HomeArchiveसपा-बसपा युती झाली...

सपा-बसपा युती झाली खरी..

Details
सपा-बसपा युती झाली खरी..

    14-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
“मोदी येईल, एक भाषण करेल व आम्ही जिंकू हा भ्रम बाळगू नका!” असे वाक्य कोणी मोदींचे विरोधक बोलला असेल असे जर कुणाला वाटले तर ते चूक ठरेल. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे उद्गार दिल्लीत रामलीला मैदानावर केलेल्या दीड तासाच्या भाषणात काढले. मोदी आले म्हणजे लोकसभेची तुमची जागा जिंकली असे होत नाही. जिथे प्रत्येक बुथवर काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उभा आहे तिथेच तुम्ही जिंकू शकता. माझा बुथ सर्वात बळकट असला पाहिजे या ईर्षेने कार्यकर्त्यांनी कामे केली पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

देशभरातून बारा हजार प्रमुख नेते, कार्यकर्ते भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी दिल्लीच्या रामलीला मैदनावर जमले होते. तिथे बोलताना पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता आहे. मतदान एप्रिल-मेमध्ये होईल. एकदा का तारखा जाहीर झाल्या की सर्वच पक्षांची मोठी धांदल उडणार आहे. त्यामुळे भाजपाने देशभरातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना वेळेतच सावध व सजग करण्यासाठी दिल्लीत एकत्र गोळा केले होते. तिकडे उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादवांची बहुचर्चित युतीही साकारली. त्यात अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसला खड्यासारखे दूर ठेवले आहे. मोदींचे भाषण रामलीला मैदानवर सुरू होण्याच्या आधी लखनौमध्ये 24 वर्षांची कडवी दुष्मनी संपवून हे दोन मोठे पक्ष, मोदी व शाहांच्या भाजपाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाले होते.

2019च्या लोकसभेची लढाई आता अधिकाधिक गतीने रंगू लागलेली आहे. कोण कुणाच्या विरोधात व कुणाच्या बाजूने उभे राहणार हे दिवसागणिक स्पष्ट होते आहे. मोदींनी रामलीला मैदनावरून देशाला साद घातली की तुम्हाला मजबूत सरकार हवे आहे की मजबूर सरकार हवे आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे. साठ वर्षांत काँग्रेसने जितके काम केले नाही त्याच्यापेक्षा अधिक काम, अनेक पायाभूत क्षेत्रात भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केले असा त्यांचा दावा तसा जुनाच आहे. पण काल मोदींनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तिखट हल्ला करताना मोदींनी म्हटले की, 2006नंतर देशात कर्ज मिळवण्याच्या दोन पद्धती अस्तित्त्वात आल्या. एक नेहमीची, बँकांची पारंपारिक पद्धती. त्यात तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दहा-वीस लाखांचे कर्ज मिळू शकत होते आणि त्याची परतफेड काय वाटेल ते झाले तरी तुम्हाला करावीच लागत होती. मात्र, काँग्रेसची कर्जवाटपाची जी पद्धत होती त्यात नामदाराचा एक फोन बँकेला जात होता आणि शेकडो हजारो कोटी रूपयांचे कर्ज दिले जात होते. हे कर्ज परत करण्यासाठी दुसरे कर्ज आणि ते परत करण्यासाठी तिसरे कर्ज मिळत होते. ही सारी कर्जे बुडवून तुम्हाला परदेशात निघून जाण्याचीही मुभा काँग्रेसच्या कर्जपद्धतीत मिळत होती. हा एक मोठा व थेट आरोप करताना मोदी म्हणाले की, 2006पर्यंतच्या साठ वर्षांत बँकांनी देशात सर्व मिळून 18 लाख कोटी रूपयांची कर्जे दिली आणि नंतरच्या काळात मात्र 2014पर्यंत याच कर्जांचा आकडा झाला होता 54 लाख कोटी रूपये.

हा काँग्रेस राजवटीवर मोठा आरोप आहे आणि या आरोपाचे उत्तर तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम, प्रणव मुखर्जी व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंहांना द्यावे लागेल. ते देतीलही. पण, या भाषणात काँग्रेसवरील हल्ल्याची रूपरेषाच पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. मजबूत सरकार हवे की व मजबूर सरकार, असा सवाल देशातील जनतेला करताना मोदींनी राहूल गांधींचे नाव न घेता म्हटले की, अठरा तास काम करणारा प्रधानसेवक हवा की दर दोन महिन्यांनी परदेशात सुटीसाठी फिरणारा कर्मचारी हवा, हे देशाने ठरवायचे आहे. गंमत म्हणजे इकडे पंतप्रधानांचे हे भाषण दिल्लीत सुरू असताना राहुल गांधी परदेशताच होते. नंतर त्यांनी अबुधाबीमधून पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केले. उत्तर प्रदेशात काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार तर आहेच पण, आम्ही उत्तर प्रदेशातल्या जनतेला आश्चर्याचा मोठा धक्का देऊ शकतो, असे राहुल म्हणाले. काय असेल हा आश्चर्याचा धक्का? त्यांना असेही म्हणायचे असू शकेल की मायावती, अखिलेश यांच्या युतीपेक्षा उत्तर प्रदेशात निवडणुकीत काँग्रेस अधिक मजबूत झालेली दिसेल. दुसरा आश्चर्याचा धक्का असू शकतो तो वाराणसीमध्ये उमेदवार कोण हा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये लोकसभेच्या दोन जागा लढवल्या होत्या. अहमदाबाद आणि वाराणसी अशा दोन मतदारसंघांमधून ते विजयी झाले होते. नंतर त्यांनी गुजरातच्या खासदारकीचा राजीनामा देऊन वाराणसी हाच आपला मतदारसंघ ठेवला. त्यामुळे ते सध्या उत्तर प्रदेशताली वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतात. तिथे त्यांना आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा एकच उमेदवार म्हणून गुजरातचा पटेल नेता हार्दिक पटेल याला मोदींच्या विरोधात उभा करण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे. त्या संदर्भातही राहुल यांचे ते सूचक वक्तव्य असू शकेल. मायावती व अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसला थेट डावलल्यामुळे आता काँग्रेस-सपा-बसपाच्या महाआघाडीमधून वगळल्या गेलेल्या अन्य छोट्या-मोठ्या पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात तिसरा पर्याय उभा करणार असे दिसते. समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि अखिलेश यादव यांचे पिताजी मुलायम सिंह हेही बसपाप्रणित आघाडीत नाहीत. त्यांचे बंधु शिवपाल यादव यांनी सवतासुभा स्थापन करून पुतण्याला आव्हान दिले आहे आणि मुलायम त्यांच्या पक्षासोबत गेले आहेत. मुलायम-शिवपाल काँग्रेससोबत उभे राहू शकतात. अखिलेश आणि मयावतींनी उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या सर्व 80 जागा आपापसात वाटून घेतल्या आहेत.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी प्रत्येकी 38 जागा लढणार आहे तर काँग्रेसच्या दोन जागांवर ते उमेदवार देणार नाहीत. सोनिया गांधींची जागा अमेठी आणि राहुल गांधींची जागा रायबरेली इथे हे दोन्ही पक्ष उमेदवार उभा करणार नाहीत. या दोन जागा दोघांनी सध्या मोकळ्या ठेवल्या आहेत. पण दुखावलेल्या राहुल यांच्या काँग्रेसने उत्तर प्रदेशातील सर्वच जागा लढवल्याचे ठरवले, तर मग सपा-बसपा काय करणार? सपा-बसपाने आणखी दोन जागांचेही वाटप केलेले नाही. त्या जागा त्यांनी अजित सिंहांच्या राष्ट्रीय लोक दल पक्षासासाठी सोडण्याचे एकतर्फी ठरवले आहे. त्यावर अजित सिंहांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी अखिलेश यादवांबरोबर आधी जी चर्चा केली होती त्यात रालोदसाठी त्यांनी सहा लोकसभा जागांची मागणी केली होती. पूर्व उत्तर प्रदेशात अजित सिंहांच्या पक्षाला चांगला जनाधार आहे. पण सपा-बसपाने त्यांना किंमत दिलेली नाही. तेही आता दुखावले गेले आहेत. काँग्रेस व रालोद हे एकत्र येऊन अन्य अशाच पक्षांसमवेत तिसरी आघाडी उभी करणार का? तसे झाले तर ती विरोधकांच्या मतांतील मोठीच फाटाफूट ठरेल. तेलंगणात बड्या आघाडीचा प्रयोग फसलाच होता. कर्नाटकात निकालानंतरची काँग्रस-जनता दल आघाडी रडतखडतच चाललेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता व आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू काँग्रेसला तितके महत्त्व द्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रातही शरद पवारांनी काँग्रेसची अडवणूक काही जागांवर सुरू केलेलीच आहे. या स्थितीत भाजपाविरोधात राहुल गांधींना विरोधकांची जी बडी आघाडी उभी करायची आहे त्याचे काय होणार, हे प्रश्नचिन्ह कायमच आहे.”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content