पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण / भूमीपूजन होणार असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरण आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे 12 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7चे लोकार्पण होणार आहे. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ, ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. 2015मध्ये या मार्गिकांची पायाभरणीदेखील मोदी यांनी केली होती. यावेळी पंतप्रधान मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1)चा प्रारंभ करतील. सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय (UPI)द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल.
सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी
याच कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे 17 हजार 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे 2 हजार 460 एमएलडी इतकी असेल.
20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण
मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधे, रोगनिदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहेत. याशिवाय, 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
400 किमी लांबीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6 हजार 79 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, अधिक चांगले मल्टी-मोडल समन्वयन आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत.
यातल्या काही योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे-
१. मलजल प्रक्रिया केंद्र–
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे.
या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गावदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रुझ, माटुंगा, वडाळा, शीव – कोळीवाडा, ब्राह्मणवाडी, अंधेरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील लोकसंख्येला फायदा होणार आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी रुपये १७ हजार १८२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
या कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीयस्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.
२. रस्ते काँक्रिटीकरण-
पंतप्रधानांच्या हस्ते रस्ते काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामांसाठी अंदाजे रु. ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे.
या कामांतर्गत मुंबईतील शहर भागात ७२ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यानुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
या रस्त्यांच्या कामांत ‘युटिलिटी डक्ट’ तसेच पूर नियंत्रणात महत्त्वाचे ठरणारे शोष खड्डेही बनवले जाणार आहेत. या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बनवण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना हे काम दिले जाणार आहे. नवीन रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा यासाठी दर्जेदार व्यवस्थापन संस्थाही देखभालीसाठी नेमण्यात येणार आहेत.
३. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी-
कोविड १९ आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२०मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्जवाटपाचा लाभ मिळणार आहे. या कर्जवाटपाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात येणार आहे.
पालिकेने आपल्या २४ विभागांमध्ये २३०१ शिबिरे आयोजित केली. जेणेकरून अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेची माहिती मिळावी. या शिबिरांमध्ये पथविक्रेत्यांना ऑनलाईन अर्ज कसे करावे, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. यासोबतच या व्यावसायिकांना अर्ज करणे सुलभ व्हावे, यासाठी सहायकांची नियुक्ती करण्यात आली. पालिकेने केलेल्या या बहुआयामी कामामुळे आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारसपत्रे देण्यात आली आहेत. तर १ लाखाहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
४. रुग्णालये आणि दवाखाने–
४.१ भांडुप मल्टीस्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय, नाहूर-
पालिकेच्या ‘एस’ विभागातील नाहूरगाव येथे ३६० रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तब्बल ७१,५४७.६६ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ९ मजले यानुसार एकूण ११ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त १० मजल्यांची कर्मचारी निवासी इमारतदेखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०३ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळदेखील असणार आहे.
या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३६० रुग्णशय्यांपैकी १९० रुग्णशय्या ह्या वैद्यकीय शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, प्रसूति, ट्रॉमा, बालरोग, नवजात शिशू, कान-नाक-घसा, नेत्ररोग व अपघात यासाठी असणार आहेत. ३० अतिदक्षता रुग्णशय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. १०० अतिविशेष सर्वसाधारण रुग्णशय्या ह्या न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कर्करोग व पोटाचे विकार यासाठी असणार आहेत. तर उर्वरित ४० रुग्णशय्या ह्या ‘अतिविशेष अतिदक्षता’ यासाठी असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त शल्यचिकित्सा गृहांमध्ये १३ रुग्णशय्या असणार आहेत.
या रुग्णालयामध्ये इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेससह, क्ष-किरण (एक्सरे), सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, प्रगत प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी वॉर्ड देखील असणार आहे. या रुग्णालयामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी इत्यादी परिसरातील साधारणपणे १२ ते १५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवादेखील उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय सन २०२५च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा आहे.
४.२ सिद्धार्थ महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम)-
गोरेगाव (पश्चिम) परिसरात असणाऱ्या सिद्धार्थनगरमध्ये ३०६ रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ५०,१३९ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त २० मजल्यांची निवासी इमारतदेखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०८ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळदेखील असणार आहे.
या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३०६ रुग्णशय्यांपैकी २२० रुग्णशय्या ह्या वैद्यकीय विभाग, शल्यक्रिया, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूति, कान-नाक-घसा, नेत्ररोग यासाठी असणार आहेत. ५५ अतिदक्षता रुग्णशय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. तर उर्वरित ३१ अतिविशेषोपचार रुग्णशय्या ह्या युरोसर्जरी, केमोथेरपी, कार्डियोलॉजी, डायलिसिस यासाठी असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त शल्यचिकित्सा गृहांमध्ये ११ रुग्णशय्या असणार आहेत.
या रुग्णालयामध्ये इमर्जजन्सी मेडिकल सर्व्हिसेससह, क्ष-किरण (एक्सरे), सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, प्रगत प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी वॉर्ड देखील असणार आहे. या रुग्णालयामुळे सिद्धार्थनगर, गोरेगांव पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पश्चिम, मालवणी, आरे कॉलनी इत्यादी परिसरातील साधारणपणे ८ ते १० लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.
४.३ ओशिवरा प्रसूतिगृह, ओशिवरा गाव-
पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील ओशिवरा गाव परिसरात असणाऱ्या भूखंडावर १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसूतिगृहाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १३,५०५.१५ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे प्रसूतिगृह तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. यापैकी १० व ११ वा मजला हा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी असणार आहे. तसेच या प्रसूतिगृह परिसरात पुरेशा संख्येने वाहने उभी राहतील असे वाहनतळदेखील असणार आहे.
या प्रसूतिगृहात प्रसूतिकक्ष, प्रसूति-पूर्व व प्रसूति-पश्चात कक्ष, स्त्रीरोग व कुटुंबकल्याण विभाग, कर्करोग तपासणी व उपचार विभाग, आयसीयू, एनआयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर मूल नसलेल्या जोडप्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचारांची सुविधा असणारे आयव्हीएफ क्लिनिक, ब्लड बँक, मेडिकल वॉर्ड, एनआयसीयू, एमआयसीयू, मिल्कबँक इत्यादी सुविधा देखील असणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय निदानासाठी रक्त तपासणी सुविधा, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, अल्ट्रासाऊंड, डायलिसिस या सुविधाही या प्रसूतिगृहात असणार आहेत.
या प्रसूतिगृहामुळे के पश्चिम विभागातील आनंद नगर, मिल्लत नगर, बेहराम बाग, राममंदिर मार्ग व भगतसिंह नगर आदी परिसरातील साधारणपणे ३ ते ३.५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.
४.४ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना-
पंतप्रधानांच्या हस्ते २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दवाखान्यांचे लोकार्पण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजने अंतर्गत करण्यात आले होते. याच योजने अंतर्गत आता २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत ११ जानेवारी २०२३ पर्यंत २ लाख १० हजार रुग्णांवर आवश्यक ते वैद्यकीय ओषधोपचार करण्यात आले आहेत. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन व औषधोपचार यासह विविध १४७ चाचण्या (Radiology, Pathology) मोफत उपलब्ध आहेत.

