HomeArchiveमराठी भाषा मंत्री...

मराठी भाषा मंत्री की मराठी मारा मंत्री?

Details
मराठी भाषा मंत्री की मराठी मारा मंत्री?

    01-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
राज्याचा कारभार हाकणे तोही आजच्या धकाधकीच्या धोकादायक वर्तमान युगात खूप कठीण काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कार्यक्षम मंत्री ही जबाबदारी पेलत असतात. पण, त्यामागे कितीतरी कष्ट आहेत. तरीही फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील हास्य कधी मावळत नाही याचे श्रेय कुणाला द्यावे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. फडणवीस यांच्या अवतीभवती अनेकदा सावलीसारखे वावरणारे, प्रारंभीची दोनेक वर्षे तर प्रतिसीएमच जणू असे भासवणारे जे विनोद तावडेजी यांच्याकडे ते श्रेय जाते. तावडेंसारख्या विनोदप्रिय माणसाच्या शिक्षण खात्याचा कारभार पाहताना त्यांनी अनेक विनोद केले आहेत. ते शिक्षण मंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि भाषा मंत्रीही आहेत. साहित्य-संस्कृतीशी त्यांचा रोजच संबंध येत असल्याने त्यांची विनोदबुद्धी सदासतेज आहे आणि त्याचा प्रत्यय ते वेळोवेळी देतच असतात. बुधवारी मराठी भाषा दिनी मराठीच्या नावाने गहिवर काढण्याची संधी देणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा मंत्री असल्यामुळे तावडेजी त्यातील अनेक कार्यक्रमांत मंचावर होते. पण ते जसे विनोदी स्वभावाचे आहेत तसेच परखड स्पष्टवक्तेही आहेत. त्यामुळेच त्यांनी राजभवनावरील एका कार्यक्रमात मराठी भाषा दिनीच, मराठीच्या प्रेमापोटी भावनेच्या आहारी जाऊन सक्तीचा निर्णय घेता येणार नाही. विद्यार्थ्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकून रोजगाराच्या संधी मिळत असतील तर मराठी सक्तीच्या बेड्या घालणे कितपत योग्य ठरेल, असा परखड सवाल केला. तेव्हापासून मुख्यमंत्रीच काय सर्व महाराष्ट्र अचंबित, थक्क, दिग्मुढ वगैरे झाला आहे. मराठी भाषा दिनी तरी मराठीची महती सांगण्याऐवजी मराठी भाषा मंत्र्यानेच दाखवलेला हा परखडपणा विनोद म्हणून घ्यावा, असा अध्यादेश काढण्याचा विचार फडणवीस यांनी चालवला आहे.

मराठी मातीतच मराठीची सक्ती, बेड्या वगैरे शब्दालंकार उधळणाऱ्या तावडेंच्या परखडपणापुढे हतबद्ध होण्याची वेळ आली आहे. अवघ्या महाराष्ट्राने, मराठी ज्याच्या श्वासात भिनली आहे त्यांनी खवळून उठावे आणि विनोद तावडेंनाच सक्तीने बेड्या घालण्याचे आवाहन फडणवीस सरकारला करावे इतकी ही बेताल बडबड आहे. सरकारदरबारी मराठीची होणारी गळचेपी जगजाहीर आहे. आपल्याच राज्यात आपल्याच मातृभाषेत बोलण्याची, व्यवहार करण्याची सक्ती करायला लागावी हे दुर्दैवाचे दशावतार मराठी माणूस सहन करतोच आहे. त्यात आता उरल्यासुरल्या मराठीला जगवण्याची धडपडही अपयशी ठरावी असे विषारी बोल मराठी भाषा मंत्रीच बोलतो आहे. राज्य शासनाच्या सर्व व्यवहारांत मराठीचा उपयोग अनिवार्य करण्याचा अध्यादेश निघून, सरकारची सर्व संकेतस्थळे मराठीत असावीत असे आदेश निघून आता वर्षे उलटली. पण या आदेशांच्या प्रतीवरील सहीदेखील मराठीत नाही. नोकरशाहीमधील वरिष्ठ अमराठी अधिकाऱ्यांनी अशा आदेशांना कधीच केराची टोपली दाखवली आहे. अद्याप न्यायालयांचे कामकाज मराठीत व्हावे यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवायला सरकारला वेळ मिळालेला नाही. राजभवनावरील ज्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर महाराष्ट्रातील बोलीभाषा जगवल्या पाहिजेत, मातृभाषेत लिहिणे, वाचणे महत्त्वाचे आहे, असे विचार मांडत होते तिथेच तावडे यांनी मातृभाषेच्या आग्रहाला सक्तीच्या बेड्या म्हणत, तारे उधळले. तावडे हे मराठी भाषा मंत्री की मराठी मारा मंत्री आहेत असा प्रश्न यामुळे मराठी जनतेला पडला आहे.

मराठीचा अभिमान आपण फक्त शुभेच्छा देऊन, डीपी बदलून त्या दिवसापुरता दाखवत असतो म्हणून काळ असा सोकावतो. आपण कुठे मराठीचा आग्रह धरतो, एकमेकांशी मराठीत बोलतो? सावरकरांनी कितीतरी इंग्रजी शब्दांना सुंदर मराठी प्रतिशब्द शोधले. त्यातले किती आपण वापरतो? आपल्या मराठीपणाच्या चिंधड्या दररोज उडत असतात. मंत्रालयाच्या पायऱ्यांवर लक्तरे पांघरून राज्याची राजभाषा मराठी उभी आहे, अशी चीड कुसुमाग्रजांनी व्यक्त केली होती. त्यांच्या नावाने मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना पुलंचा फोटो लावून बॅनरबाजी करण्याइतकी राजकीय मंडळींनी अक्कल गहाण टाकली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी नव्हे गुजराती अनुवाद विधिमंडळात ऐकवला गेला होता. अशी मराठीची अवहेलना करणाऱ्या सरकारमधील विनोदी कलाकाराने आता मराठीची लक्तरे अधिकच फेडली आहेत. राष्ट्रभाषा नसलेल्या हिंदीचा पखवडा पाळायचा आणि मराठीचा केवळ मराठी दिनापुरता गहिवर काढायचा असला भंगारपणा मराठी लोकांच्या राज्यात मराठीच्या नशिबात आला आहे. प्रत्येक राज्यात तिथली मातृभाषा अभ्यासक्रमात शिकावी लागते, अभ्यासक्रमही मातृभाषेतच असतो. आपण मातृभाषेलाच घराबाहेर काढायला निघालो आहोत. मराठी शाळा जगवण्यासाठी धडपड सुरू आहे पण, सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. मराठीचा अभिमान असता तर मुंबईसह महाराष्ट्राला परप्रांतीयांनी घडवले असे वक्तव्य कानावर आले नसते..

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी

असे कविवर्य सुरेश भट लिहून गेले होते. या हालांना ज्यांच्या शिक्षणाचीच खातरजमा झालेली नाही असे अस्तनीतील साप कारणीभूत आहेत. पण असे निर्रगल खेळ पाहून मदांध तख्त फोडण्याचा मराठी बाणा मात्र आजचे मऱ्हाठीजन हरवून बसले आहेत.”
 

Continue reading

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...
Skip to content