Details
टोरंट पॉवर कंपनीला करंट देण्यापूर्वी..
17-Jan-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
काही दिवसांपूर्वीच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडूप परिमंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना इशारा दिला होता की, थकबाकी वसुली करा नाहीतर वेतनवाढ रोखणार, पगार कापणार.. त्याचा किती परिणाम झाला हे अद्याप कळायचे आहे. पण महावितरणने मुंब्रा, शीळ पट्ट्यात थकबाकीदार, वीजचोरांपुढे हात टेकले आहेत हे मात्र कधीच उघड झाले आहे. जो प्रकार भिवंडीत सुरू होता तोच प्रकार या परिसरात सुरू आहे. अनधिकृत कनेक्शन घेणारे वीजचोर, थकबाकीदार महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. भिवंडीत मग महावितरणचा कारभार टोरंट कंपनीकडे सोपवला गेला होता. त्यानंतर अनेक वीज थकबाकीदारांना कंपनीने कारवाईचा दट्ट्या लावला. कायद्याचा बडगा दाखवला. आता तीच टोरंट कंपनी कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ, देसई गाव परिसरात वीजवितरण आणि वसुलीचे काम करणार आहे. निदान महावितरणने तरी तसा प्रस्ताव सरकारकडे ठेवला आहे. यामुळे येथील वीजचोरांच्या पोटात गोळा आला आहे. वर्षानुवर्षेची थकबाकी ही कंपनी कायद्याचा अवलंब करून वसूल करू शकते.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आजवर हे का जमले नाही हा वेगळा प्रश्न आहे. यातही कळवावासीयांचे आणि मुंब्रा परिसराचे दुखणे वेगवेगळे आहे. कळव्यातील बहुसंख्य जनता इमानइतबारे बील भरते आणि मुंब्र्यात वीज थकबाकी अधिक आहे, असे महावितरणचेच म्हणणे आहे. गेली अनेक वर्षे कळवा-मुंब्रा आणि शीळ या परिसरातील वीज प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. राजकीय लागेबंध्यांमुळे येथे या मुद्द्यावर सर्वपक्षीय एकमत होते. पण मुंब्रा, दिवा, शीळ परिसरामुळे कळवावासीयही भरडले जातात, असे कळवा विभागाचे म्हणणे आहे. हे दुखणे जुनाट आहे. आणि चोरी आणि थकबाकी ठेवण्याची मानसिकता याला कारणीभूत आहे. शिवाय राजकीय आश्रयामुळे चालणारी पुंडाई, गुंडगिरी याचाही फटका महावितरणला या विभागात बसत आला आहे. या परिसरातून वीज कंपनीला पुरेसे उत्पन्न होत नाही. तसेच वांरवार वीज पुरवठा खंडीत होण्यामुळेही ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणूनच टोरंटचा पर्याय निवडण्यात आला, असे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
आता टोरंट पॉवर कंपनीला पुढील वीस वर्षांकरिता येथील कंत्राट देण्यात आले आहे. सध्या या परिसरात सुमारे 2 लाख 15 हजार वीज ग्राहक आहेत. टोरेंट पॉवर कंपनी ही या परिसरातील वीज वितरणाच्या साधनसामुग्रीचा दर्जा सुधारण्याबरोबरच वीज पुरवठ्यामध्येही सातत्य आणि दर्जा राखण्याचे काम करेल. पण टोरंट कंपनी आल्यावर भिवंडीतील विजबिले वाढली होती. तोच प्रकार येथे घडू शकतो आणि त्याचा भूर्दंड प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागेल ही या परिसरातील भीती साधार आहे. यातूनच सर्वपक्षीय विरोधाचे हत्यार उपसण्यात आले आहे. गेले काही दिवस या आंदोलनाला धार आली आहे. ठाण्यात रेस्ट हाऊसवर बैठका होत आहेत. आता सर्वपक्षीय समितीने १९ जानेवारी रोजी महामोर्चा आणि कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ परिसरात बंद करण्याचा इशारा दिला आहे. पण यामुळे वीजचोरांना आणि थकबाकीदारांना संरक्षण मिळू शकते. मध्यंतरी या परिसरातील ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांच्याशी बोलताना हा विषय निघाला होता. त्यावेळी दादांनी, येथील जनतेचा टोरंटला विरोध असून, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही खासगीकरण नको आहे. यामुळे त्यांच्या रोजगारावर संक्रांत येणार आहे, असे मत व्यक्त केले होते.
आता टोरंटला विरोधाचा करंट देऊ पाहणाऱ्या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्षही तेच आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या समितीने टोरंटविरोधातील गाऱ्हाणे नेले होते. शिंदे यांनी या परिसरातील जनभावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवून टोरंटचे कंत्राट रद्द करावे अशी समितीची मागणी आहे. महावितरणला होणारा तोटा हेच कारण असेल तर प्रत्येक ट्रानस्फार्मरवर नियंत्रण प्रस्थापित करावे. कुठून विजेची चोरी होते. ते त्यांनी शोधून काढावे. त्यातूनच वीजचोर हाती लागतील. अशा वीजचोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यासाठी आमचे सहकार्य असेल. ही आमदार जितेंद्र आव्हाड यांची भूमिका संघर्षाची नसून समन्वयाची आहे हे महत्त्वाचे. टोरंट रद्दच करा, चार दिवसांत काय ते सांगा नाहीतर बंद, महामोर्चा, आमच्या जमिनीतील विजेचे खांब उपटून टाकू, अशी भाषा या परिसरात सुरू आहे. पण कळवा विभागातून 95 टक्के वीज बिल वसुली आणि मुंब्रा विभागात जर तूट येत असेल तर यावर विचार करून सर्वपक्षीय समितीनेही मध्यममार्ग काढावा आणि हा प्रश्न महावितरण व प्रामाणिक वीज ग्राहकांचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे सोडवावा, एवढेच आवाहन या विषयाला अनुसरून करावेसे वाटते.”

