जे मी-मी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जमले नाही, जे आपल्या वडिलांच्या पुण्याईची शिदोरी गाठिशी असलेल्या उद्धव ठाकरे यांना जमले नाही ते शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज करून दाखवले. जे आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतरही घरी न बसता पुढच्या कार्यक्रमांसाठी रवाना झाले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तब्बल एक तास आपल्या कुटुंबियांसह गप्पा मारण्याची किमया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली.

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जेव्हाजेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांना विशेष महत्त्व दिले आहे. कधी पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे तर कधी हस्तांदोलनातूनही आत्मियता व्यक्त केली आहे. चारच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे गेले होते. याचदिवशी त्यांनी शिवसेनेला पुन्हा एनडीएत सहभागी केले. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत सहभागी होत राष्ट्रवादीलाही एनडीएत सहभागी केले. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीच्या ठिकाणी स्वागतासाठी दारावर असलेल्या मान्यवरांमध्ये एकनाथ शिंदे दिसले, अजितदादा नाहीत. इतकी जवळीक मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर साधली आहे. आज त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.

महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर त्यांनी आस्थेवाईकपणे चर्चा केली, असे शिंदे यांनी सांगितले. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्यव्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही माझी मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

