संकट, चिमुकलीची सतर्कता आणि यशस्वी बचावकार्य…

रविवार सायंकाळची साडेचारची वेळ… चोवीस मजली इमारतीतील तेविसाव्‍या मजल्‍यावरील सदनिकेला अचानक आग लागते… काही क्षणात ती आग रौद्ररूप धारण करते…! या इमारतीत राहणारी अवघी ७ वर्षांची पहिलीत शिकणारी चिमुरडी प्रसंगावधान राखत आईला धोक्‍याची सूचना देते… चिमुरडीची आईही समयसूचकता बाळगत आपत्‍कालीन यंत्रणेला वर्दी देते… क्षणाचाही विलंब न करता घाबरून न जाता रहिवाशांना इमारत रिकामी करण्‍याची सूचना करते… महानगरपालिकेचे अग्निशमन दल अर्ध्‍या तासात आग आटोक्‍यात आणते… चिमुरडी आणि तिच्‍या आईच्‍या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळतो…!

ही घटना घडली आहे मालाड (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी राजे संकुलातील पंचरत्‍न अपार्टमेंटमध्‍ये! या साहसी सातवर्षीय बालिकेचे नाव आहे मुग्‍धा राजेश मयेकर. आणि आईचे नाव आहे मीनल मयेकर. मुंबई महापालिकेच्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाने प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण घेतल्‍यामुळे समयसूचकता दाखविता आली आणि वेळ वाया न घालविता जीवितहानी रोखता आली, असे मीनल मयेकर यांनी नमूद केले.

पालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रहिवाशी संकुले इत्यादी विविध ठिकाणी वेळोवेळी प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रथम प्रतिसादक प्रशिक्षणांचे अर्थात फोर्स रिस्पॉन्ड ट्रेनिंगचे आयोजन आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये सामान्य नागरिकांचा प्रथम प्रतिसाद कसा असावा, याबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते.

रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेबाबत पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेचारच्‍या सुमारास ‘पंचरत्‍न अपार्टमेंट’ या चोवीस मजली इमारतीच्‍या २३व्‍या मजल्‍यावर एका सदनिकेला अचानक आग लागली. सदनिकेतील लहान मुले आगपेट्यांशी खेळत असताना बिछान्‍याने आणि पडद्यांनी पेट घेतला. वातानुकूलित यंत्रणा, छताच्‍या प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस (पीओपी) आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले. खेळत्‍या हवेमुळे सदनिकेतील ज्‍वलनशील साहित्‍याने पेट घ्‍यायला सुरूवात केली. आग लागताच इमारतीतील धोक्‍याची घंटा देणारा ‘फायर अलार्म’ वाजू लागला. फायर अलार्म ऐकू येताच याच इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर राहणाऱ्या मुग्‍धा मयेकर या पहिलीत शिकणाऱ्या अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीने तातडीने आईकडे धाव घेतली. इमारतीत काहीतरी दुर्घटना घडल्‍याचे आईला सांगितले. त्यानंतर मुग्धाच्या आईने खातरजमा केली असता २३ व्‍या मजल्‍यावरील सदनिकेला आग लागल्‍याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन दल नियंत्रण कक्षास दूरध्वनीवर घटना कळविली. पालिकेच्या १९१६, या आपत्‍कालीन मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आपत्ती व्‍यवस्‍थापन नियंत्रण कक्षाने तत्‍काळ सदर घटना संबंधित मदतसेवांना कळवून घटनास्‍थळी आवश्‍यक मदतकार्य कमीतकमी वेळात उपलब्‍ध करुन दिले.

दरम्यानच्या काळात मीनल यांनी आपल्‍या घराचा विद्युतपुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा तातडीने बंद केला. आजुबाजूच्‍या सदनिकाधारकांनाही आगीची दुर्घटना लक्षात आणून देत त्‍यांनाही विद्युतपुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा बंद करण्‍यास सांगितले. त्यानंतर आपल्या दोन मुलींसह आणि शेजाऱ्यांना घेऊन त्या पायऱ्यांनी इमारतीतून खाली उतरल्या. त्याचबरोबर त्यांनी इमारतीतील इतरांना पायऱ्यांचाच वापर करण्याचे आणि लिफ्टचा वापर न करण्याचेही सांगितले.

याच गृहसंकुलात राहणारे नागरी संरक्षण दलाचे विभागीय क्षेत्राधिकारी गोविंद झा, रहिवासी राज ब्रम्हे यांनी घटनास्थळी धाव घेत लिफ्टयंत्रणा पूर्णपणे बंद केली. क्षणाचाही विलंब न करता इमारतीतील इतर रहिवाशांना धीर देत आपत्कालीन घटनेवेळी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देत त्यांना धावाधाव न करता पायऱ्यांवरून शांतपणे खाली उतरविले. दरम्यान, अग्निशमन दलाने अवघ्या अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

यानंतर मीनल मयेकर म्हणाल्या की, आमच्या हौसिंग सोसायटीत पालिकेच्या सौजन्याने आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे अधिकारी राजेंद्र लोखंडे, भरतकुमार फुणगे आणि प्रविण ब्रम्‍हदंडे यांनी उपस्थित राहून स्‍थानिकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागामार्फत देण्‍यात आलेल्‍या प्रशिक्षणामुळेच इमारतीमधील रहिवासी न घाबरता परिस्थितीला शांतपणे सामोरे गेले. कोणतीही मोठी हानी झाली नाही. नागरिकांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्यावे. आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ बाळगावे असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील सर्वच सोसायट्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण आपल्या सोसायट्यातही आयोजित करावे, असेही आवर्जून सुचविले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content