Details
भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स भाग-3
13-Dec-2018
| 0
”
विनायक कुळकर्णी ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेश्यक
vvskul@yahoo.com
समजा जर तुम्ही दरमहा एक हजार रूपये म्युच्युअल फंड योजनेत गुंतवत आहात. प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेस असलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्यास म्हणजे नेट अॅसेट वॅल्यूला [NAV] त्या एक हजार रूपयातून युनिट्सची खरेदी होते. शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे बदलणार्या निव्वळ मालमत्ता मूल्यातील बदलांमुळे त्या प्रत्येक एक हजार रूपयांमध्ये खरेदी झालेल्या युनिट्सच्या संख्येतही फरक पडतो. जर निव्वळ मालमत्ता मूल्य जास्त असेल तर खरेदी केलेल्या युनिट्सची संख्या कमी असेल. परंतु हेच निव्वळ मालमत्ता मूल्य कमी असेल तर खरेदी केलेल्या युनिट्सची संख्या अधिक असेल. जितक्या प्रदीर्घ अवधीसाठी ही योजना असेल तितक्या कालावधीत चक्रवाढ पद्धतीनं नफ्यावर नफा वाढत जातो. समजा ‘अ’ व्यक्तीनं दहा हजार रुपये २० वर्षांसाठी गुंतवले. जर गुंतवणुकीवरील सरासरी उत्पन्न दर वार्षिक १५ % येत असेल तर त्याची गुंतवणूक एक लाख ६२ हजार रूपये होईल. पण ‘ब’ व्यक्तिनं ‘अ’ची कृती बघून दहा वर्षांनंतर `अ’च्या गुंतवणुकीच्या दुप्पट म्हणजेच २० हजार रुपये त्या योजनेत गुंतवले परंतु त्याला पुढील १० वर्षात ८० हजार ९०० रूपयेच मिळतील. त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे ‘अ’ने दहा वर्षे आधी सुरवात केली असल्यानं प्रदीर्घ काळात गुंतवणुकीची वृद्धी चांगली झाली. नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेद्वारे [SIP] जर दरमहा एक हजार रूपयांची गुंतवणूक दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस, आणि पस्तीस वर्षांसाठी केली असता अंदाजे संचयित वार्षिक वृद्धी दर दहा टक्के प्रति वर्ष गृहीत धरला तर मुदतपूर्ती समयी अनुक्रमे २,३४,२४४ रू., ४,५४,४२४ रू., ८,०९,०२६ रू., १३,८०,११६ रू., २२,९९,८६३ रू., आणि ३७,८१,१२४ रू. एवढी रक्कम तयार होऊ शकते.
पेन्शन फंडाची अंदाजे १०% व्याज दराने वृद्धी झाल्यास मिळणारे पेन्शन उत्पन्न पुढील तक्त्यात दर्शविले आहे.
मासिक वर्गणी गुंतवणूक अवधी
(रू.) १० वर्षे २० वर्षे ३० वर्षे ४० वर्षे
दरमहा अंदाजित पेन्शन ( रू.)
५०० ९३४ २,८८६ ८,२९० २२,३०६
१००० १,८६८ ५,७७३ १६,५८१ ४४,६१२
२००० ३,७३६ ११,५४६ ३३,१६१ ८९,२२४
अशाच प्रकारच्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेद्वारे जशी मोठी गुंतवणूक निर्माण होते. तशाच प्रकारे भविष्यात दरमहा पेन्शनसारखं उत्पन्नसुद्धा प्राप्त करणं शक्य ठरू शकतं. त्यासाठीच नियोजनबद्ध गुंतवणूक पेन्शन फंडात होणे आवश्यक असते. युटीआय रिटायरमेंट बेनिफिट पेन्शन फंड, टाटा रिटायरमेंट सेविंग्जफंड, टेंपलटण इंडिया पेन्शन फंड, एच डि एफ सी रिटायरमेंट सोल्यूशन्स फंड, रिलायन्स पेन्शन फंड इत्यादी पेन्शन फंड्स आज उपलब्ध असून आयकर कलाम ८० सी अन्वये करपात्र उत्पन्नातून १,५०,००० रूपयांपर्यन्त वजावट यातील काही फंड्सवर उपलब्ध आहे.”

