“मैफलीत आरास मांडलीस पुन्हा पुन्हा पण
सूर पोरके, स्वरातही तो लगाव नाही” (महेश केळुस्कर)
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच महायुतीच्या आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळावा शनिवारी मुंबई मुक्कामी झाला. येऊ घातलेली राज्य विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व ठरवल्याप्रमाणेच झाले यात संशय नाही. परंतु कविवर्य म्हणतात तसा ‘लगाव’ मात्र या नेत्यांच्या भाषणात दिसला नाही, हे मान्यच करावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मेळाव्यात प्रमुख भाषणे झाली. त्यांचीच भाषणे होणार हे गृहीतच होते. परंतु या तिघांच्याही भाषणाने निराशा केली असेच म्हणावे लागेल.
एकतर मेळावा घेण्याची त्यांची वेळ चुकली. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. बहुसंख्य आमदार शुक्रवारी संध्याकाळीच मुंबई सोडून आपापल्या मतदारसंघात जातात. आता आमदार मतदारसंघात जातात म्हणजे पदाधिकारीही मतदारसंघ सोडणार नाहीत हे ओघाने आलेच. इतक्या साध्या गोष्टी मेळावा आयोजित करणाऱ्या आयोजकांना कळल्या नसणार का? यात भर म्हणून हा मेळावा तीन पक्षांचा होता. म्हणचेच कुणाचाही नव्हता. कारण सर्वपक्षीय मेळावा, मोर्चा वा सत्याग्रह असला की माणसे/कार्यकर्ते कुणी आणावेत हा प्रश्न नेहमीच पडतो व संबंधित कार्य फसफसते, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे.
बरे.. आता भाषणे तरी काही वेगळी, जोशभरी करावीत तर तेही नाही. लोकसभा निवडणुकीतील प्रचार आणि निवडणुकीच्या निकालानंतर दिलेल्या त्याचत्याच प्रतिक्रिया ऐकून जनतेचे कान विटले आहेत. त्या कानांना काहीतरी नवीन ऐकायचे आहे. परंतु त्यांच्या ग्रामोफोनची ‘पिन’ अजून तेथेच अडकलेली दिसतेय.
“वो सबसे मिलते हुए हमसे मिलने आता है
हम इस तरह किसी हरजाई से नही मिलते” (राहत)
‘लोकसभेत मार पडलाय.. आता गाफिल राहू नका. तडजोड केली तरच युती टिकेल. आपण सकारात्मक राहिले पाहिजे. सरकारची कामे जनतेसमोर नेणे आवश्यक आहे.’ आदी गेल्या महिनाभरातील विधानेच या तिन्ही नेत्यांनी केली. एक आणखी विधान होते ते म्हणजे आमच्याबाबत अपप्रचार केला गेला. हे विधान तर सर्वांनाच लागू होते. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांबाबतही असाच अपप्रचार केल्याचा आरोप केला जात आहे.

खरं तर गेल्या वर्षभरापासून राज्यात सगळीकडेच राजकीय प्रदूषण वाढलेले आहे आता पुन्हा येते चार/पाच महिने असेच प्रदूषण झेलावे लागणार आहे. दरम्यान, विधान परिषदेत एक दुर्दैवी प्रकार घडला. त्यावर सर्वांनीच टीका केली. अखेर माफीपत्राने हे प्रकरण मिटले. परंतु येथेही नेतृत्त्वाला चिमटे काढण्याचा प्रयन्त पिठासीन अधिकाऱ्यांनी केला. तो मात्र योग्य नव्हता असे सुचवायचे आहे. खरंतर ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडले ते महाशय मात्र सपशेल सुटले आणि आता तोंडात मिठाची गुळणी असल्याप्रमाणे चूप आहेत. प्रतिक्रिया जितकी वाईट तितकीच आधीची क्रियाही बकवासच होती. त्यातच नसलेले प्रेम दाखवून पिठासीन अधिकारी म्हणतात “उद्धवजींनी आणखी माफी मागावी असं आपणास वाटते का?” किंवा अनिल परब यांना उद्देशून विरोधी पक्षनेतेपदाच्या वादाचा अप्रत्यक्ष उल्लेख करणे कितपत नियमांना धरून आहे याचाही विचार सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायला हवा.
वाद कसे टाळणार?
आगामी विधानसभा निवडणुकीत आपापसातील वाद टाळावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. वाद असतील तर प्रमुख नेत्याकडे जावे असा सल्ला देण्यात आला आहे. शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी तसेच आणखी काही छोटे पक्ष.. इतके लटाम्बर बरोबर असताना वाद करू नका असे सांगणे म्हणजे आदर्श व्यवस्थेत राहण्यासाखे आहे. तिन्ही पक्षांचे एकवेळ मागे ठेवू. प्रत्येक पक्षात पक्षांर्गतच वाद इतके आहेत की ते हाणामारीपर्यंत पोहोचतील अशी भीती वाटते. मुंबई, ठाणे व कोकण भागातील जागावाटपावरून शिवसेनेतच तुफान रणकंदन होईल असा अंदाज आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काहीच आलबेल नसल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. कोकणातील जागांवरून भाजपतही काही आलबेल नसल्याचे अनेकांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात राष्ट्रवादीतही मोठी वादावादी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीला अजून चार/पाच महिनेतरी बाकी आहेत. आपण गेल्या तीन-चार वर्षांत पाहिलेले आहे की राजकारण तीन-चार महिन्यांतही पालटू शकते. आणखी महत्त्वाचे म्हणजे आता या तीन-चार महिन्यांत राज्य सरकार जे निर्णय वा धोरणे जाहीर करेल त्याची अंमलबजावणी होईल की नाही याची खात्रीच जनतेच्या मनात नाही. अशा परिस्थितीत सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जोरशोरसे केली तरच सरकारचा निभाव लागणार आहे. अखेर गेली पाच वर्षे भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. असे असताना मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे ठरलेच नव्हते असे सांगून शिवसेना-भाजप युती तोडण्याचे पातक कशापायी घडले हेही जनतेला कळणे आवश्यक आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांना आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे लागणार आहे. या पक्षांकडे नेत्यांची कमतरता मुळीच नाही. परंतु त्यांना कामाला कसे लावावे हेच महत्त्वाचे ‘काम’ आहे. सर्वच जण जर नेत्यांच्या भरोसे कामाला लागले तर ‘आनंदच’ आहे…
“जाका गुरुभी अंधला, चोला खरा निरंध|
अंधे अंधा ठेलिया, दयूनू कुप पडत||” (कबीरदास)
अशी दारूण परिस्थिती महायुतीवर येऊ नये हीच सदिच्छा!
छायाचित्र: वसंत प्रभू

