HomeArchiveधार्मिक विद्वेषाची फवारणी...

धार्मिक विद्वेषाची फवारणी महाघातक!

Details
धार्मिक विद्वेषाची फवारणी महाघातक!

    08-Feb-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
गांधीजींना पुन्हा एकदा गोळ्या मारून झाल्याने आता ‘हे राम’ म्हणणारे कुणी राहिले नसणार याची बहुदा मतांसाठी धर्माभिमान दाखवणाऱ्या मंडळींना खात्री झाली असावी. याचसाठी पुन्हा पुन्हा रामनामाचा गजर सुरू झाला आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसा हा गजर कर्णकर्कश्श होत जाणार आहे. याची झलक अलिकडेच स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत दाखवली. अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी स्वामी स्वरूपानंद यांची भाषा हे खरे तर कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले आव्हान समजायला हवे. पण रोजच कायद्याच्या चिंध्या सत्ताधारीच उडवत असताना आणि स्वामींच्या मुखातून निवडणुकीचे राजकारणच पुढे सरकत असताना त्याकडेही पद्धतशीर दुर्लक्ष झाले आहे.

राममंदिराचा विषय आता २५ वर्षे चघळला जात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण न्यायसंस्था नेमका काय निकाल देऊ शकते याची कुणालाच कल्पना नाही आणि फिकीरही नाही. कारण त्याआधी निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकांत मतांचे ध्रुवीकरण घडवून आणायचे तर राम मंदिराचा विषय ऐरणीवर आणायला हवा. भाजपाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्ये, रा.स्व. संघाच्या ज्येष्ठांकडून होणारी वक्तव्ये, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका, याद्वारे राम मंदिराच्या मुद्द्याचा पुनर्जन्म झाला आहेच. यातून काही साधलेच नाही तर धर्मसंसदेनेही आता थेट न्यायप्रक्रियेलाच आव्हान दिले आहे.

येत्या २१ फेब्रुवारीपासून थेट मंदिराचे बांधकामच सुरू करण्याची घोषणा स्वामी स्वरूपानंद करतात तेही हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना. हे स्वरूपानंद म्हणजे द्वारकापीठाचे स्वयंघोषित शंकराचार्य. ‘राम मंदिराच्या बांधकामासाठी गोळ्या खाव्या लागल्या तरी बेहत्तर; पण आपण अयोध्येला जाऊन बांधकाम सुरू करणारच!’ अशी चिथावणीखोर भाषा त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आयोजित धर्मसंसदेत केली. आता स्वरूपानंद यांच्या या वक्तव्याने निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा ज्वर पुन्हा उफाळणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. बजरंग दलाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे अयोध्येतील खासदार विनय कटियार हे स्वयंघोषित शंकराचार्य स्वरूपानंद यांच्या या घोषणेला काँग्रेसचा ‘नवा डाव’ म्हणत असले तरी या डावाने फायदा कुणाचा होईल ते मतदानातूनच समजून येईल. उत्तर प्रदेशातील हवा अनुकूल व्हावी यासाठी भाजपाला अशा हवाबदलाची गरज आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राममंदिराचा प्रश्न कायद्याच्या चौकटीतूनच सोडवला जाईल,’ असे अलिकडेच म्हटले होते. पण, भाजपा सरकारला विकास आणि संबंधित मुदद्यांवरून दररोज विरोधी पक्ष जनतेच्या कोर्टात उभे करत असताना, मुख्य प्रश्नांकडून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी राम मंदिर न उभारताच उपयोगी येऊ शकते. संघ परिवाराने आधीच, राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता सरकारने थेट वटहुकूम काढून मंदिराचे बांधकाम सुरू करावे, अशी भूमिका घेतली आहेच. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. आता सरकारनेही या प्रकरणी निकड दाखवण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त जागेला लागून असलेला ४२ एकराचा भूखंड ‘राममंदिर न्यासा’कडे सुपू सुपूर्द करण्यास परवानगी मागणारा विशेष अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. ही काही पहिलीच वा शेवटचीही मागणी नाही. याआधी प्रत्येक वेळा न्यायालयाने त्याला नकार दिला आहे.

वास्तविक अशी जागा ‘राममंदिर न्यासा’ला दिली गेल्यावर तिथे थेट मंदिराच्या बांधकामाची तयारी न्यासातर्फे सुरू केली जाऊ शकते. हे जातीय आणि धार्मिक सलोख्याला धोकादायक आहे. निवडणुकांआधी असा तणाव निर्माण झाल्यास तो राजकीय पक्षांना हवाच आहे. वस्तुत: कुंभमेळ्यातील धर्मसंसद विश्व हिंदू परिषदेने आयोजित केली होती. तिथेच सरसंघचालक मोहन भागवत यांचेही भाषण झाले होते. तेव्हा जमलेल्या साधू-संतांनी भागवतांना उलटसुलट प्रश्न विचारले आणि गोंधळही घातला. त्याआधीच स्वरूपानंद यांनी २१ फेब्रुवारीला राम मंदिर उभारणी सुरू असे आवेशात जाहीर केले होते. प्रचारात राम मंदिर पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा म्हणून पुढे येणार हे आता स्पष्ट दिसत आहे. यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर वा अर्धसत्य दाव्यांवर लढणे भाजपाला धोकादायक वाटू लागले आहे. विधानसभेसाठी विविध राज्यांत मिळालेला कौल पाहून भाजपाच्या नेतृत्त्वाने विकासाची कास सोडून प्रचार करण्याचा निर्णय घेतला असावा असे दिसते. मंदिर उभारणी आणि लोकसभा निवडणूक या दोन भिन्न बाबी असल्याचे भागवत यांनी धर्मसंसदेत सांगितले असले तरी, ये पब्लिक सब जानती है. निवडणुकीच्या तोंडावरच सुरू झालेला हा खटाटोप पाहाता मतपेटीच्या राजकारणासाठी आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे डावपेच सुरू असल्याचे नाकारणे अशक्य आहे. धार्मिक विद्वेषाची ही फवारणी मतांच्या फुलोऱ्यासाठी आवश्यक वाटली तरी देशाच्या ऐक्यासाठी महाघातक आहे. ज्यांनी या घडामोडींना आवर घालायला हवा ते मात्र नेहमीप्रमाणे गप्प आहेत.”
 

Continue reading

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...
Skip to content