दक्षिण कमांडच्या सर्व तोफखाना एककांनी आणि विभागाने 197वा गनर्स डे नुकताच साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरी 28 सप्टेंबर 1827 रोजी स्थापन केली गेली. स्थापनेपासून ती अखंडित सेवेमध्ये असल्यामुळे, तिचा स्थापना दिन दरवर्षी गनर्स डे म्हणून साजरा केला जातो.
तोफखानाच्या रेजिमेंटला आपल्या समृद्ध परंपरेचा आणि पराक्रमाच्या गौरवशाली भूतकाळाचा अभिमान आहे. या रेजिमेंटला युद्ध आणि शांततेच्या काळात तसेच परदेशातील मोहिमांमध्ये देशाची सेवा करण्याचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला, त्या प्रत्येक वेळी या रेजिमेंटने त्या संकटावर विजय मिळवला. सध्याच्या दहशतवाद विरोधी कारवायांमधील उत्कृष्ट योगदानाबद्दलही तोफखाना दलाला सन्मानित करण्यात आले आहे. व्यावसायिक उत्कृष्टता, निःस्वार्थ समर्पण आणि कर्तव्याप्रति निष्ठा, ही या रेजिमेंटची ओळख आहे. शत्रूंबरोबरच्या सर्व मोठ्या संघर्षांमध्ये, तसेच संकटे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी रेजिमेंटने देशाची सेवा केली आहे.