HomeArchiveमाध्यमे आणि मोदी!

माध्यमे आणि मोदी!

Details
माध्यमे आणि मोदी!

    13-May-2019

| 2

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
भारताचे भवितव्य काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे 23 मे रोजी काय होणार? त्यांचे सरकार टिकणार की नवी राजवट भारताला पाहवी लागणार? या साऱ्या विषयांची चर्चा सध्या समजाच्या सर्व स्तरांत तसेच देशी-विदेशी माध्यमांमध्येही रंगत आहेत. एक उत्सुकता आहे, एक अस्वस्थताही आहे. अनेकांना मनातून वाटत आहे की मोदींचेच सरकार पुन्हा येणार! पण कसे? किती मताधिक्याने? किती खासदार घेऊन? राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मोदी शाहंच्या भाजपाच्या व्यतिरिक्त अकाली दल व शिवसेना हे जुने तीन दशकांचे मित्रही आहेत. रामविलास पासवान, नीतीश कुमार, रामदास आठवले, असे काही नव्याने गेल्या चार-पाच वर्षांत मित्र बनलेल्यांचेही पक्ष आहेत. या साऱ्यांच्या मदतीनेच भाजपाचे सरकार स्थापन होईल असे काही मित्रपक्षांनाही वाटत आहे. सेनेचे संजय राऊत तसे म्हणाले आहेत. अकाली नेतेही तेच सांगत आहेत. मोदी मात्र प्रत्येक मुलाखतीत स्पष्टपणाने, पूर्ण विश्वासाने सांगत आहेत की सरकार एनडीएचेच असेल. पण भाजपाची स्वतःची ताकदही मागच्या लोकसभेपेक्षा अधिक वाढलेली दिसेल. आमचे खासदार अधिक संख्येने तर जिंकतीलच, पण विजयाचे मताधिक्यही अधिकच असेल. आमच्या मित्रपक्षांच्या खासदारांचीही संख्या लोकसभेत वाढलेली दिसेल. मोदींचा हा विश्वास अनाठायी आहे की त्यांचे हे सत्य अनुमान आहे हे मात्र आपल्याला आणखी काही दिवसांनंतर येणाऱ्या 23 मे रोजीच कळेल. 19 मेच्या सायंकाळी, जेव्हा मतदानाची सातवी आणि अखेरीची फेरी समाप्त होईल त्यानंतर जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये मतदानाची दिशा व सरकारचा प्रकारही, नक्कीच आपल्याला कळेल.

12 मेची सतराव्या लोकसभेच्या मतदानाची सहावी फेरी पूर्ण होत असताना जगभरातील माध्यमांनी भारतातील विशाल लोकशाही प्रक्रियेत मोठा रस घेण्यास सुरूवात केली आहे. ही निवडणूक अधिकाधिक गुंतागुंतीची बनत आहे. दररोज परस्परविरोधी ठळक सूर पुढे येत आहेत. नेमके काय होणार याच अंदाज बांधणे आणखी कठीण होत आहे. जे पक्ष व नेते लढत आहेत त्यांना अर्थातच सारे काही उमजलेले आहे, जाणवलेले आहे. त्यांच्यातील उत्साही कार्यकर्ते तर आपणच कसे जिंकत आहोत हे नेत्यांना सांगतही आहेत. परवा मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. त्यात सर्वच जागा काँग्रेस जिंकणार असे कार्यकर्ते सांगत होते. ते ऐकून अशोक चव्हाणही अचंबित झाले! लढत असणाऱ्या सर्व 24 जागा जर काँग्रेसने महाराष्ट्रात जिंकल्या तर मग देशात राहुल गांधींचा शपथविधी कधी करायचा इतकेच ठरवणे बाकी उरेल..

देशातील गुप्तचर यंत्रणाही आपापल्या परीने अंदाज घेत असतात. नोकरशहांच्याही अंदाज घेण्याच्या पद्धती असतात. तेही आपापले आडाखे बांधत असतात. साधारणतः मतदानाच्या दोन फेऱ्या पार पडल्यानंतर दिल्लीतून एक निराळ्या पद्धतीची बातमी पुढे आली. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याचा अभ्यास सुरू झाला होता. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले होते आणि विविध खात्यांचे सचिव आदीही त्या कामाला लागले होते. 23 मे नंतरच्या शंभर दिवसात आपापल्या विभागाची कोणती कामे, योजना भाजपाच्या जाहीरनाम्याला अनुषंगून घेता येतील, आखता येतील, याची योजना केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये आखणे सुरू झाले होते. याचा अर्थ काय? देशातील नोकरशाहीला अंदाज आला आहे की भाजपाचेच व मोदींचेच सरकार पुन्हा केंद्रात येणार आहे!

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह व अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टीच्या मायावती, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू, कम्युनिस्टांचे दोन्ही पक्ष व त्याशिवाय असणारी डावी आघाडी.. विविध पक्ष आणि संघटना मोदी विरोधाचा, मोदी हटाव लोकशाही बचाव, असा नारा देत उभे आहेत. कोणी काही म्हटले तरी या पक्षांचा जनाधारही आहेच की. “मेलेला हत्तीही, सव्वा लाखाचा”, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. काँग्रेस तर जिवंत पक्ष आहे, मेलेला हत्ती नाही. मावळत्या लोकसभेत त्यांचे खासदार, अत्यल्प संख्येने, म्हणजे फक्त 44 इतकेच होते. एकेकाळी त्यांच्या खासदारांची संख्या चारशेच्या पारही पोहोचलेली होती. आजही मत कुणाला तर हाताच्या चिन्हाला असे म्हणणारे लोक देशातील प्रत्येक मतदारसंघात कमीअधिक प्रमाणात आहेतच की! पवार साहेब, ममता, लालू, मुलायम, मायावती, अखिलेश, चंद्राबाबू नायडू या साऱ्या नेत्यांना मानणारा, मतदान केंद्रावर गेल्यानंतर, केवळ यांच्याच पक्षांच्या चिन्हाचे बटण दाबणारा असाही मोठा मतदारांचा वर्ग आहे. पण तरीही मोदी मोदीच्या घोषणा देशाच्या सर्व काना-कोपऱ्यात याही निवडणुकीत ऐकू येत होत्या. मुंबईत उर्मिला मातोंडकरांची लोकप्रियता मोठीच आहे. पण त्यांच्याही रॅलीत अगदी राहुल प्रियंका यांच्या रोड शोमध्येही देशाच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यातही मोदी, मोदींचा गजर होतच होता. या साऱ्या परस्परविविरोधी चिन्हांचा नेमका अर्थ काय लावयाचा हाच मोठा प्रश्न माध्यमांपुढेही आहेच. मार्च ते मेअखेरपर्यंत हा फार मोठा काळ 2019 ची सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आणि त्याचे निकाल यांच्यामध्ये जात आहे. त्याचाही ताण माध्यमांतील मंडळींना अधिक जणवतो आहे, हेही खरेच आहे.

या अशा नाजूक टप्प्यावर अमेरिका आणि इंग्लंडमधील प्रतिथयश मासिकांनी, वृत्त नियतकालिकांनी थेट मोदीविरोधी सूर लावले आहेत. त्यांनी मोदींच्या लोकशाही निष्ठेलाच आव्हान दिले आहे. मोदी सत्तेत परत आले तर ते लोकशाहीला धोका ठरू शकेल असाही सूर या जागतिक प्रतिष्ठेच्या माध्यमांनी लावला असून त्याचा ताप शेवटच्या टप्प्यात मोदी व शाहंना होत आहे. अमेरिकेच्या सीआयएने देशात सर्वत्र फिरून माहिती घेऊन एक सर्व्हे केला अशी वावडी व्हॉटसपवरून कोणीतरी उठवली. त्यात त्यांनी बीबीसी या विख्यात इंग्लीश वृत्तसंस्थेचा, रेडिओ व टीव्ही चॅनेलचा हवाला दिला. सीआयएच्या अहवालाचे वृत्त बीबीसीने दिले. त्यामुळे अनेकांना ते खरेच असावे असे वाटले. त्याचे दणादण फॉरवर्ड मारले गेले. काही वृत्तपत्रांनी त्याआधारे बातम्याही झळकावल्या. बीबीसी या वृत्तसंस्थेची प्रतिष्ठा अशाप्रकारे अफवांच्या फैलावासाठी कारणीभूत ठरली हेही खरेच! खरे तर व्हॉटसअपने, फेसबुकने निवडणुकीच्या काळात बरीच दक्षता घेतली आहे. त्यांनी खोट्या बातम्या, अफवा थांबवण्याची पावले टाकलेली आहेत. अनेक मोठ्या वृत्तपत्रांनीही समाजमाध्यमांतून अशा उडणाऱ्या, परिणामकारक भासणाऱ्या, “बातम्यां”च्या माहितीची शहानिशा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार सीआयएच्या अहवालाची बीबीसीच्या नावे फिरवली जाणारी बातमी व माहिती साफ खोटी आहे हे स्पष्ट झाले. त्या कथित सीआयए अहवालाचा असा दावा होता की मोदी व शाहंच्या भाजपाला देशात मित्रपक्षांसह मिळून अवघ्या 145 ते 170 जागा मिळणार आहेत.

तसे झाल्यास सरकार मोदींचे बसणारच नाही ते आघाडीचेच असावे लागेल. कदाचित अशाच पद्धतीचे अहवाल विरोधी पक्षांनाही प्राप्त झाले असावेत. कारण 23 मेनंतरच्या मांडणीच्या वाटाघाटी त्यांतील काहीनी आतापासूनच सुरू केलेल्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव हे त्यासाठी बाहेर पडले आहेत. नायडूंनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींबरोबर गुप्त चर्चा केल्या. ते तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्ष तसेच मायावतींच्या भेटीसाठी फिरतच आहेत. तिकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये जाऊन डाव्या आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली. ते चेन्नईलादेखील गेले. पण तिथे त्यांना करूणानिधींचे पुत्र स्टालीन काही भेटलेच नाहीत. या गाठी-भेटीत पुढच्या केंद्रातली आघाडीची बीजपेरणी हे नेते करत आहेत. शरद पवारांनीही चर्चांना सुरूवात केली आहे. त्यांचे दिल्लीतील निवासस्थान हे गाठीभेटींचे महत्त्वाचे केंद्र बनलेले आहेच.

या कथित सीआयएच्याच अनुमानाच्याच धर्तीवर द इकॉनॉमिस्ट, या प्रतिष्ठेच्या इंग्रजी पत्राचे भारतीय लोकशाही प्रक्रियेचे विष्लेषणही याच सप्ताहात प्रसिद्ध झाले. द इकॉनॉमिस्टच्या छापील अंकाची किंमत चारशे रूपये तर, इंटरनेट आवृत्ती मिळवण्यासाठी पावणेचार हजार रूपये भरावे लागतात.. भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी आघाडीचेच सरकार सत्तेत येणे कसे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन या लेखात करण्यात आले आहे! त्यांना आता जोड लाभली आहे ती द टाइम, या तशाच सज्जड प्रतिष्ठेच्या वृत्तपत्राची. टाइमने एक मुखपृष्ठकथा 20 मेच्या अंकात प्रसिद्ध केली असून हा अंक आताच बाजारात आला आहे. त्यांनी आशियायी आवृत्तीच्या मुखपृष्ठावर मोदींना झळकावले आहे. पण त्यांचाही सूर मोदी आले तर ते लोकशाहीला कसे घातक असेल असाच आहे. पाकिस्तानी प्राध्यापक व भारतीय पत्रकार यांच्या मुलाने हा लेख टाईमसाठी तयार केला आहे हे विशेष! मोसाद व पाकच्या आयएसआयच्या नावानेही एका सर्व्हेक्षणाच्या बातम्या समाजमाध्यमांमध्ये पिकल्या आहेत. हे सारेच सर्व्हे बोगस असल्याचे दिसते. त्यांची विश्वसनीयता शून्य आहे. विविध पक्षांनी आपापल्या आयटी सेलना चांगलेच सक्रीय केले आहे हेही त्यातून स्पष्ट होते. तिथे बसून संगणकतज्ज्ञ मुलं-मुली या अशा कंड्या पिकवत राहतात. काही सर्वेक्षणे ही मोदी शाहंना दीडशे दोनशे जागांच्या खाली ठेवत आहेत तर काही सर्वेक्षणांमधून मोदी शाहंना 300 ते 387 जागा मिळतील असे भाकीत झळकवत आहेत. बघुया आता प्रत्यक्षात घोडा मैदानात काय निकाल येतात ते..”
 

Continue reading

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...

उद्धव ठाकरे करणार रजनीश काकडेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई प्रेस क्लबने त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळच्या वास्तूत दिवंगत ज्येष्ठ छायाचित्र-पत्रकार रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मेपासून आयोजित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता या...

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...
Skip to content