माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगारविरोधी जीआर मागे घेण्याची मागणी करत माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने उद्या, २६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईत आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. यात ९४ वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे सहभागी होणार आहेत.
माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि. १६ जानेवारी, २०२४चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री, गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी, या मागणीसाठी उद्या हे उपोषण होणार आहे.
डॉ. बाबा आढाव व नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार असून, या कृती समितीमध्ये शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाब जगताप, बळवंत पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, शिवाजी सुर्वे, निवृत्ती धुमाळ, नंदा भोसले, लक्ष्मण भोसले, दत्ता घंगाळे, सतीश जाधव आदी नेत्यांचा समावेश आहे.
माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्र.३४ मागे घेऊन या अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार सल्लागार समितीची व विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करुन अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करावी, विविध माथाडी मंडळात माथाडी कामगारांच्या शिकलेल्या मुलांचीच भरती करावी, माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग केला जात आहे, त्यासंदर्भात माथाडी कायदा बचाव कृती समितीने दिलेल्या सूचनांनुसार उपाययोजना होणे, शासनाच्या कामगार, पणन विभागाकडून माथाडी, वारणार, मापाडी कामगारांवर अन्याय करणारे शासन जीआर काढले आहेत ते तातडीने मागे घ्यावे, असे जीआर काढण्यापूर्वी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांना विश्वासात घेतले जात नाही तसेच हिवाळी अधिवेशानादरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी होत नाही याकरीतां आणि राज्य सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याच्या निषेधार्थ उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.