हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले आणि समस्त राजकारण्यांना एक गहन प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? बाळासाहेब ठाकरे यांचा ‘कर्तबगार’ पुतण्या शिवसेनेला अखेरचा ‘राम राम’ करुन बाहेर पडला. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारखी ‘निष्ठावंत’ मंडळी शिवसेनेत नाहीत. मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी आणि ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार/प्रचार करणारी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता कशी चालणार?
बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र घेऊन १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. भल्याभल्या रथी-महारथींना ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवावे लागले. कुणी स्वार्थासाठी, कुणी प्रेमासाठी, कुणी कर्तव्यापोटी असे अनेकजण मातोश्रीवर आले. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर या मातोश्रीचे काय होणार, असा ‘बालिश’ प्रश्न समोर आणण्यात आला. पण बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी या सर्वच प्रश्नांना निरर्थक ठरवले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष/कार्यप्रमुख म्हणून शिवसेनेच्या महाअधिवेशनात मान्यता देण्यात आली, त्याचवेळी बाळासाहेबांनी स्पष्टपणे विचारले होते की, माझा मुलगा म्हणून मी उद्धवला पुढे आणणार नाही. त्याच्यात कर्तृत्व असेल तर तो पुढे येईल. तुम्हाला मंजूर असेल तर मी मान्यता देईन. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव मांडला होता. नंतर काय झाले ते सर्वांनाच माहित आहे. पण बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या तडफेने शिवसेना पुढे आणली त्याबद्दल त्यांना तमाम मराठी माणसाने आणि समस्त हिंदुंनी मानलेच पाहिजे.
२००९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ४५ आमदार निवडून आले होते. तेव्हा शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती होती. परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथराव खडसे यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आदी तमाम नेत्यांच्या प्रचारासमोर अभिमन्यूसारखी लढत देत एकट्याच्या बळावर ६३ आमदार निवडून आणले. २८८च्या सभागृहात दुसरा क्रमांक पटकावला.

ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणून संभावना केली त्याच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा, शरद पवार यांनी क्षणार्धात भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची ‘गुगली’ टाकली. पण देवेंद्र फडणवीस यांना ते मंजूर नसल्याने त्यांनी नैसर्गिक मित्रपक्ष या नात्याने मातोश्रीवर दूत धाडून उद्धव ठाकरे यांच्यासमोर दोस्तीचा हात पुढे केला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत जनादेश कोणत्याही एका पक्षाला नव्हता तर तो भाजप आणि शिवसेना युतीला होता आणि जर हे नैसर्गिक मित्रपक्ष एकत्र आले तरच महाराष्ट्रात स्थिर सरकार येऊ शकणार होते. हा समंजसपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवून देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद दिला आणि १२२+६३=१८५ अशी मजबूत युती अस्तित्त्वात आणली.
डिसेंबर २०१४ मध्ये सुरुवातीला ही युती आकाराला येण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कार्ल्याच्या एकवीरा देवीचे दर्शन ६३ आमदारांसमवेत घेताना लवकरच मी एकशे ऐंशी आमदारांना घेऊन येईन, असे सांगत समयसूचकता दाखविली होती. शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाली असली तरी महाराष्ट्राच्या जनतेशी आमची नाळ जोडलेली कायम असल्याचे ठणकावून सांगायलासुद्धा उद्धव विसरले नाहीत. देशात जसा विरोधी पक्ष नामोहरम झाला होता तसाच तो महाराष्ट्रातसुध्दा अंधारात चाचपडत होता.
उद्धव ठाकरे यांनी बरोबर ही बाब हेरली आणि सत्तेत सहभागी असूनही विरोधी पक्षाच्या जागेची कमतरता भरून काढली. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच तर खरे सूत्र उद्धव ठाकरे अंमलात आणत होते. मग शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याची समस्या असो की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा असो, सर्वच सामाजिक बाबतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुरेपूर साथ देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे मंत्री जसे झपाट्याने काम करीत होते त्याप्रमाणेच किंबहुना कांकणभर सरस ठरण्याचा प्रयत्न सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला आणि आपल्या नेतृत्त्वाला खंबीरपणे सहकार्य करण्याचे काम केले.
पाच वर्षांत फडणवीस यांनी केवळ उद्धव यांच्या सहकार्यानेच महाराष्ट्रात जे काम उभे केले. किंबहुना विधायक, सामाजिक अधिष्ठान याचा जो आदर्श उभा केला त्यातून उद्धव ठाकरे यांनी स्वतःला राजकारणातला खरा समाजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्टी असलेला परिपक्व राजकारणी असल्याचेही दाखवून दिले. नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी वाराणसी येथे जाणे, अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरताना अहमदाबाद येथे उपस्थित राहणे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी बैठकीला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आवर्जून उपस्थित राहून आपली भूमिका मांडणे याबरोबरच अरविंद सावंतसारख्या निष्ठावंत शिवसैनिकाची मोदी सरकारमध्ये वर्णी लावणे ही महत्त्वाची पावले उचलून आपला चाणाक्षपणा आणि चाणक्यनीती दाखवून दिली.

उद्धव ठाकरे यांनी ‘वाघ एकला राजा..!’ हे शिवसेना गीत खरे करून दाखविले आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुणी काहीही म्हणत असले आणि कुणी कितीही नाकं मुरडली तरी शिवसेनेची, या प्रखर राष्ट्रवादी संघटनेची/पक्षाची भारताला गरज आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलले. शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेल्यांना पंख फुटले. भाजपच्या हट्टापायी ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आणि बरोबर जागा दाखवून दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासमवेत चर्चा केली. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे स्वीकारली.
त्यावेळेपासूनच कोरोना, पूर, महापूर, अतिवृष्टी, वादळ, अशा अनेक संकटांचा सामना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना करावा लागत आहे. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर तो जसा तडफडतो त्याच पद्धतीने भाजप तडफडत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वाचाळवीर खळखळ करीत ठाकरे यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी फडफडत आहेत. देशातील सर्वात कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तीन वेळा उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यांना योग्य ती साथ दिली आहे. परंतु हुरळून न जाता, खचून न जाता, धीरोदात्तपणे उद्धव ठाकरे अत्यंत संयमाने जबाबदारी पार पाडत आहेत.
उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबरोबरच शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचाही वाढदिवस आहे. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेने दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांचा जन्मदिवस. पण बाळासाहेबांच्या वाढदिवसात नवलकर यांचा वाढदिवस जसा झाकोळला जातो तसाच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात रामदासभाईंचा वाढदिवससुद्धा झाकोळला जातो. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याबाबतीतही तसेच आहे. अर्थात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा होणे हे ओघाने आलेच. त्याबरोबर रामदासभाईंना माझ्या शुभेच्छा!

