HomeArchiveसूर्य मावळला..

सूर्य मावळला..

Details
सूर्य मावळला..

    25-Mar-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर पाच वर्षांपूर्वीच झाली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अडवाणी अडगळीत पडले ते कायमचेच. वास्तविक 1984 साली, इंदिराजींच्या दुर्दैवी हत्त्येनंतर, देशात काँग्रेसची लाट आली. या लाटेत भारतीय जनता पक्ष भुईसपाट झाला. त्यांचे अवघे दोन खासदार निवडून गेले. पक्षाचे दोन बुजूर्ग नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हेदेखील पराभूत झाले. अवघ्या चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाला हा जबर धक्का होता. पण या दोन नेत्यांनी स्वत:ला सावरत पक्षालादेखील सावरले. त्या काळात अटलजी आणि अडवाणीजी यांची खिल्ली उडविताना काँग्रेसवाले त्यांना उद्देशून म्हणत, `हम दो, हमारे दो’. म्हणजे भाजपचे दोन नेते आणि दोन खासदार. पक्षाची इतकी वाईट अवस्था झाली असताना पक्ष उभा करणे म्हणजे शुन्यातून विश्व निर्माण करण्यासारखे होते. पण तो पराक्रम अटलजी आणि अडवाणीजी यांनी करून दाखविला.

90 च्या दशकात बाबरी मशीद पाडल्यानंतर अडवाणी पायाला भिंगरी लावून देशात फिरू लागले. त्यांच्या रथयात्रा गाजू लागल्या. अर्थात आमच्यासारख्या पुरोगामी लोकांचा त्यांच्या या आंदोलनाला विरोधच होता. देशात फूट पाडण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू होते. पण आपले जहाल हिंदुत्व अडवणीजींनी कधी लपविले नाही. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादाचा, राम मंदिराच्या मुद्द्याचा व्यवस्थित वापर केला. त्यामुळे इतर पक्षातील हिंदू मतेदेखील भाजपकडे आकर्षित झाली. भाजपची मुळे देशभर पसरू लागली. 1984 च्या निवडणुकीत भाजप भुईसपाट झाला होता. तोच पुढील सात-आठ वर्षांत झपाट्याने वाढला. तो वाढविण्यात लालकृष्ण अडवाणी यांचा अर्थातच सिंहाचा वाटा होता. पण वाऱ्याची दिशा ओळखण्याइतके अडवाणी मुरलेले राजकारणी होते. भाजपला सत्तेवर आणायचे असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा सर्वमान्य नेता हवा, हे त्यांनी ओळखले. त्यातूनच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी अटलजींच्या नावाची घोषणा केली.

अटलजींच्या ध्यानीमनी नसताना अडवाणींनी त्यांचे नाव पुढे केले. आपल्या सर्व महत्त्वाकांक्षांना मुरड घालून त्यांनी हे केले. केवळ पक्षाचे हित नजरेसमोर ठेवून त्यांनी हा त्याग केला. पुढे गुजरातमध्ये झालेल्या दंगलींनंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काढण्याची मागणी जोर धरू लागली. त्यावेळी अटलजींनीदेखील मोदींनी राजधर्म पाळला नसल्याचे नाराजीने बोलून दाखविले. तेव्हा मोदी यांचे मुख्यमंत्रीपद वाचविण्याचे काम अडवाणींनी केले. किंबहुना, त्यावेळी मोदी सत्तेत राहिले म्हणूनच पुढे ते पंतप्रधान झाले. देशातील सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतर मोदींकडून अडवाणी यांच्या कार्याचे चीज व्हावे, अशी अपेक्षा होती. पण राजकारण हा उलट्या काळजाच्या माणसांचा खेळ असतो. तेथे अनेक निर्णय गेंड्याच्या कातडीने घ्यायचे असतात. मोदी यांनी तेच केले. अडवाणी यांना महत्त्वाचे मंत्रीपद तर सोडाच पर इतर कोणतेही पद मिळणार नाही याची दक्षता घेतली. त्यानंतर एक मार्गदर्शक मंडळ बनविण्यात आले. त्यात अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आदींचा समावेश करण्यात आला. पण या मार्गदर्शक मंडळाकडे कधीही मार्गदर्शन मागितले गेले नाही. त्यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवले गेले.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अडवाणीजींचा विचार होईल ही अपेक्षादेखील फोल ठरली. दरम्यान, नव्वदी ओलांडलेले अडवाणीजी निवडणुकीच्या दृष्टीने निरूपयोगी ठरू लागले. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी अडवाणींची भेट घेतली. त्यांना गांधीनगरमधून पक्षाची उमेदवारी देऊ केली. पण अडवाणींनी त्याला नकार दिला. आपल्या मुलाला किंवा मुलीला उमेदवारी देण्याची शाहंची ऑफरदेखील त्यांनी नाकारली. अडवाणी हे ऐकेकाळी भारतीय जनता पक्षाचा तळपता सूर्य होते. पण 2019 साली भारताच्या राजकीय क्षितिजावरून हा सूर्य मावळल्याचे दिसून आले आहे. अडवाणीजींच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा झालेला अंत निश्चितच दु:खद आहे.”
 

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content