Details
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“राज्यात कधी नव्हे तर कोरोनाच्या साथीचा प्रकोप झाला आहे. यातच सरकारने पुण्याच्या ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पसंतीला न उतरणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्याचे सत्र चालू आहे. विद्यमान ठाकरे सरकारही त्याला अपवाद नाही असे दिसताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे सरकारही राजकीय बळी घेणार का, असा सवाल केला आहे.”
त्यांनी पाठवलेले पत्र थोडक्यात याप्रमाणे..
‘ससून’ रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली केली व त्यांच्याकडे पहिल्यापासून असलेला वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालकपदाचा कार्यभार पूर्ण वेळ सोपविण्यात आला आहे. ‘ससून’ रूग्णालयात ‘कोरोना’च्या रूग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली आहे असे जरी सरकारकडून भासवण्यात येत असले तरी सरकारमधील इतर राजकीय पक्षाची मर्जी सांभाळण्यासाठी चंदनवाले याचा बळी घेण्यात आला आहे हे आम्हाला माहित आहे. गेले ४ दिवस शहरातील काँग्रेसचा त्या भागातील एक नगरसेवक त्यासंदर्भात बोलत होते. ससून रूग्णालयात स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपास ससून रूग्णालयात केलेली बंदी हे प्रमुख छुपे कारण या बदलीमागे आहे. आणि अशा पद्धतीने होणाऱ्या बदल्या या त्या-त्या क्षेत्रात सेवा देणाऱ्या सेवकाच्या व अधिकाऱ्याच्या मनात भीती निर्माण करतात. इतकेच नाही तर या सर्वांचा परिणाम त्यांच्या कामावरदेखील होतो.
डॉ. चंदनवाले यांची जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्य सरकारने त्यांची पुन्हा पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आणि आता पुन्हा त्याची बदली करण्यात अत्त्यंत वाईट पद्धतीने करण्यात आली हे गंभीर आहे.
“कोरोनाच्या संसर्ग काळात महाराष्ट्रातील सर्वात जास्त रूग्ण पुण्यातदेखील सापडले. पुण्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाला आणि ‘कोरोना’च्या संसर्गाने सर्वाधिक मृत्यू ससून रूग्णालयामध्ये होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ससून रूग्णालयावर टीकेची झोड उठविली जात होती. मात्र, वास्तव कोणी लक्षात घेत नव्हते. जे रूग्ण उपचारास प्रतिसाद देणे कमी करू लागतात असे रूग्ण ससूनमध्ये पाठवण्यात येतात. त्यामुळे रूग्णालयात येणारा रूग्ण हा अंतिम टप्प्यात येत असल्याने चोवीस तासही ससूनमध्ये रूग्णावर उपचाराची संधी डॉक्टरांना मिळत नाही हे वास्तव आहे. पण याच गोष्टीचा आधार घेत काही हिशोब चुकते करण्यात आले व राजकीय हितसंबधांना प्राधान्य देत सरकारने डॉ. चंदनवाले यांचा बळी घेतला आहे.”
“विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘ससून’मध्ये होणाऱ्या उपचाराबाबत ‘प्रोटोकॉल’साठी समिती स्थापन केली व त्या समितीचे काम नुकतेच सुरू झाले असताना डॉ. चंदनवाले यांची बदली झाली हे प्रशासकीयदृष्ट्याही अत्यंत गंभीर आहे. तरी आपण डॉ. अजय चंदनवाले यांची बदली रद्द करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.”

