८०च्या दशकातील उत्तरार्ध असावा. मी नेहमीप्रमाणे बीटमधील कामकाज संपवून बातमीची कॉपी निवांत लिहिता यावी म्हणून फाऊंटनजवळील सीटीओ कार्यालयातील जनसंपर्क कार्यालयात बसलो होतो. एक बातमी संपवून दुसरी लिहायला घेत असतानाच नेहमीच्या घाईत मुंबई मराठी पत्रकार संघाचे तेव्हाचे माजी अध्यक्ष अण्णा पिंपळीकर एका उंच व्यक्तीबरोबर प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. घाईघाईत अण्णांनी विचारले.. काळे आज काय विशेष? मी म्हटले.. काही नाही, रूटीन आहे सर्व. तू रूटीन वगेरे सांगू नकोस; आम्हाला रूटीन सांगशील आणि उद्या लोकसत्तेत धमाका करशील. त्यावर ती उंच व्यक्ती किंचितशी हसली.
मी प्रश्नार्थक चेहरा करताच अण्णा म्हणाले- हा राम पवार. क्राईम पाहतो हल्ली. कधीकधी ‘श्री’मध्ये ही लिहितो. क्राईममध्ये जबरदस्त आहे. ही राम पवारची पहिली ओळख! अण्णांनी जे जबरदस्त सांगितले होते, त्याचा प्रत्यय मी सांज लोकसत्तेत व लोकसत्तात असताना घेतला होताच. पण तोच जबरदस्तपणा अजूनही रामने जपून ठेवलेला आहे. ‘श्री’मध्ये त्याने क्राईमव्यतिरिक्तही मुंबईसंबंधित विषयांवर लिहिलेले होते. दोन-तीन भेटींनंतर त्याने मला विचारले.. तू ऑफिसमध्ये जाऊन लिहिण्याऐवजी इथे सीटीओत बसून का लिहितोस? मी म्हटले राम, एकदा ऑफिसमध्ये गेलो की एकसारखे फोन व भेटायला येणारी माणसे, या सर्वांमुळे कॉपीची लय बिघडते. तोही म्हणाला हो रे.. खरे आहे. नंतर सीटीओत आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. तोही मग लेख लिहायला निवांतपणा मिळतो म्हणून तेथे नेहमीच यायला लागला.
आमच्या गप्पा, विनोद, चर्चा होऊ लागल्या. तशात मी गिरगावकर. तोही खेतवाडीत राहणारा.. मग लगेचच गट्टी जमली. ती आजतागायत दोघांच्या पंचाहत्तरीपर्यंत सुरळीत चालू आहे. यातील बरेचसे श्रेय मी रामलाच देईन. तोपर्यंत मला त्याचे गुन्हे वार्तांकनातील कसब दिसून आले होते. त्यादरम्यान मीही काही गुन्हे वार्तांकन करू लागलो होतो. माझे महापालिका बीटही सुरूच होते. मी दोन्ही प्रकारच्या बातम्या देऊ लागलो. लोकसत्तेतील वरिष्ठांनीही कधी त्याला अगदी शेवटपर्यंत आडकाठी आणली नाही. त्या सीटीओ प्रेसरूममध्ये मी विविध प्रकारच्या बातम्या लिहिल्या आणि त्यावेळी त्या छापूनही आल्या.

हे सर्व होत असताना ९१च्या मार्च महिन्याच्या सुमारास इंडियन एक्सप्रेस समूह संध्याकाळचा पेपर सुरू करणार असल्याचे कानावर आले होते आणि एप्रिल महिन्याच्या अखेरीला ‘सांज’चे संपादक चंद्रशेखर वाघ यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवले आणि मला घेऊन लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांच्या केबिनमध्ये गेले. गडकरीसाहेब लगेचच म्हणाले काळे, आता येत्या काही दिवसांपासून तुम्ही वाघ यांच्याबरोबर सांज लोकसत्तेत काम करायचे आहे. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते म्हणाले- घाबरू नका. तुम्हाला ‘मुख्य वार्ताहर’ करत आहोत. मग काही दिवस नवीन कामाची तसेच माणसांची जमवाजमव करत असतानाच मला क्राईमसाठी राम पवारची आठवण झाली. त्यावेळी संध्याकाळच्या पेपरचे वैशिष्टय काहीसे गुन्हे वार्तांकन हेच होते. माझ्या ते लक्षात आले होते आणि म्हणूनच मी रामचे नाव वाघ साहेबांच्या कानावर घातले. काहीसे विषयांतर झाले. पण ते गरजेचे होते. राम आणि माझी मैत्री तो आमच्या सांज परिवारात आल्यानंतर अधिकच घट्ट झाली. त्यानंतर आमच्या मैत्रीने कधीच मागे पाहिले नाही. दरम्यान रामच्या खेतवाडी १०व्या गल्लीतील घरी येणे-जाणे वाढले होते. त्याचा मोठा भाऊही चांगला ओळखीचा झाला. त्यातच एक-दोन वर्षांत रामचे लग्न झाले. या सर्वात त्याची एक गोष्ट सुटली नाही ती म्हणजे गुन्हे वार्तांकन..
पोलिस आयुक्त कार्यालयात आणि पोलिस प्रेसरूममध्ये त्यावेळी रामचा चांगलाच दबदबा होता, हे मान्य केलेच पाहिजे. आयपीएस अधिकाऱ्यांपासून तो साध्या हवालदारापर्यंत सर्वजण त्याच्याशी अदबीने वागत असत. तोही त्यांना मान देत असे. बातमी मिळवण्यासाठी त्याने कधी आवाज चढवलाही असेल. पण तो आक्रमक कधीच झाला नाही. हल्ली माध्यमांमध्ये अधिकाऱ्यांची जशी उलटतपासणी घेतात तसे त्याने कधीच केले नाही. आपण जर याला माहिती दिली नाही तरी तो दुसरीकडून कुठून तरी मिळवणारच अशी अधिकाऱ्यांना पक्की खात्री असल्यानेच हातचे काहीही राखून न ठेवता त्याच्याशी बोलत असत. मिड डे, आफ्टरनून, महानगर आदि सायंदैनिकात रामने वार्तांकन केलेले आहे. सांज लोकसत्तेत आल्यानंतर त्याने महानगरला रामराम केला. त्याच्या वार्तांकनातील हातोटी पाहून लोकसत्ता संपादक अरुण टिकेकर यांनी त्याला लोकसत्तेत थेट भरती केले.
मुंबई दंगलीच्या वेळी कधी नव्हे इतके या बीटला महत्त्व आले आणि या सर्वांच्या कसोटीला राम नेहमीच खरा उतरला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या ही बातमी रामने सर्वप्रथम दिली होती. पोलिसांचा अतिशय गोपनीय अहवाल त्याला समजला होता. युतीच्या पहिल्या राजवटीत या बातमीने हलकल्लोळ माजवला होता. यानंतर मुंबई दंगल असो वा बॉम्बस्फोट हल्ला, त्याने सतत बाजी मारली होती. गँगवॉर तर त्याने जवळून पाहिलेही आहे. “for the powerful crimes are thus that others commit” असा सर्व माहोल असताना गुन्हे वार्तांकन करणे किती जिकरीचे होते हे सांगायला नकोच. तसेच “history provides us with numerous examples of people who were convinced to eat they were doing the right things and committed terrible crime because of it” इतकी भयानक स्थिती असताना गुन्हे वार्तांकन करणे किती कठीण होते ते सांगायला नकोच. तरीही गुन्हे वार्तांकनाला मराठी वर्तमानपत्रात योग्य स्थान मिळू शकलेले नाही हे दुर्दैव आहे… रामला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो!

