चीन, जपान आदी देशांमध्ये नव्याने उफाळलेल्या कोरोनाची धास्ती असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काळ्या तापापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नाताळ साजरा करत नववर्षाच्या स्वागताचा तुम्ही खूप आनंद घ्या, पण थोडे सावधदेखील राहा. तुम्ही पाहत असाल की, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मास्क आणि हात धुणे यासारख्या उपायांचे अधिकाधिक पालन करा. आपण सावध राहिलो तर आपण सुरक्षितही राहू, असेही ते म्हणाले.
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या यंदाच्या शेवटच्या संवादात पंतप्रधानांनी हे आवाहन केले. आज श्रोत्यांना मी आणखी एका आव्हानाबद्दल सांगू इच्छितो, जे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. हे आव्हान, हा रोग आहे – ‘कालाजार म्हणजेच काळा ताप’. सँड फ्लाय हा समुद्रकिनारी आढळणारा एक किटक चावल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एखाद्याला काळा ताप, हा आजार झाला की महिनो न् महिने ताप येतो, रक्ताची कमतरता भासू लागते, शरीर अशक्त होते आणि वजनही घटते. हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळा ताप नावाचा हा आजार आता झपाट्याने नष्ट होत आहे, असे ते म्हणाले.
अलीकडेच 4 राज्यांमधल्या 50पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काळ्या तापाची साथ आली होती. मात्र आता या काळ्या तापाचा प्रादुर्भाव बिहार आणि झारखंडमधल्या 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. काळ्या तापाचे रूग्ण असलेल्या भागातील जनतेने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे – सँड फ्लाय किंवा वाळूवर आढळणाऱ्या माशांवर नियंत्रण आणि दुसरे म्हणजे या आजाराची लागण झाल्याचे लवकरात लवकर ओळखणे आणि त्यावर पूर्ण उपचार करवून घेणे. काळ्या तापावरचे उपचार सोपे आहेत आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही खूप प्रभावी आहेत. तुम्हाला फक्त सतर्क राहायचे आहे. ताप आला तर हलगर्जीपणा करू नका आणि सँड फ्लायला मारणाऱ्या औषधांची फवारणी करत राहा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
योगाभ्यास आणि आयुर्वेद हे शतकानुशतके आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मात्र पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे आपल्या या शास्त्रांसमोर नेहमीच एक आव्हान राहिले आहे. पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्राच्या आजच्या युगात, योगाभ्यास आणि आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या आणि कसोट्यांवर यशस्वी ठरत आहेत. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरने केलेल्या सखोल संशोधनातून, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी योगाभ्यास अत्यंत प्रभावी असल्याचे समोर आले आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी अमेरिकेत आयोजित अत्यंत प्रतिष्ठित परिषदेत, टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या संशोधनाचे परिणाम सादर केले आहेत. अशाप्रकारे भारतीय पारंपारिक उपचार पद्धती, पाश्चात्य पद्धतींच्या कठोर मानकांनुसार पारखली जाण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे, असेही मोदी म्हणाले.
दिल्लीतील एम्समध्येही प्रयत्न सुरू आहेत. आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी एकात्मिक औषध आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रातर्फे आतापर्यंत नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 20 शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये syncope–सिंकपी या आजाराच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे न्यूरोलॉजी विषयक नियतकालिकामधील शोधनिबंधामध्ये मायग्रेनच्या त्रासावर उपकारक ठरणाऱ्या योगाभ्यासाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त हृदयविकार, नैराश्य, निद्रानाश आणि गर्भधारणेदरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अशा इतरही अनेक त्रासांमध्ये उपकारक ठरणाऱ्या योगासनांच्या फायद्यांबाबत अभ्यास केला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले.
2022 हे वर्ष खरेच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायक आणि अद्भुत ठरले. या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. भारताने जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा म्हणजे वर्ष 2022, भारताने 220 कोटी लसीकरणाचा अविश्वसनीय टप्पा ओलांडण्याचा विक्रम म्हणजे वर्ष 2022, भारताने 400 अब्ज डॉलर निर्यातीचा जादुई टप्पा ओलांडणे म्हणजे वर्ष 2022, देशातील प्रत्येक नागरिकाने ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प स्वीकारणे म्हणजे वर्ष 2022, आयएनएस विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वागत म्हणजे वर्ष 2022, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात भारताचा डंका म्हणजे वर्ष 2022, प्रत्येक क्षेत्रात भारताला मिळालेले यश म्हणजे वर्ष 2022. खेळाच्या मैदानात सुद्धा, मग ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, आपल्या तरुणाईने प्रचंड सामर्थ्य दाखवले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या वर्षी G-20 समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारीसुद्धा भारताला मिळाली आहे. ‘नमामि गंगे’ अभियानामुळे जैवविविधतेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. हिल्सा मासे, गंगेच्या पत्रातील डॉल्फिन आणि कासवांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगा स्वच्छ झाल्याने उपजीविकेच्या इतर संधीही वाढत आहेत. येथे मी जैवविविधता लक्षात घेऊन तयार केलेल्या ‘जलचर आजीविका मॉडेल’ची चर्चा करू इच्छितो. ही पर्यटनावर आधारित बोट सफारी 26 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

