रस्ते सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून 2030पर्यंत अपघाती मृत्यूंचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ते अपघात 2022च्या ताज्या अहवालानुसार 4 लाख 60 हजार रस्ते अपघात, त्यात 1 लाख 68 हजार मृत्यू आणि 4 लाख गंभीर जखमी झाले आहेत. देशात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात तर 19 मृत्यू होतात असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘रस्ते सुरक्षा-भारतीय Roads@2030-सुरक्षेचा स्तर उंचावणे’ या विषयावरील सीआयआय राष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करत होते. ‘रस्ते सुरक्षेचे 4ई’ अर्थात -अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहन अभियांत्रिकी)- अंमलबजावणी- शिक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सामाजिक वर्तनात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे, असे गडकरी म्हणाले. रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या सहकार्यावर त्यांनी भर दिला.
रस्ते अपघातांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे, रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परिणामी जी. डी. पी.मध्ये 3.14 % सामाजिक-आर्थिक नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. 60 टक्के मृत्यू हे 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांचे झाले आहेत. अपघाती मृत्यू म्हणजे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे नुकसान, नियोक्त्याचे व्यावसायिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेचे एकूण नुकसान होय असे ते म्हणाले.
नागरीकांमधील चांगल्या वाहतूक वर्तनासाठी पुरस्कार प्रणालीचे नागपूरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. वाहनचालकांची नियमित नेत्र तपासणी करावी यावर त्यांनी भर दिला. संस्थांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून त्यासाठी मोफत शिबिरे आयोजित करावीत असेही त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण आणि जागरूकता, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट-अप्स, तंत्रज्ञान पुरवठादार, आय. आय. टी., विद्यापीठे, वाहतूक आणि महामार्ग प्राधिकरणांशी सहकार्य हा रस्ते सुरक्षेसाठी चांगल्या पद्धतींचा प्रसार करण्याचा मार्ग आहे, असेही गडकरी म्हणाले.