HomeArchiveआयाराम-गयारामांचे यशापयश!

आयाराम-गयारामांचे यशापयश!

Details
आयाराम-गयारामांचे यशापयश!

    25-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार
jagdish.bhovad@gmail.com
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आयागाम-गयारामांची काय स्थिती झाली हेही पाहणे महत्त्वाचे आहे. भाजपाचे बंडखोर माजी खासदार, माजी मंत्री, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनीही निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीत प्रवेश करून राजनाथ सिंहांविरोधात दंड थोपटले होते. मात्र त्यांच्याही पदरी निराशा आली.

महाराष्ट्रात मात्र आयारामांना चांगले यश मिळालेले पाहयला मिळाले. अहमदनगरमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट हवे होते. मात्र मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास विरोध केला. अखेर सुजय यांनी भाजपामध्ये जाऊन, तेथील विद्यमान खासदाराचे तिकीट कापायला लावून स्वतः तिकीट मिळवले आणि ते दणदणीत मताधिक्क्याने निवडून आले. नांदेडमध्येही शिवसेनेचे आमदार प्रतापराव चिखलीकर-पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करीत लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभूत करण्याची कामगिरी बजावली.

तिकडे चंद्रपूरमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनाही एका आयारामानेच घरी बसवले. शिवसेनेचेच आमदार बाळू धानोरकर यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत, जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करायला लावीत, स्वतः उमेदवारी मिळवीत हे यश मिळवले. पालघरमध्येही शिवसेनेने भाजपाचे मागील वेळचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत आयात करीत पालघर शिवसेनेकडे राखले आहे. हातकणंगले मतदारसंघातही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव केला. तसेच माढामध्येही राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांनी विजय मिळवला. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये जात शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रस्थापित खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याची कामगिरी बजावली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून 2014 ची निवडणूक लढवलेल्या भारती पवार यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश करीत तेथील विद्यमान खासदाराचे तिकीट कापायला लावून स्वतः उमेदवारी मिळवली होती. भारती पवार यांनीही यश मिळवले आहे. एकेकाळी शिवसेनेचे खासदार राहिलेल्या सुभाष वानखेडे यांना 2014 मध्ये मोदी लाटेतही पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत हिंगोलीतून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यंदाही पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी तेथे विजय मिळवला. सातारामध्ये मात्र आयाराम नरेंद्र पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. तेथे राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांचे प्रस्थ कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. वसंतदादा पाटील घराण्यातील कुणालाच काँग्रेस तिकीट देत नाही.

यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर नशीब अजमावले होते. मात्र त्यांना यश आले नाही. भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनाही नागपूरमधून नितीन गडकरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तिकडे कर्नाटकातही काँग्रेसचे आमदार उमेश जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. जाधव यांनी खरगे यांच्याविरोधात विजय मिळवण्याची कामगिरी बजावली. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर खासदार राहिलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांनी यावेळी भाजपाच्या तिकिटावर रामपूरमधून दंड थोपटले होते. परंतु आझम खान यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले.”
 

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content