HomeArchiveसोमय्यांना दाखविला धनुष्य...

सोमय्यांना दाखविला धनुष्य बाण!

Details
सोमय्यांना दाखविला धनुष्य बाण!

    06-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
देवीच्या जत्रेत कोणाच्या ना कोणाच्या अंगात देवी येत असते आणि बघे त्याकडे पाहत असतात. असंच, भाजपा, खासदार किरीट सोमय्या यांच्या अंगात कोणतं वारं आलं आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वारेमाप आरोप करायला सुरूवात केली. प्रथम राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सिंचन प्रकरणावर माहितीच्या अधिकार माध्यमातून आरोप करत राजकीय धुळवड सुरू केली. या सर्वांना जेलमध्ये दिवाळी साजरी करायला लागणार आहे, असे पत्रकार परिषदेत डरकाळी फोडत स्वतःचा व भाजपाचा टीआरपी वाढवत होते. पत्रकारांनाही ब्रेकिंग न्यूज आयती मिळत होती. राजकीय नेत्यांनी पोलखोल करताना त्यांच्या चेहऱ्यावरील विखारी हावभाव बघताना चार्टर्ड अकाऊंटंट आणि अभ्यासू माणूस इतका विकृत कसा असू शकतो, असा प्रश्न पडायचा.

राजकीय नेते काय नि मंत्री काय, भ्रष्टाचार हा त्यांच्या रक्तातच असतो. पक्षासाठी व कार्यकर्ते जगविण्यासाठी जनहिताच्या प्रकल्पाची कामे राबवताना प्रकल्पाची रक्कम दुप्पट, तिप्पट होते, त्याला कारण पक्ष फन्ड. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले होतेच की, केंद्र सरकारने प्रकल्पासाठी दिलेल्या एक रूपयातील फक्त दहा पैसे योजनेसाठी खर्च केले जातात. उरलेले ९० पैसे कोणाकडे वळतात याबाबत माहिती त्यांनी सांगितले नसले तरी मंत्री, राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील संगनमताने या ९० पैशावर हात मारला जातो हे आम जनतेला माहित आहे. सरकारी योजनेवर दहा पैसे खर्च होणे हा प्रकार देश स्वातंत्र्य झाल्यापासून होत आहे. परंतु त्यात गेल्या ७० वर्षांत काहीही फरक पडला नाही. सरकारमान्य अशाप्रकारे हा कारभार चालला होता आणि बिनदिक्कत ते चालू आहे.

केंद्रात काँग्रेसने ५० वर्षांहून अधिक वर्षे सत्ता भोगली. परंतु सरकारी योजनेवर जास्तीतजास्त रक्कम खर्च का व कसा होतो याचा काँग्रेसने कधीच विचार केला नाही. डॉ. मनमोहन सिंह दहा वर्षे पंतप्रधान असताना २जी, ४जी, कोळसा खाण, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील भ्रष्टाचार उघडकीस आला. याचा फायदा भाजपाला मिळाला आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली बहुमताचे सरकार आले. केंद्रात पूर्ण बहुमत मिळाल्यावर भाजपाने मित्र पक्षांनाही वाळीत टाकायला सुरूवात केली. त्याची सुरूवात ३० वर्षांचा मित्रपक्ष शिवसेनेला अपमानित करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपाने विशेषतः त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार असताना अनंत गीते यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योगसारखे दुय्यम खात्याचे मंत्रीपद देऊन शिवसेनेची बोळवण केली. परंतु शिवसेनेपेक्षा कमी खासदार असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमचे खासदार कमी असूनही त्यांच्या खासदारांना हवाई वाहतूक खात्यासारखे महत्त्वाचे व मलई देणारे खाते देण्यात आले. नंतर तेलगू देसमने भाजपाच्या एनडीएशी काडीमोड घेतला. लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांना अन्न व ग्राहक संरक्षक खाते देऊन सेनेला अपमानित करण्यात आले. तोच प्रकार राज्यात सेनेला उपमुख्यमंत्री पद वा क्रिम खाते न देता त्यांची वाघनखे काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले नाही आणि तेव्हापासून शिवसेना आक्रमक झाली.

शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर प्रदेश, बिहारी यांची मते मिळविण्यासाठी त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री, भाजपा नेते यांना प्रचारासाठी मुंबईत आणले. शिवसेनेला प्रांतवादी म्हणणाऱ्या भाजपाला इतर राज्यातून ताफा मागवावा लागला. शिवाय खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या पालिका कारभारवर टीकास्त्र सोडले. पालिकेतील काळ्या यादीतील कंत्राटदारांकडून मातोश्रीवर मलिदा पोहोचवला जातो असे आरोप करत वांद्र्याचा माफिया म्हणण्यापर्यंत किरीट सोमय्या यांची मजल गेली. शिवसेना ही मुंबईतील मराठी माणसाचे आशास्थान आहे. मुंबईत मराठी टक्का कमी असला तरी मुंबई महापालिका इतर भाषिकांच्या हातात गेली तर ते मराठी माणसाला मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो सहन करू शकत नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई आणि मुंबईचे मराठीपण याबाबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’ असा इशारा दिला आणि मराठी माणसांनी शिवसेनेला भरभरून मते देऊन पालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली. तोच प्रकार किरीट सोमय्या यांच्या ‘वांद्र्याचा माफिया’ या विधानामुळे मराठी मने दुखावली आणि शिवसेना पालिका सेनेकडे ठेवण्यात यशस्वी ठरली. मात्र मुंबईतील गुजराती, मारवाडी, जैन, बिहारी आणि युपीतील भय्ये मराठी माणसाचं खच्चीकरण करण्यासाठी कसे एकत्र येतात त्यासाठी त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्री मुंबईत येऊन सेनेच्या विरोधात बोलत होते याचा मराठी मनाला झालेल्या वेदना यापुढे कायम राहणार आहे. वांद्र्याचा माफिया अशी टीका करून किरीट सोमय्या यांना मराठी माणूस कायमचा कडवा विरोध करणार ही काळ्या दडगडावरील रेघ आहे. सोमय्या यांची पत्नी मराठी आहे त्यांनी आपल्या पत्नीला या विधानाबाबत विचारावे म्हणजे त्यांना पत्नीच्या रक्तातील ‘मराठी बाणा’ कसा असतो हे लक्षात येईल.

शिवसेनेवर जहरी टीका करण्याचे कंत्राट दिल्लीतील श्रेष्ठींनी दिल्याशिवाय सोमय्या टोकाची भूमिका घेणार नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर हल्लाबोल करून त्यांनी जनमानसात स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करण्यात यश मिळविले. परंतु त्याचे परिणाम ईशान्य मुंबईत लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सेनेची मदत घेण्यासाठी त्यांना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले. त्यांच्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदीही धावून आले नाहीत. दगाफटका मराठी मनाला पटत नाही. दगाफटका केला तर त्याला जिवंत ठेवले जात नाही, असे विधान एका चिनी विद्वानाने हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. किरीट सोमय्या आज आहेत, पण त्यांची अवस्था मेल्यागत झाली आहे. राज्यसभेत गेले तरी किंवा त्याना बक्षिसी म्हणून मंत्रिमंडळात घेतले तरी तो मराठी माणसाचा अपमान होईल. त्यामुळे भाजपा श्रेष्ठींसमोर एक मोठी अडचण उभी राहणार आहे. किरीट सोमय्या यांचा उथळपणा त्यांना नडला. विरोधकांना आणि मित्र पक्षाला टार्गेट करताना भाजपा हा धुतल्या तांदळासारखा असल्याचे ते भासवत होते. त्याचवेळी वृत्तपत्रात मुकेश, अनिल अंबानी, अदानी, निरव मोदी, चोक्सी यांची प्रकरणे गाजत होती. त्याबाबत सोमय्या काहीच बोलायला तयार नाहीत. काही उद्योगपतीच्या मागे किरीट सोमय्या लागले आणि भाजपा नेते हडबडले. पक्षांचे भवितव्य धोक्यात येणार हे लक्षात आले आणि सोमय्यांना अडगळीत टाकण्याचा श्रेष्ठींकडून निर्णय घेण्यात आला. नाहीतरी सोमय्या हे एक विक्षिप्त माणूस म्हणून पक्षात ओळखले जातात. हट्टी, स्वतःला अतिशहाणे, अमित शाह, नरेंद्र मोदींचा खास माणूस म्हणून ते स्वतःला समजत होते. पण सर्व खेळ त्यांच्या अंगाशी आला.

राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात भाजपाचे सरकार सत्तेतून पायऊतार झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जमिनीवर आले. उत्तर प्रदेशनंतर खासदारांची मोठी संख्या असलेले महाराष्ट्र भाजपासाठी महत्त्वाचे होते. सेनेशी युती केल्याशिवाय भाजपाकड़े मार्ग नव्हता आणि अमित शाहंना मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले. शिवाय उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे कर्जमाफी, मुंबईकरांसाठी ५०० स्क्वे. फूटांपर्यंत असलेल्या सदनिकांना मालमत्ता कर माफ या प्रकरणांना न्याय दिला. जिथे दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेनेपुढे शरणागती पत्करली तिथे किरीट सोमय्या कोण? राजकारण म्हणजे नवरात्रीतील दांडिया खेळ नाही. पोरकटपणा आणि विक्षिप्तपणा या अवगुणाने सोमय्या राजकारणात भविष्यात दिसतील की नाही ही शंका आहे. कारण भाजपालाही डोईजड होणारी माणसे नको आहेत. भाजपाने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि कार्यभाग साधला.”
 

Continue reading

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...
Skip to content