Details
कुठं नेऊन ठेवलय ‘कल्याण’ माझं!
13-Feb-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले ऐतिहासिक कल्याण, अशी ओळख सांगण्यासाठी एक कल्याणकर म्हणून आज खरोखरीच मला आनंद वाटेल? याच कल्याणमधील काळा तलाव, कोंडेश्वर, गणेश घाट, गणेश मंदिर, टिटवाळा, दुर्गाडी किल्ला, लोणाड लेणी, शिवमंदिर, अंबरनाथ शिवमंदिर, खिडकाळी, विठ्ठल मंदिर, शहाड मलंगगड, मेट्रो जंक्शन मॉल ही ठिकाणं पर्यटन विहाराच्या दृष्टीने शहराचा, तालुक्याचा लौकिक वाढवतात. पण, हेच कल्याण बकाल आणि अस्वच्छ असल्याची पोच मिळाल्यावर कल्याणकरांच्या भावना काय असू शकतील? कल्याण-डोंबिवली महापालिकेत वर्षानुवर्षे सत्तेचा मलिदा गिळून गब्बर झालेले नगरसेवक किंवा निवडणूक काळात बॅनरबाजीतून विकासकामांचे दर्शन घडवणारे आमदार, खासदार. या, रात्रंदिनी विकासकार्यात मग्न कल्याणमधील लोकप्रतिनिधींचा शहरवासीयांना खरोखरच अभिमान वाटायला हवा. त्यांच्यामुळे आज आपल्या शहराचा लौकिक देशभर वाढला किंबहुना वाढतो आहे.
इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आले नि इतिहासचं बदलला. शहर रातोरात चकाचक झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची पावले ज्या-ज्या वेळी कल्याणला लागली त्या-त्यावेळी हे शहर नव्हे तर सिटी स्मार्ट अवतरली. येथे हवेतून रिक्षानेही उड्डान भरले. तसंही केंद्र सरकारने कल्याणची स्मार्ट सिटीत कधीच निवड केली आहे. पण, रेल्वेस्टेशन ते शिवाजी चौक, महालक्ष्मी हॉटेल, विकास हॉटेल गल्ली, स्कायवॉक हा परिसर पाहून कुणाच्याही नजरेत भरावा. पानाच्या पिचकार्यांनी रंगलेला स्कायवॉकचा कोपरान् कोपरा, भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा खुलेआम वावर, भाजी व फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर इतरत्रः फेकून दिलेला कचरा, स्कायवॉकवरील उखडलेल्या लाद्या आणि तुटलेल्या पायर्या ना महापालिका प्रशासनाला दिसत ना सत्ताधार्यांना.
आमची मुंबई, स्वच्छ मुंबई! आमचे ठाणे, स्वच्छ आणि सुंदर ठाणे तसेच आमचे कल्याण बकाल आणि वाहतूक, स्वच्छतेच्या नावाने बेशिस्त कल्याण! हे उद्गार कल्याण स्टेशनपासून बाजारपेठ परिसरात फेरफटका मारल्यास मुखातून बाहेर पडावेत. अगदी वर्षानुवर्षांपासून आमचं कल्याण आहे तसचं ना जुन ना नवं. विकास गल्लीत तर घाणीचं साम्राज्य. गल्लीत दोन्ही टोकांना रस्त्याच्या दुर्तफा गटाराचे पाणी वाहत आहे. याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण केल्याविना पर्याय नाही. स्कायवॉकच्या खाली आणि वर देहव्यापार करणार्या वारांगना बिनधास्त वावरत असतात. कल्याणमध्ये कुणीही पै-पाहुणा आला तरी त्याला आपण भलतीकडे आल्याची प्रचिती काही काळ होते. पण, नंतर हे कल्याणच असल्याची ओळख त्यालाही पटू लागते. या वारांगनांविरोधात कठोर कारवाईसाठी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी कुणाकडेही वेळ नसल्याने त्यांना कल्याण स्कायवॉक आणि स्टेशन परिसर आंदण दिला आहे का, अशी शंका कुणालाही यावी.
कल्याण-डोंबिवली महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आज सुमारे 36 वर्षांचा काळ लोटला असला तरी येथे ट्रॅफिक सिग्नलच्या नावाने बोंब आहे. रेल्वेस्टेशन परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, दुर्गाडी चौक मार्गावरील वाहतूककोंडी कायम बेजार करणारी. मात्र येथे सिग्नलची खरोखर गरज आहे, असे महापालिकेतील सत्ताधारी व लोकप्रतिनिधींना जराही वाटत नाही. कल्याण महापालिकेत शिवरायांच्या नावाने रयतेचे राज्य चालवणार्या शिवसेनेची सत्ता असली तरी नगराची सेवा करणारा नगरसेवक मेवा गोळा करण्यात गुंग का आहे? इमारती, चाळी, स्केवअर फुटामागे, भूखंडामागे किती, ही गणिते त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची, अशी टीका, आरोप का व्हावेत? कल्याण महापालिकेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेले 122 नगरसेवक करतात तरी काय? झोपडी-चाळीतून गरिबीचा त्यांचा सुरू झालेला प्रवास टोलेजंगी टॉवर, बंगला, गाडी असा एकाएकी कसा झाला, हे मतदारराजाला पडलेलं कोडं आहे. तो विकासाला, आकड्यांच्या फेकूगिरीला दरवर्षी मतदान करत असतो. आज ना उद्या आपलं कल्याण शहर बदलेल. नावापुरतं जंक्शन असलेलं कल्याण टर्मिनस म्हणून नावारूपाला येईल. स्मार्ट सिटीत समाविष्ट कल्याणकडेही लोक बघतच राहतील. येथेही स्वच्छता नांदेल, स्टेशनपासून शहराच्या सर्वदूर परिसरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांमार्फत कडक शिस्त लागेल. सामान्य नागरिकालाही माझे कल्याण, सुंदर कल्याण म्हणून हेवा वाटेल! ही दिवास्वप्ने प्रत्येक निवडणुकीत पाहण्यापलीकडे आम्हा कल्याणकरांना पर्याय तरी काय?
दीपक हॉटेल ते शिवाजी चौक हे कल्याण शहराचं नाक असलेल्या रस्त्यावर उतरताच दुर्गंधीने तुम्हाला-आम्हाला नाक दाबावं लागणार नाही. प्रवाशांच्या अंगावर धावून येणारे गुंड, दादा, भाई रिक्षाचालक वठणीवर येतीलच, फेरीवाल्यांना पूर्वकल्पना न देता कधीकाळी कल्याण महापालिकेने स्टेशन परिसर मोकळा करण्यासाठी धडक कारवाई केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. आपल्या दुकानांसमोरच कचरा टाकणार्या दुकानदारांना शिस्त लागून त्यांच्यात परिवर्तन घडल्यास हा जर तरचा आणि स्वप्नात तरी कल्याण बदलेला दिसेल का, ही भाबडी अपेक्षा आजही कल्याणकरांना आहे. यात गैर तरी काय?”

