Homeडेली पल्सआज शून्य सावलीचा...

आज शून्य सावलीचा दिवस! घ्या मुंबई, ठाण्यात अनुभूती!!

आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्यादिवशी भरदुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस‘ असे म्हटले जाते. आज आपण या शून्य सावलीचे रहस्य जाणून घेणार आहोत. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो, असे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले. आज याची अनुभूती अनेकांना अनेक ठिकाणी घेता येईल, असेही ते म्हणाले.

निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असताना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमी कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जाताना दिसते. वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भरदुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्यादिवशी भरदुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो, अशी माहिती त्यांनी दिली.

शून्य सावलीचे रहस्य समजून घेताना आपणास लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकलेला भूगोल परत आठवावा लागेल. पाच प्रमुख वृत्ते आहेत. (१) आर्क्टिकवृत्त- ज्याच्या पलिकडील उत्तरेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसू शकतो. (२) कर्कवृत्त- हे विषुवृत्त्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला (सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेकडे आहे. याच्या उत्तरेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. हिंदुस्थानातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम, छत्तीसगड, त्रिपुरा व झारखंड या राज्यातून कर्कवृत्त जाते. (३) विषुववृत्त (४) मकरवृत्त- हे विषुववृत्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला (सुमारे साडेतेवीस अंश) दक्षिणेकडे आहे. याच्या दक्षिणेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. (५) अंटार्क्टिकवृत्त- याच्या दक्षिणेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.

आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला आहे. सूर्य २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोनच दिवस विषुववृत्तापाशी येतो. २१ जूनला तो जास्तीतजास्त उत्तरेकडे कर्कवृत्तापाशी दिसतो. तर २२ डिसेंबरला सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेकडे मकरवृत्तापाशी दिसतो. तारका व ग्रह वैषविक वृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असतात. तारका व ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला ‘क्रांती‘ म्हणतात. मुंबई परिसराचे उत्तर अक्षांश सुमारे १९ अंश आहेत. सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर १९ अंश होईल त्यादिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळे यादिवशी माध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ म्हणतात, असे ते म्हणाले. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावली आपणास अनुभवता येते. पण दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शून्य सावलीचे दिवस

(१) रत्नागिरी, ११ मे  (२) सातारा, सोलापूर, १२ मे (३) उस्मानाबाद, १३ मे (४) रायगड, पुणे, लातूर १४ मे (५) अंबेजोगाई, केज १५ मे (६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे (७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पैठण १७ मे (८) संभाजीनगर, जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे (९) नाशिक, वाशीम, गडचिरोली २० मे (१०) बुलढाणा, यवतमाळ २१ मे (११) वर्धा २२ मे (१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे (१३) भुसावळ, जळगाव, नागपूर २४ मे (१४) नंदुरबार, २५ मे, यादिवशी शून्य सावली योग आहे. सूर्याची क्रांती आपल्याकडील मोठ्या पंचांगातून दिलेली असते. स्थानिक अक्षांशाएवढी ती ज्यादिवशी असेल तो दिवस शून्य सावलीचा मानावा. वेळ दुपारी सूर्य आकाशात डोक्यावर आल्याची समजावी, असे सोमण म्हणाले.

शून्य सावली दिसण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी. पुठ्याचे एक जाड नळकांडे तयार करून उन्हात ठेवावे. किंवा एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी. तिच्या सावलीचे निरीक्षण करावे. काठीच्या सावलीची लांबी कमीकमी होत जाईल. ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळे अदृश्य होईल. नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल. मुलांच्या एका गटाने उन्हात गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून कडे करावे. नंतर सावलीचे निरीक्षण करावे. आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल. याचा उंचावरून फोटो घेता येईल. शून्य सावलीचे निरीक्षण करण्याची संधी आपणास महाराष्ट्रात मिळू शकते.

कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशातून हा अनुभव घेता येणारच नाही. कारण त्या प्रदेशातून सूर्य आकाशात डोक्यावर आलेला दिसतच नाही. तसेच मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागातून हे दृश्य अनुभवता येणारच नाही. सूर्याकडे कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचा वापर करावा. शून्य सावलीचा अनुभव घेताना सूर्याकडे पाहण्याचा प्रश्नच नसतो. शून्य सावलीच्या दिवशी दुपारी आकाशात सूर्य ठिक डोक्यावर आल्यावर उन्हात उभे राहून सर्वांनी आपली सावली अदृश्य कशी होते याचा नक्कीच अनुभव घ्यावा. निसर्गातील हे रहस्य समजून घेतल्यामुळे नक्कीच आपण आनंदाचे साक्षीदार होऊ शकाल. निसर्गात चमत्कार नावाची गोष्टच नसते. प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण असते. आपण या गोष्टींमागचा कार्यकारणभाव समजून घेणे जरूरीचे आहे. यामुळे मनातील अंधश्रद्धा कमी होऊन मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागतो. आपणास तशी सवयच होऊन जाते, असे दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा करावी त्या कालावधीचा अर्धा भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवावा म्हणजे सूर्य आकाशात डोक्यावर येण्याची वेळ समजेल. मुंबईत ही वेळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांची आहे. त्यावेळी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल. विद्यार्थी भूगोल विषय पुस्तकातच शिकतात. विषय पाठ करून मार्कही मिळवितात. पण भूगोल पुस्तकात तसाच राहतो. निरिक्षणशक्ती, विचारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावयास पाहिजेत. शिक्षकांना तसेच पालकांना हे शक्य आहे. शून्य सावलीच्या दिवशी त्यांना शून्य सावलीचे निरीक्षण करायला लावून त्यांना जर उत्तरायण व दक्षिणायन वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना या गोष्टी सहजपणे समजू शकतील. विशेष म्हणजे त्यांना या विषयाची गोडी लागून ते अधिक निरीक्षणे करू लागतील. ती एक सवयच होऊन जाईल. या विषयात गोडीही निर्माण होईल, असे सोमण यांचे म्हणणे आहे.

आपल्या घराच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांची जागा कशी बदलते, सूर्य पूर्व क्षितिजावर एकाच ठिकाणी का उगवत नाही, ऋतूंमध्ये बदल कसा होतो, पृथ्वीचा अक्ष जर साडेतेवीस अंशानी कललेला नसता तर काय झाले असते, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधून काढायचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. मूलभूत संशोधन करण्याची गोडी लहान वयातच विद्यार्थ्यांना लावली गेली पाहिजे. तरच या हिंदुस्थानात उद्यांचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content