HomeArchiveभाजपाची खिचडी, सपा-बसपाची...

भाजपाची खिचडी, सपा-बसपाची मिसळ!

Details
“भाजपाची खिचडी, सपा-बसपाची मिसळ!”

    09-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागल्यानंतर आघाडी, महाआघाडी, युती आणि छोट्या घटकपक्षांची दादागिरी हे सर्व चित्र प्रसारमाध्यमांतून आपल्या डोळ्यांपुढे तरळत राहणार आहे. भाजपाविरोधी विरोधकांच्या एकजुटीची महाआघाडीही सध्या चर्चेचा विषय असला तरी, मलाही पंतप्रधान व्हायचं आहे! या देशाचं नेतृत्त्व करायचं आहे. ही सुप्त इच्छा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचं नेतृत्त्व केलेल्या आणि करणाऱ्या अनेक नेतेमंडळींची आहे. ते कुणी जाहीरपणे बोलून दाखवत नसले तरी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान कुणाला बनवायचं, हे देशातील सर्वात मोठे राज्य असलेलं उत्तर प्रदेशचं ठरवणार आहे. येथे 80 लोकसभा मतदारसंघ असल्याने जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल तोच सिंकदर ठरणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणुकीआधी आपसातील मतभेद, वाद, हाडवैर सर्व काही बाजूला सारून हम साथ साथ है, चा नारा दिला आहे.

उत्तर प्रदेशात याआधीच भाजपाविरोधी आघाडी उघडून मार्च 2018 मध्ये फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत या दोघांनी हातात हात घालून विजय मिळवला होता. तेव्हापासून बुआ आणि बबुआ हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही एकीच्या मांडवात बसतील, यावर खल सुरू होता. अपेक्षेप्रमाणे सपा 35 व बसपा 36 लोकसभेसाठी जागा लढवण्यावर एकमत झाल्याने कॅडरबेस भाजपापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा हे दोघे मिळून लढवणार असले तरी राहुल गांधी यांच्या अमेठी व सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसतील. मात्र, या दोन्ही पक्षांत काँग्रेसला राज्यात अन्य एकही जागा न देण्यावर एकमत झाल्याने काँग्रेसचीही मोठी गोची होऊन बसली आहे.

राजकारणात कधीही कोण कुणाच्या गळ्यात गळा आणि एकमेकांना फुलांच्या माळा घालतील, याचा नेम नाही. पण, दरसालच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात नेत्यांपेक्षा सक्रीय सहभाग घेणारे कार्यकर्ते व पदाधिकारी कधीही एकमेकांच्या जिवावर उठतील. जात, धर्म, पंथाच्या नावाखाली आपसात डोकी फोडतील. उत्तर प्रदेशात राजकीय स्पर्धक असलेल्या सपा, बसपातही अशीच ठसन्न आहे, हे आपल्याला यु.पी.चा शहाणासुरता माणूस चांगलं पटवून देईल. आपल्या महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. येथे लोकसभेच्या 48 जागा आहेत. परंतु घाटे आणि फायदे का सौदा असलेल्या जागावाटपाचा तिढा अगदी शेवटपर्यंत सुटता सुटणार नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक निवडणुकीत भावनिक राजकारण खेळणाऱ्या शिवसेना-भाजपातही महाराष्ट्रात तेच सुरू आहे. या दोन्ही पक्षांचे नेते सार्वजनिक कार्यक्रमांतून एकमेकांची हवी तशी खरडपट्टी काढत असले तरी लोकसभा निवडणुकीत या दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याशिवाय पर्याय नाही, हे जनतेलाही ठाऊक आहे. तू जा रे.. असा कितीही गळा काढला तरी. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने खिचडी पकवण्यासाठी कधीच सुरूवात केली असली तरी छोटे-मोठे घटक पक्ष सोबत घेतल्याशिवाय आघाडीचा निभाव लागणेही कठीण आहे, हे राजकारणातील चाणक्यही जाणून आहेत. एकूणच एकमेकांची उणीदुणी काढण्याचा सार्वत्रिक कार्यक्रम आता जरी सुरू असला तरी विकासाला टाळे लावून जात, समाज या एकाच फॅक्टरवर आजही चालणाऱ्या निवडणुकीत आघाडी नि युतीशिवाय कुणाचाही खिचडी पकणार नाही.

अहो, आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाने तर कधीच खिचडी पकवण्यास सुरूवात केली आहे. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भीम महासंगम विजय संकल्प 2019 या रॅलीत 5 हजार किलो समरसता खिचडी तयार करून कार्यकर्त्यांत त्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आखला आहे. साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात देशभरात दलितांवर अन्याय-अत्याचाराची एकही घटना घडली नसल्याने व मोदी सरकारने ती घडूही दिली नसल्याने ही समरसतेची खिचडी पकणे स्वाभाविक आहे. मात्र याच खिचडीवर संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली स्वाभिमानाची शिकवण खुंटीला टांगून इथल्या राजकारणाने कधीच पातळी सोडली आहे. समरसतेच्या या खिचडीचा कळस म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सर्व 14 जिल्ह्यांतील दलितांच्या घरांत जाऊन तांदूळ, डाळ, मीठ आणि अन्य साहित्य जमवले आहे. अगदी 14 लाख पत्रकांचंही वाटप करण्यात आलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागा जिंकून आपणच किंगमेकर हे दाखवून दिले होते. कास्ट फॅक्टरवर चालणार्‍या भाजपाने फोडा आणि राज्य करा ही नीती मायावती आणि यादवांच्या साम्राज्याला सुरूंग लावण्यासाठी खेळली होती. 2017च्या निवडणुकीतही भाजपाने तोच फॉर्म्युला वापरून योगी आदित्यानाथ हा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला. दलित, ओबीसी आणि अतिमागास वर्गाला आपसात लढवून त्यांची वाटणी घालणे भाजपाने चांगले जमवले. मतांची बेगमी करण्यासाठी हिंदुत्वाचा जहरी प्रचार भाजपाच्या कामी आला. दर पाच वर्षांनी कूस बदलणारे उत्तर प्रदेशचे राजकारण यादव, जाट व मुस्लिम, दलित, ओबीसींच्या मतदानातून सपा-बसपा आणि भाजपा व अन्य कुणी या युत्या-आघाड्यांची खिचडी पकवणार, हे निकालच ठरवेल.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content