राज्य अधिस्वीकृती समिती – २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कालच मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीचीही बैठक झाली. त्यात ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राज्य अधिस्वीकृती समितीच्या सर्व म्हणजे २७ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतमोजणीत जोशी यांना १९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद जगदाळे यांना ८ मते मिळाली. मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई विभागीय समितीच्या निवडणुकीत दीपक कैतके आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक भातुसे यांना समान मते मिळाली. त्यानंतर ईश्वरी चिठ्टीने कैतके यांच्या बाजून कौल दिला.

यदु जोशी तीन दशकांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ते दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहसंपादक आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे दोन वेळेस अध्यक्षपद आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. दीपक कैतके पत्रकारितेबरोबरच मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई विभागाचे सचिव आहेत. अडचणीत सापडलेल्या रूग्णांची निस्पृह आरोग्यसेवा करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
आजच्या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती- वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

