Homeटॉप स्टोरीराजकीय युतीच्या निर्णयासाठी...

राजकीय युतीच्या निर्णयासाठी राज ठाकरे उद्धवजींना तंगवणार?

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचा तसेच त्यांच्या पक्षाचा ऑक्सिजन असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी इतके आतूर झाले आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढच्या वाटचालीबद्दल कोणतेही भाष्य केले नसतानाही उद्धवजी त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी अगदिक झाल्याचे चित्र काल मुंबईच्या वरळी डोममध्ये दिसून आले.

राज ठाकरे यांनी काल आयोजित केलेल्या मराठी विजय मेळाव्यात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या गळ्यात पडण्याचेच फक्त बाकी ठेवले होते. आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनंतर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे ते म्हणाले. उपस्थितांनी यावेळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ही शिवसेना आणि त्यातल्याच एका नेत्याच्या अखत्यारीत तयार झालेली मनसे यांच्या अनुयायांची मानसिकता होती. युतीसाठी उद्धव ठाकरे आतूर आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसेच मुंबई महानगर परिसरातल्या महापालिका निवडणुकीत दोघांना याचा फायदा होईल, हे राज ठाकरेही जाणतात. परंतु उद्धवजींना सर्वात जास्त रस मुंबई महापालिका जिंकण्यात आहे. मागच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्याकरीता उद्धवजींनी मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. सत्तेसाठी वाट्टेल ते.. हे उद्धवजींचे धोरण राज ठाकरेंना ठाऊक असल्यामुळेच त्यांनी पुढच्या राजकीय भूमिकेविषयी थेट भाष्य करण्याचे टाळले. माननीय बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणे होईल.. असे मोघम एक वाक्य फेकून त्यांनी हा विषय संपवला.

विषय मराठीचा होता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठीबाबत अत्यंत कडवट भूमिका होती. त्यामुळे त्यादृष्टीने राज ठाकरे यांचे हे वाक्य होते का, अशी शंकाही जाणकार उपस्थित करत होते. या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे राजकीय भाषण करत त्यांचा अजेंडा पुढे रेटतील, अशी शक्यता राज ठाकरेंना होतीच. या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून ज्या पद्धतीने होर्डिंगबाजी सुरू केली ती लक्षात घेता त्यांनी या मेळाव्यात नो झेंडा.. ओन्ली अजेंडा.. असा नारा दिला. उद्धव ठाकरेंना याची कल्पना आल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रसिद्धीला आवर घातला खरा पण शेवटचं भाषण करण्याची संधी मिळताच त्याद्वारे आपण मनसेबरोबर युती करण्यासाठी किती अगतिक आहोत हे दाखवून दिले. ते म्हणतात की, म मराठीसाठी नाही तर महापालिकेसाठी आहे. मी तर म्हणतो हे महापालिकेसाठी नाही, महाराष्ट्रासाठी आहे असे सांगत त्यांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आपण राज ठाकरेंसोबत असणार, अशी अप्रत्यक्ष ग्वाही देण्यासही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. याठिकाणी आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.

ठाकरे

व्यासपीठावर आल्यापासूनच उद्धवजी फार अस्वस्थ होते. राज ठाकरेंची गळाभेट घेतल्यानंतरसुद्धा शेजारच्या खुर्चीत बसल्यानंतर पायावर पाय टाकून तो हलवत उद्धव ठाकरे काय बोलायचं या गहन विचारात असल्याचे स्पष्ट दिसत होते. राज ठाकरे यांनी संपूर्ण भाषण मराठी या विषयाच्या अनुषंगानेच केले. हे भाषण करण्याआधी त्यांनाही उद्धव ठाकरे गळ्यात पडणार याची कल्पना होती. संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला एकही बोल लावला नाही. ना शिवसेना या विषयावर त्यांनी भाष्य केले, ना शिंदेवर टीका केली. भारतीय जनता पार्टीवर थेट टीका केली नसली तरी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इंग्रजी कुठे येते, असे म्हणत डिवचले. हिंदी सक्तीच्या विषयावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. राज आणि उद्धव यांची मुले बॉम्बे स्कॉटीश शाळेत शिकल्यावरून फडणवीसांनी केलेली टीका राज यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेण्यावरून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

या मेळाव्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आता दोन भाऊ एकत्र आले आहेत. आता दोघांनी मिळून एकच पक्ष चालवावा. अनिल परब यांनी त्याला उत्तर देताना मुनगंटीवार यांच्या सल्ल्यानुसार राजकारण चालत नाही असे सांगून हे दोन्ही भाऊ आपापले पक्ष विसर्जीत करण्यासाठी तयार होणार नाहीत याचे सूतोवाच केले. एकंदरीत पाहिलं तर ठाकरे या आडनावाचा ब्रँड म्हणून वापर करण्यासाठी भाजपा तसेच शिवसेना प्रयत्नशील आहे. उद्धव ठाकरे, ठाकरे आडनाव फक्त आपल्याकडेच राहवे याकरीता प्रयत्नशील आहेत. पण सध्याचे चित्र पाहता ठाकरे नावाचा ब्रँड एकनाथ शिंदेंकडे जाऊ शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत. राज ठाकरे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत जाणार नाहीत, त्याचप्रमाणे ते महायुतीतही सहभागी होणार नाहीत. किंबहुना महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूचे नेते त्यांना आपल्या गठबंधनात घेण्यासाठी तयारही नाहीत. त्यांच्याकडून ठाकरे या आडनावाचा आपल्या पक्षाला कसा फायदा होईल याचाच विचार आहे. राज ठाकरेंनाही याची कल्पना आहे. त्यामुळे पुढचे पाऊल टाकण्याआधी ते पन्नासवेळा विचार करतील हे मात्र निश्चित.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content