Details
कुरघोडीचे राजकारण मेट्रोपेक्षाही वेगात!
19-Dec-2018
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भिवंडीमार्गे जाणाऱ्या ५ व्या मार्गिकेच्या भूमिपूजनासाठी कल्याणला येणार म्हटल्यावर उत्साहाची कारंजी भाजपामध्ये उसळली आणि तेव्हाच मित्रपक्षाकडून बहिष्काराची वाघनखं बाहेर काढली गेली, धनुष्यबाण रोखले गेले. मेट्रो आणण्याचे श्रेय आमचेच म्हणून डोंबिवली, कल्याणला बॅनरबाजी वगैरे सारे यथासांग पार पडले. त्याआधी कल्याणकरांना भिवंडीकडून कल्याणकडे येणाऱ्या परिसरात कमालीचा बदल आढळून आला. कचराभूमीवरून येणारे वारे सुगंधी झाले. खड्ड्यात गेलेले रस्ते एका रात्रीत डांबरी झाले. गतिरोधक नाहीसे झाले. अतिक्रमणे हटली आणि अतिउत्साहात काही अधिकृत दुकाने, व्यवसायही हटवले गेले. अच्छे दिन, अच्छे दिन म्हणतात ते अचानक कल्याण पूर्वेला आधारवाडी रोडने लाल चौकी मार्गाने वासुदेव बळवंत फडके मैदानाच्या परिसरात अवतरल्याचा भास गेले काही दिवस कल्याणकरांना होऊ लागला आहे. झाले ते बरेच झाले म्हणा. मोदी येणार म्हणून कल्याण महापालिका पण बरेच दिवसांनी कामाला लागली, असे कल्याणमध्येच जो-तो हर्षभरीत होऊन परस्परांना सांगत होता. कचराभूमीची सुगंधी हवा श्वासांत भरून घेत गेले चार दिवस प्रभातफेरी करणारा क्राऊड आनंदात होता.
मोदी आले, ते बोलले. त्यांनी भूमिपूजन केले आणि ते गेले. ज्या मेट्रोची निविदाही निघालेली नाही, जिची पद्धतशीर योजनाही अद्याप तयार नाही, भूसंपादन नाही, अशा ठाण्याहूनही न सुटलेल्या प्रस्तावित मेट्रोचे भूमिपूजन त्यांनी केले. मोदी आनंदात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंदात, भाजपा खासदार कपिल पाटील खुश, कल्याणचे आमदार खुश, ठाणे जिल्ह्यात कमळ फुलवणारे कार्यकर्ते, निवडून आलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी खुश असा सारा आनंदसोहळा मंगळवारी पार पडला. या आनंदसोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनीही मोठी शिकस्त केली. सारे लोकशाही संकेत धाब्यावर बसवून विरोधी पक्षांच्या काहीजणांची धरपकड केली. मोदींना काळा रंग जराही दिसू नये म्हणून काळे कपडे घातलेल्यांनाही परत पाठवले. कुणी शाई फेकू नये म्हणून शाईपेनांवर बंदी घातली. शाईपेन कुणी विकत घेऊ नये म्हणून दुकाने बंद केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आभाळ काळे करण्याची भाषा करत होते. त्यामुळे पोलिसांची आकाशावरही करडी नजर होती म्हणतात. स्वप्ने वाटणाऱ्या मोदींच्या नजरेला सारे काही छानछान दिसायला हवे म्हणून पोलिसांनी, भाजपाच्या नेत्यांनी फार फार मेहनत घेतली.
लोकशाहीने काही काळ ब्रेक घेतल्यागत वातावरण होते. मग मोदी यांनीही बोलताना मराठीत सुरूवात करत मुंबई, ठाण्याची स्तुती केली. मुंबई आणि ठाण्याने देशाला स्वप्नांची जाणीव करून दिली, एवढं वाक्य ते बोलले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मेट्रो ५ मुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे मोदी म्हणाले. पण उपनगरी रेल्वेसेवेवर नाराज कल्याणकर प्रवाशांनी मोदींच्या स्वागतासाठी गाजराची माळच लावून प्रतिकात्मक आंदोलन केले. मेट्रो सुरू करण्यापेक्षा लोकलच्या सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी होती. भिवंडी मुंबईला जोडली जाणार असली तरी हा मार्ग कुठल्याही रेल्वेस्थानकाला जोडला जाणारा नाही. ही त्रुटी मोदी आणि फडणवीस यांनीही या प्रकल्पाची भलामण करताना नजरेआड केली आहे. मराठीत बोलणे, टाळ्या घेणे, स्वप्ने विकणे हे सारे काहीजणांना सहज जमून जाते. पण स्वप्ने वास्तवात उतरायला खूप वेळ लागतो आणि तो वेळ आता या सरकारकडे उरलेला नाही. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. कितीही घाई केली तरी हे प्रकल्प कार्यान्वीत होऊ शकत नाहीत. लोकानांही हे माहित आहे आणि राजकीय पक्षांनाही. पण श्रेय घ्यायला, बॅनर लावायला, घोषणा करायला, भूमिपूजन करायला, आणखी नवीन स्वप्ने दाखवायला कुणाच्या काकाचे काय जाणार आहे, ही मनोवृत्ती सध्या सर्वत्र दिसते आहे.
निवडणुका जसजशा जवळ येतील तसा या वृत्तीला अधिक बहर येईल, घोषणा होतील, भूमिपूजन होईल, बॅरीकेड्स लावून काम सुरू असल्याचेही नाटक करून दाखवले जाईल. पण लोकांपुढील मूळ प्रश्न, त्यांच्या प्रवासातील रोजच्या अडचणी तशाच राहातील. कल्याण पूर्वेला रेल्वे प्रवाशांच्या दररोजच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गाजर आंदोलनाने झाला असला तरी त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि यापुढेही दिले जाणार नाही. कारण आता निवडणूकघाई सुरू झाली आहे. यामुळेच फडणवीस यांनीही नाशिक मेट्रोचीही घोषणा करून टाकली. आहे ती मेट्रोच अद्याप मुंबईतून पुढे सरकायची आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली मार्गे कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो मार्ग मंजूर झाल्याचे श्रेय घेतले होते. तो मार्गही आता फडणवीस यांनी बदलला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना यापुढील काळात आणखी अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. कुरघोडीचे राजकारण आता मेट्रोपेक्षाही वेगाने सुरू झाले आहे.”

