भारताच्या पहिल्या ध्वनी रॉकेट प्रक्षेपणाला नुकतीच 60 वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी केंद्रीय अंतराळविषयक कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, 21 नोव्हेंबर 1963 रोजी सर्वप्रथम प्रक्षेपण झाले होते, त्या स्पेस पॉडवरून तशाच ध्वनी रॉकेटचे औपचारिक प्रक्षेपण होताना पाहिले. या प्रतिकात्मक आयोजनात प्रमोद पी. काळे यांनी उलटगणती सुरू झाल्याची घोषणा केली, ज्यांनी 60 वर्षांपूर्वी पहिल्या प्रक्षेपणाच्या वेळी उलटगणती सुरू झाल्याचे घोषित केले होते.
त्यानंतर, प्रसारमाध्यमांना संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की चांद्रयान-3 आणि आदित्य-एल1 मोहिमांचे यश, भारताच्या स्वदेशी क्षमतांचा पुनरुच्चार करत आहे, आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांनी सहा दशकांपूर्वी पाहिलेले स्वप्न साकार करत आहे.
विक्रम साराभाई यांच्या स्वप्नाची ही पूर्तता आहे, ज्यांच्याकडे स्रोतांची कमतरता होती मात्र आत्मविश्वासाची कमतरता नव्हती, कारण त्यांचा स्वतःवर आणि भारताच्या अंतर्निहित क्षमतेवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास होता, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्याच्या उद्देशाने भारत स्वामित्व, पीएम गति शक्ती, रेल्वे, महामार्ग आणि स्मार्ट शहरे यांसारख्या पायाभूत सुविधा, कृषी, वॉटर मॅपिंग, टेलिमेडिसिन आणि रोबोटिक सर्जरी अशा विविध क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
भारताने गेल्या 9 वर्षांत धोरणात्मक आणि नागरी गरजा पूर्ण करणारी स्वतःची प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली स्थापन केली आहे, असे डॉ. सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रातील सुधारणांना सुरुवात केली, ज्यामुळे भारतीय खाजगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्रात सहज प्रवेश उपलब्ध झाला तसेच सर्व भागधारकांना सामावून घेणारे सर्वसमावेशक भारतीय अंतराळ धोरण 2023 जारी करण्यात आले, असे ते म्हणाले.
अंतराळ क्षेत्र सुधारणा जारी केल्यानंतर देशाने अल्पावधीतच 150 पेक्षा जास्त स्पेस स्टार्टअप्ससह या क्षेत्रातील भरभराट पाहिली, असे मंत्र्यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे शक्य झालेले पहिले भारतीय खाजगी सब-ऑर्बिटल प्रक्षेपण नुकतेच यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या चांद्रयान-3 आणि आदित्य एल1 मोहिमांसह गेल्या 4 ते 5 वर्षांतील भारतीय अंतराळ उपक्रमांचे यश अधोरेखित करत डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला भारताची मानवाला अवकाशात नेणारी पहिली मोहिम गगनयान 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे, चंद्रावरुन नमुने परत आणण्यासाठीची मोहीम ‘भारतीय अंतरीक्ष स्थानक’ (भारतीय अंतराळ स्थानक) 2035 पर्यंत पूर्ण करण्याचे, आणि भारतीय अंतराळवीराचे पहिले पाऊल चंद्रावर पाऊल ठेवण्याची मोहीम 2040 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले आहे.
भारताच्या अंतराळ मोहिमा मानवी स्रोत आणि कौशल्ये यांच्या आधारे तयार करण्यात आल्या आहेत, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.
अयशस्वी ठरलेल्या रशियन चांद्र मोहीमेचा खर्च सुमारे 16,000 कोटी रुपये आहे आणि आपल्या (चांद्रयान-3) मोहिमेचा खर्च फक्त 600 कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.
2013 सालापर्यंत, प्रती वर्षी सरासरी 3 प्रक्षेपणांसह 40 प्रक्षेपण वाहन मोहिमा पूर्ण केल्या गेल्या होत्या. मागच्या दशकात मात्र 53 प्रक्षेपण वाहन मोहिमा आणि दरवर्षी सरासरी 6 प्रक्षेपणांसह हे प्रमाण दुप्पट झाले आहे, असे ते म्हणाले, इस्रोने 2013 सालापर्यंत 35 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले होते. गेल्या 9-10 वर्षांमध्ये यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याकाळात इस्रोने 380 पेक्षा जास्त परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले तसेच अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून 220 दशलक्ष युरो आणि 170 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली, अशी माहिती त्यांनी दिली.
अंतराळ क्षेत्र खुले झाल्मामुळे तसेच स्पेस स्टार्टअप्स आणि इंडस्ट्री लिंकेजचा उदय झाल्यामुळे, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सध्याच्या सुमारे $8 अब्ज वरून येत्या काही वर्षांत $100 अब्जपर्यंत गगनभरारी घेऊ शकते, असा विश्वास भारताच्या प्रगतीने आश्चर्यचकित झालेल्या परदेशी व्यापार तज्ञांनी नोंदवल्याचेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.