सरकारने केलेल्या कामाची तपशीलवार माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत तासभर जोरदार चौफेर टोलेबाजी केली आणि आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर तसेच ठाकरे यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करून विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका करताना मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, स्वार्थासाठी विचारच विकणाऱ्यांनी कांगावा करणे चुकीचे आहे. पक्षच चोरला, चिन्हच चोरले म्हणत रडायचे, ही कुठली भूमिका आहे. मर्दासारखे जाहीरपणे बोला ना.. खोके खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याच शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये घेतले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे.
विधिमंडळाचे कामकाज फेसबुकवरून होऊ शकत नाही, अशी टीका करत शिन्दे म्हणाले की, काही लोक आमदारकी टिकवण्यापुरते सभागृहात येतात तर काही केवळ दाखवण्यापुरते येतात. मोदी ग्यारन्टीवर राज्यात आणि देशात लोकांचा विश्वास आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजपाप्रवेशाचा संदर्भ देत शिन्दे म्हणाले की, आता अशोकरावही आले आणि पुढे काय काय होईल, सांगता येत नाही. सकाळी चहा प्यायला बरोबर असलेला नेता आपल्याबरोबर राहील की नाही, याची चिंता या लोकांना असते. पण लोकांचा मोदींच्या ग्यारन्टीवर विकासाच्या जादूवर विश्वास आहे. विकासाच्या भरधाव गाडीला स्पीडब्रेकर लावायचा प्रयत्न काहींनी केला. पण विकासाचा अटल सेतू केला, समृद्धीच्या महामार्गावरून वाटचाल करत आहोत.
कुणीतरी शेतकरी कोमात आहे, ही भाषा केली हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचे, ही स्थिती आहे. शेतकरी नाही तर विरोधी पक्ष कोमात गेलाय की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. आपले सरकार गेले या धक्क्यातून विरोधक अजून सावरत नाहीयेत. तुमच्यातल्या कोणी तरी शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का, असे विचार मांडले. अशा लोकांना काय सांगणार, अशी टिप्पणीही शिन्दे यांनी केली.
तुमच्या काळात गृहमंत्री जेलमध्ये गेले, साधूंचे हत्त्याकांड झाले, हनुमानचालिसा म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून उचलून नेले, कंगना राणावतचे घर पाडण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले.. पण यांना जिवा महालेचा विसर पडला, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, अहंकारापोटी, द्वेषापोटी आम्ही कोणावरही अन्याय केला नाही. आकसाने कुणावरही अन्याय करणार नाही. पण गुन्हे करणाऱ्यांना सोडणारही नाही. बुलडोझर फिरवून १२०० बांधकामे पाडली तेव्हा नाईट लाईफवाल्यांचा थयथयाट होत होता. आव्हाड तुम्ही संस्कारावर बोलता आणि घरी नेऊन एखाद्याला बडव बडव बडवता, काळंनिळं होईपर्यंत मारता. मॉलमध्ये आलेल्या पतीपत्नींपैकी पतीला पट्ट्याने मारायचे आणि वर संस्काराची भाषा करायची, हे योग्य नाही.

महिला सक्षमीकरण, कायदा सुव्यवस्था स्थिती, मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसह अवकाळी पावसावरील उपाययोजना अशा सर्व विषयांवर मुख्यमंत्री शिन्दे यांनी सविस्तर माहिती दिली. मराठा समाजाला दिलेले आरक्षण नक्की टिकेल, असा विश्वास व्यक्त करून विरोधकांच्या बदलत्या भूमिका लक्षात घेता आप अंदर से कुछ और, बाहर से कुछ और नजर आते हो.. असेही शिन्दे म्हणाले.
डबल इंजिन सरकारची गाडी वंदे भारतच्या वेगाने पळत असते. पंतप्रधान मोदी यांना जगातील लोकप्रिय नेता असे सर्वेक्षणातून जग मानत आहे. त्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला हवा. तुम्हाला अडीच वर्षांत नाही जमले ते काम आम्ही पावणेदोन वर्षांत करून दाखवलंय. पूर्वी पेपरमधे रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या असायच्या. पण आज नेशन फर्स्ट आहे. पूर्वी करप्शन फर्स्ट असायचे. त्यामुळे आम्हीही मोदीजींच्या मागे राहू. आता जनताच ग्यारन्टी देतेय की एक बार फिर मोदी सरकार.. त्यामुळे मोदीजींने उभे केले राष्ट्र, त्यामुळे मोदीजींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र.. असे सांगत मुख्यमंत्री शिन्दे यांनी ७८-७९ मिनिटांचे आपले भाषण संपवले.