महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उत्तर प्रदेशात अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याकरीता एक भूखंड दिला जाईल, असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे समजते.
योगी आदित्यनाथ कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र भवनसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची विनंती योगी आदित्यनाथ यांना केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते.
बुधवारी त्यांनी मुंबईतल्या प्रवासी उत्तर प्रदेशवासियांशी संवाद साधला. त्यानंतर आज सकाळी त्यांनी विविध बँकर्सची भेट घेतली. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा केली. उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीची संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिटाची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओसवाल इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच उद्योगपतींशी चर्चा केली. उत्तर प्रदेशात चित्रनगरी उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशीही योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केली. विविध उद्योजकांबरोबर त्यांनी जवळजवळ १७ बैठका केल्या, असे समजते.
योगी आदित्यनाथ यांनी आज सर्वात आधी बड्या बँकर्सची भेट घेत गुंतवणुकीसाठी अर्थपुरवठा करण्याचे आवाहन केले. यावेळी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिवसुब्रह्मण्यम रमणसारख्या बड्या बँकर्सचा समावेश होता.
बड्या उद्योगपतींशीदेखील योगींनी चर्चा केली. त्यात आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, हिरानंदानी समुहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी आणि जेएसडब्ल्यू समुहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल, पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली. अदानी समुहाचे करण अदानी, अंबानी समुहाचे मुकेश अंबानी यांचीदेखील योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटकरीता योगी आदित्यनाथ उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या समिटकरीता 17 लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशात आणण्याचा योगींचा प्रयत्न आहे.

