HomeArchiveविखे-पाटलांचे असेही बंड!

विखे-पाटलांचे असेही बंड!

Details
विखे-पाटलांचे असेही बंड!

    04-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वत:च्या राजकीय पक्षाची शिस्त राखून पक्षसंघटनेचे हित सांभाळायचे असते. जबाबदारी आणि कर्तव्यभावना निभावून न्यायची असते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात विपरित, विचित्र असेच घडत आहे. ज्यांनी नेतृत्त्व करायचे, पक्षाची ताकद वाढवायची, त्यांनीच दुराग्रह आणि हटवादी भूमिका घेतली तर कसल्या निष्ठा आणि कसली पक्षशिस्त? राज्यात सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजकीय भूमिकेद्दल उलट-सुलट चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शाह-मोदी या जोडगोळीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस महाआघाडीच्या माध्यमातून कुठे धिराने उभा राहिला असताना त्या पक्षालाच संकटात टाकून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुत्रप्रेमाने समोरच्या सत्ताधारी शत्रूपक्षाला म्हणजे भाजपला थेट मदत केली आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना तीच जागा पुत्र सुजय याच्यासाठी हवी असा हट्ट विखे-पाटलांनी धरला. पुत्रप्रेम समजू शकते. मात्र ज्या काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले. पक्षात मानाचे स्थान दिले. केंद्रीय वर्किंग कमिटीत सहभागी करुन घेतले. त्याच विखेंनी काँग्रेसचे चांगलेच पांग फेडले. याला काय म्हणायचे?

शरद पवारांशी जागा प्रतिष्ठेची करून मुलास म्हणजे डॉ. सुजय विखे-पाटील यांना बंड करण्यास राधाकृष्ण विखे-पाटलांनी भाग पाडले. विखेंची खेळी यशस्वी झाली नाही. सोनिया गांधीचे दरवाजे ठोठावून पुत्रहट्ट पुरा करता न आल्याने राधाकृष्ण विखे-पाटील पक्षात एकटे पडले. जे आपलं नाही, तेच मागायचं. म्हणजे मिळालं नाही की बंडाचा मार्ग मोकळा होतोच. विखे-पाटील विरोधी पक्षाचे नेते राहूनही त्यांचे भाजप प्रेम काही लपून राहिले नाही्. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळेच गेल्या साडेचार वर्षांत राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला कधी अंगावर घेतल्याचे चित्र विधानसभेत किंवा विधानभवनाच्या बाहेर म्हणजेच रस्त्यावर दिसले नाही. सत्ताधारी पक्ष नव्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कायम आक्रमक राहिले. विरोधी पक्ष कमालीचा कमजोर आणि हतबल होता.

आज राधाकृष्ण विखे-पाटील पुत्रप्रेमामुळे काँग्रेस पक्षालाच आव्हान देत सुटले आहेत. शरद पवार आणि विखे-पाटलांचे हाडवैर जुनेच आहे, आणि ते अद्याप कायम आहे. हेच पवारांनी दाखवून दिले आहे. काँग्रेसला जागा सोडली असती तरी सुजय निवडून येईल याची खात्री बाप राधाकृष्ण विखे-पाटील यांना नसावी. त्यामुळेच सुजयच्या हाती भाजपा झेंडा देण्याची वेळ विखे-पाटलांवर आली. आता शिवसेनेची मदत घेण्याची आफतही त्यांच्यावरही आली आहे. शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर विखे-पाटलांनी जहरी टीका केली आहे. ती ठाकरेंनाच विसरावी लागणार आहे. कारण शिर्डीशिवाय सुजय यांची लढाई सोपी नाही. अजित पवारांचे पुत्र असलेल्या पार्थ पवारांना आजोबा तिकीट देऊ शकले. मात्र पिताश्री राधाकृष्ण विखे-पाटील त्यांच्या चिरंजीवांना काँग्रेस पक्षाचे तिकीट देण्यास सपशेल अयशस्वी झाले. काँग्रेसचे तिकीट नाही, पण भाजपची उमेदवारी सुजय यांना विखे-पाटलांनी मिळवून दिली. त्यांच्या या कर्तबगारीचे कौतुक व्हायलाच पाहिजे. मात्र पार्थ यांना मिळालेली मावळची उमेदवारी मान्य नसावी. सुजय सत्तावीस वर्षांचा नाही, की त्यांच्याकडे चांगले वक्तृत्त्व नाही, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. थोडक्यात पार्थपेक्षा सुजय सुयोग्य उमेदवार आहे, असे विखे-पाटलांनी नमूद केले आहे.

दुसरीकडे भाजपच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने आंदोलनं केली असली तरी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून या आघाडीत कमालीचा संघर्ष पेटला. नगरच्या एका जागेसाठी विखे-पाटील अडून बसले. हे कोणत्या नैतिकेत बसते? पुत्रप्रेमासाठी पक्षालाच खड्ड्यात घालणारा नेता कसा असू शकतो? विखे-पाटलांचा पवारविरोध काही नवा नव्हे. पवारांनी विखेंना सत्तेजवळ फिरकू दिले नाही. सत्तेसाठी विखे-पाटील पिता-पुत्रांना शिवसेनेचा झेंडा हाती घ्यावी लागला. हा इतिहास ताजा आहे. सत्तेसाठी विखे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. शिवसेनेवर राधाकृष्ण विखे-पाटलांनी कायमच जहरी टीका केली. निष्ठांचा मुद्दा त्यांना लागू पडत नाही. आज काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पक्षशिस्त मोडल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून ते वाट पहात आहेत. पण काँग्रेस त्यांना मोकळे सोडणार नाही. सात महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणारच आहे. चिरंजीव पुढे गेले आहेतच. पिताश्री रांगेत आहेत. त्यामुळे कारवाईची घाई काँग्रेस कशाला करील?

विखेंना पक्षनिष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते हेच त्यांनी दाखवून दिेले आहे. सगळं काही आपल्यालाच आणि आपल्या मुलांना, नातेवाईकांनाच मिळायला हवं. हा सर्वच राजकीय नेत्यांचा अट्टाहास असतो. पक्षनिष्ठा केवळ शब्दच राहतात. सत्ताधारी मस्तवाल होत असताना विरोधी शक्ती एक होण्याची नितांत आवश्यकता असताना प्रत्यक्षातील चित्र मात्र वेगळं आहे. काँग्रेस दुबळी होत असताना स्वार्थी नेते ती अधिक दुबळी करीत आहेत. याला काय म्हणायचे? राधाकृष्ण विखे-पाटील हे दिसतात तसे साधे नाहीत. पुढच्या पिढीची ते काळजी घेत आहेत. त्यात गैर नसले, तरी मार्ग चुकीचा ठरतो. कोणता आदर्श ते घालून देत आहेत?”
 

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content