Details
“दिवंगतांची शताब्दी जोरात, शतकवीर कोनाड्यात!”
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच आहेत. संसदीय राजकारणाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेडला झालेल्या सत्कार समारंभात पवारांविषयी केलेले हे भाष्य आहे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे. परखड भूमिका व आक्रमक भाषेला अभ्यासू व आक्रमक आंदोलनाची जोड देऊन सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या धोंडगे यांनी बुधवार, १७ जुलै २०१९ रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ अशीही त्यांची ओळख आहे. मन्याड धरणाच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन कसे आटोक्यात आणावे, अशी चिंता १९५९ मध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक असलेले ज्युलियो रिबेरो यांनाही पडली होती. रिबेरो यांनी त्यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. अनेकांशी जाहीर वादविवाद करणारे केशवरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ‘आली अंगावर घेतली शिंगावर’ असेच आहे.
त्यांच्या जीवनपटावरून नजर टाकल्यास माणूस ‘डॅशिंग’ म्हणजे काय असतो हे समजते. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी, डोंगराळ कंधार विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार व नांदेड लोकसभा मतदारसंघातून एकदा खासदार म्हणून त्यांनी संसदीय कारकीर्द गाजविली आहे. त्यांची विधानसभेतील भाषणे सरकारवर आग ओकत असत, आसूड ओढत असत. इरसाल म्हणींचा वापर करत ते सरकारला सळो की पळो करून सोडत. हा लोकनेता विद्वान असल्याची प्रचिती त्यांच्या ४० पुस्तकांवरून येते. १९७२ चा दुष्काळ, रोजगार हमी योजना, कंधार येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC ची स्थापना, शिक्षण संस्थांची स्थापना, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भालकीचा सत्याग्रह, गुराखी मुक्ती परिषद व गुराखी साहित्य संमेलन, दमकोंडी सत्याग्रह, ‘साप्ताहिक जयक्रांती’, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी सफल केल्या. आज साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवादी विचारांची गरज आहे. आता शरीर थकले, पण माझा विचार कधी थकणार नाही, असे आयुष्याचे शतक फटकावताना काढलेले उद्गार त्यांच्या परिवर्तनवादी विचारांवरील निष्ठेची साक्ष देतात. केशवरावांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा.
हा परिच्छेद माझ्या वाचनात आला आणि माझ्या मनःचक्षूंसमोर सारा राजकीय इतिहास झर्रकन उभा राहिला. मनात आलं, काय ही विटंबना आहे पाहा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आदी दिग्गज, महापुरूषांची जन्मशताब्दी आपण किती दणक्यात साजरी केली आणि करीत आहोत. यशवंतराव चव्हाण पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून १९६२ साली गेले तेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेत महाराष्ट्र कवी ग. दि. माडगूळकर यांनी “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला” असे उद्गार यशवंतरावांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना काढले. हे ग.दि.मां.चे वाक्य अजरामर झाले. या माडगूळकर यांची, संगीतकार सुधीर फडके, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, संगीतकार स्नेहल भाटकर यांची जन्मशताब्दी साजरी करीत आहोत. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची स्मृतीशताब्दी आणि अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी दणक्यात सुरू झाली आहे. म. गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे कार्यक्रम देशभरात सुरू आहेत आणि महाराष्ट्राचे उपमासम्राट कवीमनाचे अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात म. गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या राज्यातील कार्यक्रमांसाठी 150 कोटी रूपयांची तरतूदसुद्धा केली आहे.
या सर्व शताब्दी कार्यक्रमांचा विचार करता एक विचार माझ्या मनात येतो की, दिवंगतांची जन्मशताब्दी स्मृती, शताब्दी आपण दणक्यात साजरी करून या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करतो, सर्वत्र कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात. व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चसत्रे, शिबिरे, पदयात्रा, चित्ररथ अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या दिवंगत पुण्यात्म्याची थोरवी, महती सर्वत्र गायिली जाते. हे आपण सारे त्या दिवंगत पुण्यात्म्याच्या पश्चात करीत असल्याने त्याबद्दल आपले जरी समाधान होत असले तरी त्या दिवंगत पुण्यात्म्याला त्याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. परंतु आपल्या आयुष्याचे शतक फटकावणाऱ्या शतकवीर संसदपटूच्या नशिबी केवळ विधानभवनात असलेली/असलेले एकशेपंचेचाळीस क्रमांकाची खोली/दालन? ज्येष्ठ समाजवादी नेते साथी दत्ता ताम्हाणे यांनी आपल्या जीवनाचे शतक ठोकले, आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण केली. त्यावेळी २०१३ च्या १३ एप्रिल रोजी विधानभवनात १४५ क्रमांकच्या दालनात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ताम्हाणे या थोर स्वातंत्र्यसैनिक ‘साथीं’चे वयाच्या एकशे दोन व्या वर्षी ७ एप्रिल २०१४ रोजी देहावसान झाले. भारताचा स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, आणीबाणीविरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतलेल्या या थोर संसदपटूने विधिमंडळात महत्त्वाचे प्रश्न, समस्या, विषय, प्रस्ताव मांडताना सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय, पाच दिवसांचा आठवडा, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या. महाराष्ट्र विधानभवनात मुख्य ग्रंथपाल बा. बा. वाघमारे यांच्याकडे या साऱ्या नोंदी उपलब्ध होऊ शकतील.
केशवराव शंकरराव धोंडगे शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेते कंधार या नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघात सहावेळा आमदार आणि नांदेडमधून एकदा लोकसभेवर निवडून आले. धोंडगे यांनी १७ जुलै २०१९ रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. ज्येष्ठ नेते, पुढारी यांच्या वयाचा सुवर्ण महोत्सवी, हीरक महोत्सवी, अमृतमहोत्सवी वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात येतो. काही व्यक्तीच शंभराव्वा वाढदिवस साजरा करण्यापर्यंत पोहोचतात. सा. रे. पाटील नव्वदी ओलांडूनही शंभराव्वा वाढदिवस पाहू शकले नाहीत. काहीजण नव्वदीच्या पुढे झेपावत आहेत. परंतु केशवराव धोंडगे शंभराव्वा वाढदिवस साजरा करताना चांगल्या प्रकारे बोलू, चालू शकताहेत. मग असे असताना त्यांच्या शतकमहोत्सवी वाढदिवसाच्या या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम का होऊ शकत नाही? शेकापचा ‘खटारा’ गावोगावी, गल्लोगल्ली पोहोचवण्यासाठी हाडाची काडं, रक्ताचं पाणी करून आपल्या निष्ठापूर्वक विचारधारेचा प्रसार आणि प्रचार एका बाजूला करताना केशवराव धोंडगे यांनी महाराष्ट्र विधानसभा गाजवून सोडली. संसदेत प्रभाव पाडला. विधानभवनात धोतराचा सोगा एका हातात धरून दुसऱ्या हाताने भेटेल त्याच्या हातावर अत्तर लावून सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळविणारे केशवराव आपल्या संसदीय कार्यशैलीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्रात गेली सुमारे ऐंशीहून अधिक वर्षे पसरविण्याचे महत्कार्य करीत आहेत.
विधानसभेत रूमणं आणि बळीराजा हे शब्द केशवराव यांनी अजरामर केले. विधिमंडळाचे एकतरी अधिवेशन औरंगाबाद येथे व्हावे यासाठी त्यांनी कितीवेळा ठराव मांडले याची माहिती वाघमारे निश्चितच देऊ शकतील. विधान परिषद बरखास्त करण्यासाठी त्यांनी अशासकीय ठरावही दिलेले आपल्याला पाहयला मिळू शकेल. विधानसभेत केलेली धोंडगे यांची भाषणेही नवीन आमदारांना मार्गदर्शक ठरू शकतात. जयक्रांती नांवाचं साप्ताहिक धडाडीने चालविणाऱ्या केशवरावांच्या भाषणाचा शेवट ते जयक्रांती म्हणूनच करीत असत. आम्हाला त्यांची भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधीच मिळाली. १९९० साली महाराष्ट्रात शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीने विधानसभा निवडणूक लढविली आणि शिवसेनेचे बावन्न आणि भाजपचे बेचाळीस असे युतीचे ९४ आमदार निवडून आले. त्यावेळी युतीची सत्ता येऊ शकली नसली तरी मजबूत विरोधी पक्ष शरद पवारांसमोर उभा राहिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा दत्ता ताम्हाणे आणि केशवराव धोंडगे यांना नवीन आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी विधानभवनात बोलावले तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता या दोन संसदपटूंनी शिवसेना, भाजप युतीच्या आमदारांना चांगले मार्गदर्शन केले.
मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी माटुंगा येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘महाराष्ट्र पन्नास’ असा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी बऱ्याच कालावधीनंतर दत्ता ताम्हाणे, केशवराव धोंडगे, दत्ता पाटील आणि गणपतराव देशमुख या दिग्गज संसदपटूंना एका व्यासपीठावर आणले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर्किटेक्ट अनंतराव गाडगीळ हेही आवर्जून उपस्थित होते. प्रा. गाडगीळ यांनी सर्वांची ओळख करून घेत बौद्धिक मेजवानीचा लाभ घेतला. या सर्व गोष्टींचा उहापोह यासाठी मुद्दाम करीत आहे की, काय आयुष्यभर समाजासाठी झिजणाऱ्या अशा ज्येष्ठ संसदपटू, थोर नेत्यांना ज्यांनी आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण केले त्यांचा शतकमहोत्सवी वाढदिवस वर्षभर त्यांची विविध भाषणे, त्यांचे विचार राज्यभरात पोहोचवून आपण साजरा करणे योग्य ठरणार नाही? त्यांच्या हयातीत हे सद्भाग्य आपण त्यांना उपलब्ध करुन देऊ शकत नाही? ‘याचि देहि याचि डोळा’ केशवराव धोंडगे हा अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळा पाहू शकले तर ते आपले आशीर्वाद भरभरून देतील आणि एका हातात धोतराचा सोगा पकडून. दुसऱ्या हाताने देवेंद्रांच्या हातावर अत्तर लावतील. पुन्हा एकदा राज्यस्तरीय शतकमहोत्सवी वाढदिवसाच्या समारोहात शरद पवार यांचा मुका घेऊ शकतील. ना समाजवाद्यांनी दत्ता ताम्हाणे यांचा शंभराव्वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला ना शेकापने धोंडगे यांचे आयुष्याचे शतक दणदणीत साजरे केले. निदान महाराष्ट्र शासनाने तरी पुढाकार घेऊन हे घडू शकते असे दाखवावे. दिवंगतांबद्दल पूर्णपणे आदर बाळगून बोलावेसे वाटते की, ‘दिवंगतांची जन्मशताब्दी दणक्यात आणि शतकवीर कोनाड्यात’ अशी परिस्थिती होत असेल तर केशवराव, आम्हाला माफ करा. जयक्रांती!”
“योगेश वसंत त्रिवेदी