HomeArchiveगेट वे ऑफ...

गेट वे ऑफ इंडिया न्हाहले तिरंग्याच्या रंगात!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“तिरंग्याच्या रंगांत न्हाऊन निघालेले मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’, नौदलाच्या चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, ‘मार्कोस’ मरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, कान तृप्त करणारे भारतीय तसेच रशियन नौदलाचे बॅण्डवादन आणि सुंदर नृत्याविष्कार, डोळ्यांचे पारणे फेडणारे नौदलांच्या जवानांचे संचलन आणि ‘सी कॅडेट कॉर्प्स’चे नृत्य ही बुधवारच्या ‘बिटींग रिट्रीट’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.”
 

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि टॅटू सेरेमनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉईस ॲडमिरल अजित कुमार यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
१९७१च्या भारत – पाक युद्धादरम्यान ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ल्याचे ‘ऑपरेशन ट्रायडन्ट’ राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. ‘ऑपरेशन ट्रायडन्ट’दरम्यान रशियन नौदलाचे सहाय्य मिळाले होते. रशियन नौदलाच्या बँड पथकाने यावर्षीच्या बिटींग रिट्रीट सोहळ्यात सहभाग घेतल्याने हा सोहळा अधिकच आकर्षक ठरला.
 
 
नौदलाच्या ‘चेतक’ आणि ‘सी-किंग’ हेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे ऑफ इंडियाच्या मागून ‘सी-किंग’ हेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरुन लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी तसेच लाल-गुलाबी रंगांची उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.
 
 
 
 
 
“हेलिकॉप्टरवरून दोरीच्या सहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, ‘मार्कोस’ कमांडोंनी दाखविलेली दहशतवादी हल्ला परताविण्याची तसेच बचावकार्याची प्रात्यक्षिके ही बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरित्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवत होते. नौदल बँडचे सादरीकरण होत असतानाच ताजमहल पॅलेस हॉटेलच्या टेरेसवर ट्युबुलर बेलचे वादन झाल्यावर सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.”
  
 
मॅजिकल लाईट टॅटू ड्रमर्स पथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती. यावेळी जवानांनी बंदुकांसह कवायती केल्या. ‘सी-कॅडेट कॉर्प्स’चा सुंदर नृत्याविष्कार यावेळी पाहयला मिळाला.

 

 
 
 
 
 
 

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content