आज जर कुणाला सांगितले की यापुढचे एक वर्ष तुम्हाला मोबाईलविना घालवायचे आहे. तर या प्रस्तावाला सहज मान्यता तर मिळणार नाहीच आणि कुणी एखाद्याने हे आजच्या जगातले ‘शिवधनुष्य’ उचललेच तर त्याचे उरलेले जीवन त्यालाच एक तर वेड्यासारखे घालवावे लागेल किंवा लोकच त्याला वेडा ठरवतील. आजच्या जगात सर्वत्र अशाच एका गोष्टीचा बोलबाला इतका वाढला आहे की, ही गोष्ट आपल्या मोबाईलमध्येही आलेली आहे. तिचे नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. बाहेर जायची गरजच नाही. तुम्हाला एक लेख लिहायचा आहे, पुस्तक लिहायचे आहे.. फक्त विषय सांगा हिला.. काही सेकंदात तुम्हाला आश्चर्यचकित करणारा लेख तुमच्या हातात नव्हे मोबाईल अथवा संगणकात उमटेल. तुम्हाला बसल्या जागी लेख मिळणार. पुस्तके बघण्याची आणि संदर्भ तपासण्याची, इतकेच काय तर काही बाबीत म्हणजे आज इंग्रजीच्या बाबतीत शुद्धलेखनसुद्धा तपासावे लागणार नाही.
तुम्ही आज अजाणतेपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेत आहात. पण ही गोष्ट आता सर्रास सगळ्या क्षेत्रात सुरु झाली आहे. आणखी एक क्षेत्र संशोधनाचे.. जे तुमच्या खऱ्या आणि मूळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असायला हवे. पण या संशोधन क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता आता शांतपणे आपली कामे करीत आहे. इतकेच नव्हे तर तिने संशोधकांना अनेक नवे वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरणारे पदार्थ शोधून दिले आहेत आणि रोगांवर उपचारही शोधले आहेत.
परदेशात सरळसरळ कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून पुस्तके लिहिण्याचा आणि ती प्रसिद्ध करण्याचा प्रकार सुरु झाला आहे आणि आपल्या देशातसुद्धा हा प्रकार सुरु झाला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी जी चर्चा सुरु झाली ती लेख महासंघासारख्या एका समूहात. प्रश्न असा होता की पारितोषिके देत असताना मूळ लेखकाने लिहिलेले पुस्तक आणि त्यानेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून लिहिलेले पुस्तक विचार करण्यासाठी आले असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेला हे पारितोषिक जाऊ शकेल. त्यात भावना नसतील असे मानले जात असले तरी अमुक एक पुस्तक लेखकाचे आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे तपासण्याची सोय आजतरी उपलब्ध नाही.
अमेरिकेतील लेखकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑथर्स गिल्ड’ यांनी यावर उपाय म्हणून यंत्राऐवजी मानवाने लिहिलेल्या पुस्तकांना “मानवी लेखकाने लिहिलेले” असे एक खास प्रान्पात्र प्रदान करण्याचा एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे लेखकांना आपले पुस्तक यंत्रनिर्मित नसून आपण स्वत: लिहिले आहे असे वाचकांना सांगता येईल. वाचकदेखील या पुस्तक खरेदीसाठी देत असलेले पैसे मानवनिर्मित मूळ कलाकृतीसाठी आहेत याची जाणीव ठेवून अशा पुस्तकांना अधिक न्याय देतील अशी आशा आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर इंग्रजी पुस्तके प्रकाशित होत असल्याने संघटनेने लेखकांना ‘ग्रामर्ली’सारखी साधनं वापरायला काही प्रमाणात परवानगी दिली आहे.