HomeArchiveहवा खराब आहे,...

हवा खराब आहे, आरोग्य सांभाळा!

Details
“हवा खराब आहे, आरोग्य सांभाळा!”

    10-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी,  मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

vinodsalvi1@gmail.com

दूषित हवेमुळे देशात प्रत्येक आठजणांपैकी एकाचा मृत्यू होतो. इतकेच नाही तर देशात तंबाखूपेक्षा ही हवेचे प्रदूषण अधिक घातक आहे, हा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकताच दिला आहे. यावरून आपल्या अवतीभवती वाढलेलं हवेचं प्रदूषण आपल्या जीवावर कसे उठले आहे, याचा अंदाज आलाच आहे. फक्त बाहेरची नव्हे तर आपल्या घरातील हवाही प्रचंड दूषित आहे, हेही आता जाणवू लागलं आहे. नोएडा, उत्तर प्रदेश गौतम बुद्ध नगर येथे वायू प्रदूषण रोखण्याचे नियमन पाळल्याने बांधकाम क्षेत्रातील १८  जणांना अटक झाली. बांधकामा दरम्यान धूळ रोखण्याचे उपाय न योजल्याने देशपातळीवर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली असावी. प्रदूषणामुळे मुंबई, महाराष्ट्रात होणारी घुसमटही अगदी आपल्या प्रत्येकाच्या गळ्यापर्यंत आली आहे. गाव, शहर, वस्त्यांन्या खेटून उभ्या असलेल्या उद्योगनरीतून पसरणारा धूर इथल्या प्रत्येक माणसांचे आर्युमान घटवत आहे.

कुणाचं आईपण, कुणाचं बालपण, कर्करोग, क्षयरोग, त्वचारोग, श्वसनाचे नाना विकार आणि व्याधींनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि आसपासच्या शहरातील लोकांना कधीच ग्रासले आहे. घरातील भांडीकुंडी, भिंतींवरही प्रदूषणाच्या काळ्या डागांचा मळवट बसू लागला आहे. डोंबिवली एमआयडीसी, महाड एमआयडीसी, चेंबूर रिफायनरीच्याकडेला राहणारा माणूस कसा जगतो आहे, हे पाहण्यासाठी जरा इथे माणुसकीच्या नात्याने सरकारच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारायला काहीच हरकत नाही. चेंबूर माहुल परिसरातील ८० टक्के नागरिकांचे आर्युमान याच दूषित हवेमुळे कमी झाले आहे. क्षयरोग, श्वसन विकारानेग्रस्त नागरिकांच्या मृत्यूचे तांडव इथे सुरूच आहे. गावाशेजारी उभ्या राहिलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे गावाचं गावपण कधीच हरवलं आहे. त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे इथे प्रत्येक हवेच्या कणाकणात प्रदूषण सामावले आहे. माहुल, डोंबिवली व महाड एमआयडीसीसारख्या असंख्य भागात प्रदूषणाचा भस्मासूर माणसाच्या जीवावर उठला आहे.

देशात गेल्या वर्षी फक्त हवा प्रदूषणामुळे १७.४ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल सांगतो. त्यामुळे दिल्ली, मुंबई सम-विषम असे काहीच राहिले नाही. प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या दिल्लीतील केजरीवाल सरकारला नुकताच राष्ट्रीय हरित लवाद आयोगाने कोटीचा दंड ठोठावला. ही दंडवसुली आता प्रत्येक राज्याच्या सरकारकडून सुरू झाली तरी हे प्रदूषण रोखता येईल का, हाच खरा यक्ष प्रश्न आहे. या प्रदूषणामुळे देशातील ७७ टक्के नागरिकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. जर-तरच्या भाषेत बोलायचं तर शुद्ध हवा मिळाल्यास प्रत्येक नागरिकाचे आयुष्य सरासरी सात  महिन्यांनी वाढू शकते, असेही हा अहवाल सांगतो. पण, हे प्रदूषण रोखणार कोण? देशात दरवर्षी एक लाख नागरिकांपैकी ६२ जणांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो तर ४९ जणांचा मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे होतो हे वास्तव स्वीकारून आता तरी आपले व सरकारचे डोळे  उघडणार का, हीच मोठी चिंता आहे.

हवा प्रदूषणामुळे गर्भपाताचा धोकाही वाढला आहे. हवेतील अतिसूक्ष्म कण, नायट्रोजन ऑक्साईड आणि ओझोनचे प्रमाण वाढल्यानंतर तीन ते सात दिवसांत गर्भपाताचा धोका संभवतो, असे ‘आयएमसीआर’चे संशोधन सांगते. नाना आजार, व्याधी पसरवणार्‍या हवा प्रदूषणामुळे देशातील नागरिकांचे आर्युमान ७० वर्षांच्या खाली आले आहे. प्रदूषणाच्या क्रमवारीत फास्ट असलेल्या दिल्लीला मागे टाकून महाराष्ट्राने कधीच आघाडी घेतली आहे. उत्तरप्रदेशने प्रदूषणात महाराष्ट्रानंतर दुसरे स्थान पटकावले आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये प्रदूषणामुळे होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत. तोंडाला मास्क बांधून शाळेत जाणारी शाळकरी मुले, नागरिक हे चित्र दिल्लीत मोठ्या प्रमाणावर दिसत असले तरी देशातील इतर शहरेही प्रदूषणाच्या धुराने काळवंडून गेली आहेत. इथेही अनेकांची घुसमट सुरू आहे. महाराष्ट्रात वायू प्रदूषणामुळे वाढलेला मृत्यूदर पाहता वेळीच उपाय योजना न झाल्यास आपल्या प्रत्येकाला येत्या काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकर्त्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रात एक लाख आठ हजार ३८ जणांचा मृत्यू वायू प्रदूषणाने झाला. आपला महाराष्ट्र प्रदूषणाच्या क्रमवारीत देशात दुसरे राज्य ठरले आहे. एक लाख लोकांमध्ये ८६.९ मृत्यू हे प्रदूषणाशी संबंधित तक्रारीवरून झाल्याचे लॅनसेट प्लॅनिटरी हेल्थ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांनाही याखराब हवेची बाधा मोठ्या प्रमाणात पोहोचते. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्यसरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय निश्चित स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही या निर्णयावर अंमल करून प्लास्टिकला आपल्या दिनचर्येतून वजा केले. याच निर्णयाची पुनरावृत्ती करताना वायू प्रदूषण रोखण्यासाठीही जनता व सरकारने वेळीच हातात हात घातला पाहिजे. तरच शहरा-शहरांत धुक्यांऐवजी दिसणारं प्रदूषणाचं धुरकं दूर होईल.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content