HomeArchiveभिवंडीत बंडोबा!

भिवंडीत बंडोबा!

Details
भिवंडीत बंडोबा!

    11-Apr-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होणाऱ्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारचा अखेरचा दिवस होता. आता चित्र स्पष्ट झाले असून बंडखोरीचा फटका सर्वच पक्षांना कमीअधिक प्रमाणात बसलेला दिसत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांचे विद्यमान खासदार व काँग्रेसचे पाच तर राष्ट्रवादीचा एक असे सहा माजी खासदार अशाच लढती रंगणार आहेत. मुंबईबरोबरच ठाणे व पालघर जिल्हयांतील चार मतदारसंघांमध्येही लोकसभेच्या लढती रंगतदार होत आहेत. ठाणे शहर, कल्याण व भिवंडी या ठाणे जिल्हयातील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षांचेच विद्यमान खासदार आहेत. राजन विचारे ठाणे, डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण हे दोन शिवसेनेचे तर भिवंडीतून भाजपाचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार पुन्हा मतदारांचा कौल अजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कल्याण व ठाणे या दोन लढतीसाठी विरोधी महाआघाडीने राषट्रवादीचे तर भिवंडीत महाआघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. त्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने तर भिवंडीत काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. अशोक चव्हाण व अजित पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जोडीला महाराष्ट्रात आरपीआयचे विविध गट. ओबीसींच्या संघटना, आघाड्या आदी 56 संघटनांची मोट बांधून महागठबंधन उभे केले आहे. पण त्यांना सर्वत्र तितक्याच ताकदीने उभ्या राहत असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. आंबेडकरांचा दावा तर असा आहे की, भाजपा-सेना युतीला खरी लढत आम्ही, वंचित बहुजन आघाडी, देत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे स्थान अनेक मतदारसंघांमध्ये तिसरे राहणार आहे. हे म्हणणे कसे आकाराला येते हे पुढच्या तीन आठवड्यात आपल्याला कळणारच आहे.

ठाण्यातून विचारेंना आव्हन देणारे आनंद परांजपे हे माजी शिवसैनिक तर आहेतच पण याच मतदारसंघामधून ते 2009 मध्ये लोकसभेवर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेले होते. 2013 मध्ये त्यांनी पक्ष बदलला व ते राष्ट्रवादीत सामील झाले. 2014 मध्ये त्यांनी कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदेंशी लढत दिली. पण डॉ. शिंदेंना 4.40 लाख मते होती तर परांजपेंना दोन लाखांचाही टप्पा गाठता आला नव्हता. आता ते ठाणे मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभे आहेत. ठाणे मतदारसंघामध्ये विचारेंना 5.59 लाख मते होती तर राष्ट्रवादीचे त्यावेळचे 2009 चे विजयी खासदार संजीव गणेश नाईक यांनी 3.14 लाख मते घेतली होती. यावेळी संजीव वा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला नम्र पण ठाम नकार दिला व ते रिंगणाबाहेर राहिले आहेत. कल्याणमध्ये या वेळेस शिवसेनेच्या शिंदेना झुंज देण्यासाठी राष्ट्रवादीने ताज्या दमाचे बाबाजी पाटील यांना उतरवले आहे आणि त्यांची रणनीती ठरवण्याची जबाबदारी जीतेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवली आहे. तीही लढत रंगतदार होणार आहे.

भिवंडीत पुन्हा आजी खासदारांना झुंज देण्यासाठी विरोधकांनी माजी खासदारांना उतरवले आहे. माजी खासदार सुरेश टावरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सुरेश टावरेंनी याच मतदारसंघामधून काँग्रेसचे खासदार म्हणून चाळीस हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळेस त्यंनी भाजपाचे जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील यंदाची लढत अधिक रंगतदार होणार आहे, कारण तिथे काँग्रेस व शिवसेनेला बंडखोरीची लागण झालेली दिसते. ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य सभापती व शिवसेनेचे ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख असणारे सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांना लोकसभा निवडणुकीची आस लागलेली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार व 2019 चे उमेदवार कपिल पाटील यांनाच थेट आव्हान दिले होते.

सेना-भाजपा नेते जेव्हा एकमेकांच्या विरोधात तलवारी परजून उभे होते व दोन्ही पक्षांचे मनोमीलन व्हायचे होते तेव्हा ज्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे खासदार होते तिथे शिवसेनेने आणि जिथे शिवसनेचे खासदार होते तिथे भाजपाने संभाव्य उमेदवारांचा शोध सुरू केलेलाच होता. विशेषतः पालघरच्या पोटनिवडणुकीवेळी तर शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे दोन्ही आमनेसामने उभेच ठाकले होते. ती झुंज कडवी झाली होती. त्यामुळे त्यावेळी वातावरण असेच झाले होते की “आता संपले! पुढची लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र व एकमेकांच्या विरोधातच लढवणार हे निश्चित!” त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी गुडघ्यांना बाशिंगे बांधून लोकसभा निवडणुकीच्या वरातीत आपापली घोडी नाचवण्यास सुरूवातही केली होती. ठाणे ग्रामीण भागातील असे एक उत्सुक नेते होते सुरेश ऊर्फ बाळ्यामामा. ते तसे मूळचे मनसैनिक. 2014 च्या मोदी लाटेत त्यांनी भिवंडी मतदारसंघात कपिल पाटलांशी लढत देताना 93 हजार मतेही घेतलेली होती. त्यावेळेस पाटील यांना 4.11 लाख मते पडली होती तर काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख मते मिळाली होती.

मनसेचा प्रयोग संपवून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे शिवेसनेत दाखल झाले. राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना असे पक्षांतर करावेच लागत असते, असाच अलिकडचा आपला राजीकय इतिहास आहे. वर्तमानातही काही फार निराळे होताना दिसत नाही. अनेक तरूण नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपात उड्या मारल्याच आहेत. बाळ्यामामा हे कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय असल्यामुळे त्यांनी जाहीर करून टाकले हे की आपण कपिल पाटील यांना किमान साठ हजार मताधिक्याने हरवू शकतो. पण जेव्हा अमित शाह मातोश्री बंगल्यावर दाखल झाले अन् जेव्हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनोमीलनाच्या गोष्टी करून लागले तेव्हा दोन्ही पक्षांतील अशा इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडू लागले. अखेर रीतसर बोलणी होऊन दोन्ही पक्षांनी अमित शाहंच्या उपस्थितीत मुंबईत पुन्हा युतीची घोषणा केली. त्यानंतर भिवंडीचे काय होणार हे उघडच होते. तिथे कपिल पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार व शिवसेना आपल्याला उमेदवारी देणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी काँग्रेसचे दार ठोठावले. तिथे मनसे व शिवसेना सोडून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे स्वागत करायला प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण उत्सुकच होते. पण भिवंडी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे प्रभारी व ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुभाष कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जागेसाठी बाहेरून येणाऱ्या बाळ्यामामांपेक्षा सध्या पक्षातच असणारे माजी खासदार सुरेश टावरे यांना पसंती दिली.

खरेतर टावरेंची उमेदवारी 22 मार्च रोजी जाहीरही झाली होती. तरीही बाळ्यामामा व त्यांचे समर्थक काँग्रेसमधून उमेदवारी मिळवण्याचया खटपटी सोडत नव्हते. ते दिल्लीत धावले. महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष अशोक चव्हाणांचे समर्थन बाळ्यामामा यांनाच होते असेही सांगण्यात येत होते. पण अखेर अर्ज दाखल झाला तो सुरेश टावरेंचा. टावरेंनाच हात चिन्ह प्रदान करणारा ए व बी फॉर्मही देण्यात आले. पण इकडे लोकसभा निवडणुकीच्या घोड्यावरची मांड बाळ्यामामांना सोडवत नव्हती. त्यांनी सध्या अपक्ष अर्ज दाखल केलेलाच आहे. आणि टावरेंसह कपिल पाटलांना पराभूत करून लोकसभेत जाणारच अशी घोषणाही त्यांनी करून टाकलेली आहे. अर्थाच अशा बंडोबांना थंडोबा करण्याचा अनुभव काँग्रेसला आहेच. औरंगाबादमध्ये काँग्रेसचे विद्ममान आमदार व माजी राज्यमंत्री अबुदल सत्तार यांनी बंड करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी तो अर्ज मागे घेण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी मागे घेतला. आता ते काँग्रेस सोडून भाजपात जातील अशी चिन्हे दिसत आहेत. पण ती पुढची गोष्ट झाली. सध्या तरी त्यांचे बंड शमले आहे. तसे बाळ्यामामांचा अर्ज अखेरच्या दिवशी मागे घेतला जातो की ते रिंगणात अखेरपर्यंत झुंजत राहणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content