Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईस१९९८ सालची 'निळाई'...

१९९८ सालची ‘निळाई’ शेवटचीच ठरणार?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत.

आज रिपब्लिकन पक्षाचे किती वेगवेगळे पक्ष आहेत, किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून किती नेते पक्ष चालवताहेत याची मोजदाद नाही. प्रत्येक पक्षाचा वापर राष्ट्रीय पक्ष करुन घेतोय. प्रत्येकवेळी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर आली की, ऐक्याच्या गुळगुळीत बातम्या वाचायला मिळतात. “ऐक्यवादी पक्षाचे नेतृत्त्व प्रकाश आंबेडकर जर करणार असतील तर मी मंत्रीपद सोडेन,” अशी घोषणाही रामदास आठवले यांनी बऱ्याच वेळा केली. पण, आंबेडकर ऐकायला तयार नाहीत.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे म्हणून नऊ तरुणांनी आमरण उपोषण केले होते आणि त्याची परिणती म्हणून १९९८ साली रामदास आठवले उत्तर-मध्य मुंबईतून, रा. सू. गवई अमरावतीमधून, प्रा. जोगेंद्र कवाडे चिमूर मतदारसंघातून आणि प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. एकाचवेळी आंबेडकरी विचारधारेचे, किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणविणारे चार-चार खासदार निवडून येणे हा खरोखरच एक चमत्कार मतदारांनी घडवून आणला होता. पण हा आनंद क्षणिक ठरला. १९९९ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुन्हा चार खासदार चार दिशेला निघून गेले.

आज ते उपोषण करणारे नऊ तरुण कुठे आहेत याची कुणालाही कल्पना नाही. रा. सू. गवई यांचे देहावसान झाले. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी राज्यपालपदापर्यंत वाटचाल केली. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई काँग्रेससोबत आहेत, पण ते निवडणुकीच्या मैदानात नाहीत. प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ओवेसी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी वंचित आघाडी बनविली. निश्चित कुणाला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी ते धडपडताहेत हे त्यांचे त्यांनाच माहित. रामदास आठवले मोदी-फडणवीस यांच्याबरोबर महायुतीच्या माध्यमातून फड गाजवताहेत. त्र्यंबक मारुती कांबळे उर्फ टी. एम. कांबळे, समाधान नावकर, जोगेंद्र व जयदीप कवाडे यांचे पक्षही कुणाच्या अन् कुणाच्या बरोबर आहेत. आम्ही निवडून आलो नाही तरी आम्ही कुणाला तरी पाडू शकतो, अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे. आमचा प्रत्येक राष्ट्रीय पक्ष हा निव्वळ लोणच्यासारखा तोंडी लावणं म्हणून वापर करुन घेतोय, हेही कुणाच्या लक्षात येतेय का कुणास ठाऊक? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आटापिटा चाललाय. पण ते प्रत्यक्षात केव्हा येईल याचा अंदाज नाही.

सकाळी उठले की प्रत्येक नेता शाहू, फुले, आंबेडकर या नांवाची जपमाळ ओढायला सुरुवात करतो आणि काही जण संध्याकाळी आपटे, आगाशे, डहाणूकर यांच्या कट्ट्यावर जाऊन बसतात. १९९८ साली एकाचवेळी निवडून आलेले चार खासदार हा केवळ इतिहास राहणार की ही संसदेतली ‘निळाई’ भविष्यात वाढणार हे रिपब्लिकन नेत्यांवर अवलंबून आहे. रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, स्व. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख, प्रा. ज. वि. पवार आदी नेत्यांनी चर्चा करुन एक मजबूत पर्याय उभा करता येऊ शकेल. चार-दोन तुकड्यांऐवजी घसघशीत वाटा सत्ताधारी पक्षांकडून मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ कधी दाखविणार? यासाठी आंबेडकरी जनतेने रेटा लावायला काय हरकत आहे?

आठवले मोदींसोबत गेले तर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत जाण्याची तयारी केली आहे. अर्जुन डांगळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आधीच युती केली आहे. उद्धव ठाकरे अडचणीत असताना सुषमा अंधारे, अर्जुन डांगळे आणि प्रकाश आंबेडकर त्यांच्याबरोबर आहेत. असे असताना या आंबेडकरी नेत्यांना सोबत घेऊन शिवशक्ती-भीमशक्ती योग्यप्रकारे पुढे आली पाहिजे. खऱ्या अर्थाने निळाई आणि भगवा दिमाखात फडकायला हवा. केवळ प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू/वैचारिक नातू असा बोलघेवडेपणा ऐकायला बरा वाटतो. प्रत्यक्षात ना तू आणि ना मी असे होऊ नये.

रामदास आठवले यांना आंबेडकरी जनतेचा भक्कम आधार आहे, पण मतपेटीतून तो येत नाही. प्रकाश आंबेडकर बुद्धिमान नेते आहेत. त्यांच्या बुद्धिचातुर्याचा खराखुरा उपयोग व्हायला हवा. घटनेची चौकट मजबूत राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सनदशीर, कायदेशीर, घटनात्मक भारत योग्य मार्गाने वाटचाल करील तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार राहील.

Continue reading

जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरेंचे!

महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व...

सुधा चुरीः लढवय्या महिलांचे स्फूर्तिस्थान!

शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंची सतत आठवण येत होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि मी आम्ही...

मराठी आणि गुजराती साहित्याचा एक सेतू निखळला!

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहात गुजराती भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मराठी वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात...
Skip to content