HomeArchiveजनशक्तीचा धडा!

जनशक्तीचा धडा!

Details
जनशक्तीचा धडा!

    15-Dec-2018

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com

‘ऊतू नका मातू नका घेतला वसा सोडू नका’ अशी एक प्रचलित मराठी म्हण आहे. 2014 मध्ये ज्या ‘मत’ माऊलीने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या हाती देशाची कमान दिली त्यांना याचा काही केल्या अर्थबोध लागत नव्हता किंबहुना तो लावून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नव्हता. लोकभावनांशी खेळून ‘अच्छे दिन’चे दाखवलेले स्वप्न हा तर एक जुमला होता, असे बेमालूमपणे सांगणार्‍यांनी सर्वच बाबतीत कळस गाठला होता. भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची स्वायत्त यंत्रणा. परंतु, तिलाही आपल्या तालावर नाचवायचं. अगदी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडायचं. जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून नावाजलेल्या आपल्याच देशातील ऊर्जित पटेल, रघुराम राजन हे सरकारविरोधी धोरणांवर बोलल्याने त्यांना केरासारखे बाजूला करायचे. इतकेच कशाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, सीबीआयमध्येही ढवळाढवळ करायची. तिथे आपसात लावून द्यायची. देशाची सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रिम कोर्टापर्यंतही ही असहिष्णूता पोहोचावी. हा ठोकशाही, हुकुमशाही कारभार डोळ्यांदेखत पाहूनही लोकशाहीला आपण आपल्याच बोटावर नाचवू हा भाजपा कृपेकरून भ्रमाचा भोपळा फुटण्यास आता सुरूवात झाली आहे.

पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक निकाल हा खर्‍या अर्थाने जनतेने पर्यायाने ‘मतदारराजा’ने लावल्याने भाजपाचे कायम हवेत असलेले विमान जमिनीवर आले आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीत कुणाला उचलायचे नी कुणाला आपटायचे हे आम्हीच ठरवू! हा धडा यानिमित्ताने गेली साडेचार वर्षे गर्वाच्या घरात बसलेल्या भाजपाला मिळाला आहे. 2014 मध्ये काँग्रेसला मुळासकट उपटून टाकणाराही मतदारराजाच होता. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली असली तरी येथे भाजपाला जनतेने नाकारल्याने बालेकिल्ल्यातच सत्तेवर पाणी सोडण्याची वेळ भाजपावर आली आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या विकासाची गाणी जनतेला फारशी रूचली नसावीत. इथं नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आणि शेतकरी कर्जमाफी या चार मुद्यांवर भाजपाला तोंड उघडायलाही जागा न मिळाल्याने पाच राज्यांत लोकसभेपूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भाजपाची ‘घरवापसी’ सुरू झाली आहे. हे आम्ही नाही तर छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराममध्ये जनतेने दिलेले कौल सांगत आहेत. आम्ही देशात खुशहाली आणली, काँग्रेसने 40 वर्षांत काहीच केले नाही, काँग्रेसमुक्त भारत, माणसांपेक्षा गाय महत्त्वाची हे हम करेसो कायद्यानं वागणं बरं नव्हं, हाच धडा पाच राज्यांतील जनशक्तीने दिला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती झाल्यास भाजपाने नवल वाटून घेऊ नये, हा संदेश यानिमित्तानं तमाम भक्तसंप्रदाय व त्यांच्या आकांना गेला आहे. आपला तो लाल्या नि दुसर्‍यांचा तो पप्पू हे गर्वहरण झाल्यानं पुढच्यास ठेच मागचा शहाणा याची प्रचिती जनतेनेच करून दिली आहे.

राजस्थानात नोटाबंदीमुळे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शेतकर्‍यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपाला बसला आहे. अर्थात हे विश्लेषण भाजपा सहजी पचनी पाडून घेणार नाही. पण, जनतेच्या दरबारात चुकीला माफी नाही, हेच लोकशाहीने दाखवून दिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाचही राज्यांत भाजपाविरोधात सुप्त लाट होती. निवडणूक प्रचार जसजसा अंतिम टप्प्यात येऊ लागला, तसतसे मतदार भाजपाविरोधात उघडपणे बोलू लागले होते. राजस्थानातील मतदार नोटाबंदीवरून भाजपाचा उठसूठ उद्धार करत होते. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांत नोटाबंदीचा मुद्दा फारसा चालला नाही. नोटाबंदीला वर्ष उलटून गेल्यानंतरही राजस्थानात मात्र त्याची चीड, संताप कायम होता. नेमकं तेच झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जा, असा आदेशवजा संदेश मोदीबाबांनी आपल्या खासदार, आमदार लोकप्रतिनिधींना दिला होता. पण, सतत जगभ्रंमतीवर असलेल्या मोदींना आपल्याला जनतेने ओळखलं आहे, याचा मागमूस लागला नसावा.

नगरपालिका, महापालिका, राज्यात, केंद्रात भाजप हवी!.. हा दिल्ली ते गल्ली भाजपाच्या प्रचाराच्या कायम मुद्दा राहिला. निवडणुकीतील साम-दाम दंड भेद नीती काही ठिकाणी कामीही आली. पण, जनता दरबारात सर्वच गोष्टींचा निवाडा होतो, याचा हिसाब-किताब पाच राज्यांतील निकालाने आता जनतेची लाट आली रे.. यातून दिली आहे. जीएसटीच्या खिसेकापू धोरणावर राजस्थानमध्ये बराच काळ साठून राहिलेला संताप, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेतकरी आंदोलन, दिल्लीत हातात रूमणं घेऊन आपल्या मागण्यांसाठी धडकलेल्या बळीराजाला सरकारने दिलेला लाठीप्रसाद आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीची फक्त हवा, ही भाजपाविरोधी संतापाची लाट दुसरी तिसरी कुणाची नसून जनताजनार्दनाची आहे. हा धडा भाजपा, मोदी आणि अमित शाह यांनी कायम ध्यानात घ्यावा, हेच जनशक्ती सांगते.”
 

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content