HomeArchiveराजमातांच्या स्मरणार्थ 100...

राजमातांच्या स्मरणार्थ 100 रुपयांचे नाणे!

Details
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे सोमवारी अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
 
“राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजत आहोत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.”
 
“विजयाराजे यांनी आपल्या पुस्तकामध्ये माझा परिचयात्मक उल्लेख गुजरातमधील ‘युवा नेता’ असा केला आहे, असा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज इतक्या वर्षांनंतर आपण देशाचे प्रधानसेवक म्हणून कार्यरत आहोत.”
 
“भारताला योग्य दिशेने नेण्यासाठी नेतृत्त्व करणाऱ्यांपैकी एक राजमाता विजयाराजे शिंदे होत्या. त्या धडाडीने निर्णय घेणाऱ्या आणि कुशल प्रशासक होत्या. भारतीय राजकारणाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याच्या राजमाता साक्षीदार ठरल्या. मग त्यामध्ये परदेशी वस्त्रांची होळी करण्याचा काळ असो अथवा देशात जारी झालेल्या आणीबाणीचा काळ आणि राममंदिर जनआंदोलनाचा काळ असो, या सर्व महत्त्वपूर्ण घटनांच्या राजमाता विजयाराजे साक्षीदार होत्या. यामुळेच सध्याच्या पिढीला राजमाता यांच्या जीवनकार्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.”
 
“सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी एखाद्या विशिष्ट कुटुंबामध्ये जन्म घेणे आवश्यक नाही, अशी शिकवण आम्हाला राजमातांनी दिली. देशाबद्दल प्रेम आणि लोकशाहीवादी विचारांनी घडलेला स्वभाव असला पाहिजे, असे राजमाता सांगत होत्या. विशेष म्हणजे हाच विचार, आदर्श त्यांनी स्वतःच्या जीवनात ठेवला होता, हे दिसून येते. राजमातांकडे हजारो कर्मचारी होते. भव्य राजवाडा होता आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्याकडे होत्या. तरीही गरीबांच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्या सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्ध होत्या. तसेच समाजाबरोबर सातत्याने संपर्कात होत्या. देशाच्या भविष्यासाठी त्यांनी आपले जीवन त्यागले होते. राजमाता या पदासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी त्या जगल्या नाहीत किंवा त्यांनी त्याचे राजकारणही कधी केले नाही, असेही नरेंद्र मोदी हणाले.”
  

 
“राजमाता विजयाराजेंना अनेकदा विविध पदे स्वीकारण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. परंतु अतिशय नम्रतेने त्यांनी पदांचा स्वीकार करणे नाकारले. एकदा अटलजी आणि अडवाणीजी यांनी त्यांना जनसंघाचे अध्यक्ष होण्याची विनंती केली होती. परंतु राजमाता यांनी आपल्याला कार्यकर्त्या म्हणून जनसंघामध्ये सेवा करणे पसंत असल्याचे नमूद केले होते. राजमाता आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना अगदी नावानिशी ओळखत होत्या. सहकाऱ्यांविषयी भावनिक ऋणानुबंध जोडले गेल्यामुळे त्यांना प्रत्येकाच्या मनात स्थान होते. आदर असावा परंतु गर्व नसावा, हे राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र आहे. राजमातांचे व्यक्तिमत्व अध्यात्मिक दृष्टीनेही महान होते, असेही मोदी यावेळी म्हणाले.”
 
गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक प्रकारे बदल घडून आले आहेत. जनजागृती आणि जनआंदोलनामुळेच या मोहिमांना यश मिळणे शक्य झाले आहे. राजमातांच्या आशीर्वादामुळे देश विकासाच्या मार्गावर प्रगती करीत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
 
“आज देशात नारीशक्ती सर्व क्षेत्रात अग्रगण्य असून प्रगती करीत आहे. महिला सक्षमीकरणाचे राजमातांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार जी पावले उचलत आहे, त्यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी लढा दिला. आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये श्रीराम मंदिर उभारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. हा अद्भूत योगायोग म्हणावा लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशस्वीतेमुळे आपल्याला राजमातांच्या दूरदृष्टीप्रमाणे दृढ, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content