Details
अरेरे! आमचा प्रेमचंद गेला!
17-Jun-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
अरेरे! आमचा बालपणीचा मित्र प्रेमचंद शर्मा गेला. रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. प्रेमचंदचे बालपण आणि तारुण्य घोडपदेव या आमच्या गिरणगावात गेले. प्रेमचंदचे वडील मुन्निलाल शर्मा यांची घोडपदेवमध्ये लॉन्डरी होती. त्यांना लोक मुन्नाभाई म्हणून ओळखत. मुन्नाभाई अतिशय सरळ आणि सभ्य गृहस्थ होते. प्रेमचंद हादेखील त्यांच्यासारखाच होता. मुन्नाभाई दिवसभर कपड्यांना इस्त्री करताना दिसत. प्रेमचंदची आई त्यांना दुकान सांभाळण्यास मदत करीत असे.
प्रेमचंद थोडा मोठा झाल्यावर दुकानावर बसू लागला. गल्ल्यावर बसूनच तो अभ्यास करू लागला. त्याला लहानपणासूनच वाचनाची आवड होती. तो वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्यात मग्न असलेला अनेकदा दिसत असे. वर्तमानपत्रांतून शब्दकोडी लोकप्रिय होऊ लागली तेव्हा ‘शिवनेर’मध्ये शब्दकोडे प्रसिद्ध करण्याची गरज आम्हाला भासू लागली. प्रेमचंद हा उत्तम शब्दकोडी करतो हे जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही त्याच्याकडे शब्दकोड्यांची मागणी केली. ती त्याने ताबडतोब मान्य केली. पुढे अनेक वर्षे प्रेमचंद ‘शिवनेर’साठी शब्दकोडी तयार करीत होता. अशाप्रकारे त्याचा पत्रकारितेचा शुभारंभ हा ‘शिवनेर’पासून झाला.
प्रेमचंदचे हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यामुळे त्याला ‘दोपहर का सामना’ या वर्तमानपत्रात नोकरी मिळाली. तेथे तो अखेरपर्यंत प्रामाणिकपणे कार्यरत राहिला. या वर्तमानपत्राचे संपादक बदलले पण प्रेमचंद टिकून राहिला. त्याने प्रत्येक संपादकाचा विश्वास संपादन केला. आपले काम तो इमानेइतबारे करीत राहिला. हे करीत असताना सामाजिक कार्यातही तो कधी मागे हटला नाही.
सुमारे दहा वर्षांपूर्वी तो प्रतिक्षानगर येथील पत्रकारांच्या सोसायटीत राहण्यास गेला. त्या सोसायटीचे तो अॅसेट बनला. सोसायटीची कामे तो खिशाला झिज देऊन करत राहिला. प्रेमचंद हा माता-पित्याचा आदर्श सुपुत्र, प्रामाणिक पती आणि जबाबदार पिता होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो एक चांगला मित्र आणि हिर्यासारखा माणूस होता. काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे एका हिंदी मासिकाचे काम चालून आले. ते काम एका दिवसात पूर्ण करायचे होते. लेख तयार होते. त्यावर संपादकीय संस्कार करायचे होते. लेखांना मथळे द्यायचे होते. शिवाय संपादकीय लिहायचे होते. आम्ही आव्हान म्हणून हे काम स्वीकारले. मदतीला प्रेमचंदला बोलावले. प्रेमचंद ‘शिवनेर’च्या कार्यालयात धावून आला. त्याने काही तासांत तो अंक तयार करून दिला. आमच्या डोक्यावरील एक ओझे त्याने उतरविले. त्या कामाचे मानधन मात्र त्याने घेतले नाही.
प्रेमचंद असाच होता. नि:स्वार्थपणे काम करणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा आणि लोकांवर प्रेम करणारा. तथापि, इतका गुणी प्रेमचंद हट्टीदेखील होता. एखादी गोष्ट त्याला पटली नाही की तो कोणाचेही ऐकत नव्हता. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मित्रपरिवार आणि घरची मंडळी त्याने शस्त्रक्रिया करुन घ्यावी म्हणून गयावया करीत होती. पण प्रेमचंद ऐकत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याचा आणि आमचा मित्र अॅड. दयानंद डेरे अक्षरश: शस्त्रक्रियेसाठी त्याच्याशी भांडला. पण प्रेमचंद बधला नाही. माधवबागेतील आयुर्वेदिक उपचारांवर भिस्त ठेऊन तो ते उपचार घेत राहिला. शेवटी घडू नये ते घडले. रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आमच्या या बंधूवश मित्राची प्राणज्योत मालवली. घोडपदेवमधील त्याचे कैक मित्र ही बातमी समजताच सायनच्या दिशेने धावले. प्रवीण खामकरसारखे त्याचे मित्र दु:खद अंत:करणाने सर्व सोपस्कर पार पाडण्यासाठी कामाला लागले. आम्हीदेखील जड अंत:करणाने आमच्या या मित्राला सायन स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. अरेरे! आमचा प्रेमचंद आम्हाला सोडून अकाली गेला. प्रेमचंदच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबियांस हे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो हीच प्रार्थना!”

