Homeन्यूज अँड व्ह्यूजकोकणकन्या महापौर रितू...

कोकणकन्या महापौर रितू तावडे खरंच बांगलादेशींना हुसकावणार?

गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर गावी जन्मलेल्या रितू तावडे मुंबईच्या बिनविरोध महापौर झाल्या आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे संजय घाडी उपमहापौर झाले. आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि महायुतीची सत्ता स्थापन झाली. अतिशय प्रतिष्ठेचे व सन्मानाचे मुंबईचे महापौरपद देवाभाऊंनी लाडक्या बहिणीला दिले, अशा शब्दांत नूतन महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मुंबईच्या विकासासाठी व मुंबई सुंदर बनविण्यासाठी आपले सरकार सर्वकाही मदत महापालिकेला देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महापौर व उपमहापौर हे दोन्ही महायुतीचे शिलेदार अनुभवी व कार्यक्षम आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रितू तावडे व संजय घाडी यांचा गौरव केला. आमची मालवणी भगिनी रितू तावडे हिची मुंबयच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल तिचा कौतुक असा. मालवणी माणूस जबाबदारीत खयच कमी पडूचो नाय आणि मुंबयचो विकास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होवचो रवणार… अशा शुभेच्छा मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.

रितू तावडे, या मुंबईच्या पूर्व उपनगरांतील घाटकोपरमधून गुजरातीबहुल मतदारसंघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. गुजराती मतदार भाजपाची व्होटबँक आहे. रितू तावडे यांना महापौरपद देऊन भाजपाने गुजराती मतदारांचा आदर केलाच पण अस्सल मराठी चेहरा महापौरपदावर बसवला. मुंबईचे महापौरपद कोकणकन्येला मिळाल्याने मुंबईतील कोकणी माणूसही सुखावला. निवडणूक प्रचारात मुंबईचा महापौर खान होणार की उत्तर भारतीय होणार असा  वाद रंगला होता. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल असे मंत्री आशिष शेलार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी म्हटले होते. रितू तावडे या मूळच्या काँग्रेस पक्षातल्या. त्या चौदा वर्षांपूर्वी भाजपामधे आल्या. तीन दिवसांपूर्वी महापौरपदासाठी भाजपाच्या नगरसेवकांच्या बैठकीत रितू तावडे यांची निवड झाली, तेव्हा काँग्रेसच्या रितू तावडे भाजपाच्या महापौरपदासाठी, अशी टीकाही झाली होती. रितू तावडे यांनी मुंबई महिला मोर्चा, ईशान्य मुंबई महिला मोर्चा, प्रदेश महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजिका अशा पदांवर काम केले आहे. गेल्यावेळी भाजपाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर त्यांनी महापालिका शिक्षण समितीवर अध्यक्ष म्हणूनही काम केले. तसेच उपाध्यक्ष, स्थापत्य समिती, उपनगरे आणि महिला आर्थिक विकास महामंडळावर संचालक म्हणून काम केले आहे.

महापौर

एसवाय बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या ५३ वर्षांच्या रितू तावडे, या जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. कपडे किंवा साड्यांच्या शोरूमच्या बाहेर कमी कपड्यात किंवा अंत:वस्त्र परिधान केलेल पुतळे दिसतात, त्याविरोधात त्यांनी आंदोलन केले होते. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामावर लहान मुलांचा वापर केला जातो म्हणून ठेकेदारांच्या विरोधातही त्यांनी आंदोलन केले होते. अदानी वीज कंपनीच्या विरोधात वीजदरवाढीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले होते. कोविड काळात ५२ वैद्यकीय तपासणी केंद्रांचे त्यांनी आयोजन केले व विनामूल्य औषधोपचार दिले.

मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीत पक्षात शीतल गंभीर, राजश्री शिरवाडकर, आशा मराठे अशी नावे होती. पण रितू तावडे यांनी बाजी मारली. पंचाहत्तर हजार कोटींचे बजेट असले्ल्या महापालिकेच्या महापौर म्हणून मुंबईच्या प्रथम नागरीक असा त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे. रितू तावडे या मुंबईच्या आठव्या महिला महापौर आहेत व भाजपाच्या दुसऱ्या महापौर आहेत. १९८१-८२मध्ये भाजपाचे प्रभाकर पै मुंबईचे महापौर होते. यापूर्वी १९५५-५६ सुलोचना मोदी, १९९४-९५ डॉ. निर्मला सामंत प्रभावळकर (काँग्रेस), १९९७-९८ विशाखा राऊत (शिवसेना), २००७-०९ डॉ. शुभा राऊळ (शिवसेना), २००९-१२ श्रद्धा जाधव (शिवसेना), २०१४ ते १७ स्नेहल आंबेकर (शिवसेना), २०१९ ते २२ किशोरी पेडणेकर (शिवसेना) या महिला महापौर होत्या. मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले आहे. पोलीस, महापालिका व सरकार यांच्या मदतीनेच त्यांना ही मोहीम राबवावी लागेल. सर्व उपनगरी रेल्वेस्थानकाबाहेर वर्षानुवर्षे असलेला हजारो अनधिकृत फेरिवाल्यांचा घट्ट विळखा त्या कसा हटवणार? महापालिकेने उभारलेले व शेकडो कोटी  सुशोभिकरणावर खर्च केलेले पदपद मोकळा श्वास कधी घेणार? केंद्रात, राज्यात व महापालिकेत असे भाजपाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. मुंबईतील बांगलादेशींना शोधून काढून हाकलून देणे आता तरी शक्य होईल का?

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

आसाममध्ये होणार भाजपाची हॅटट्रीक?

 इशान्येकडील राज्यात आसाममधील सत्तासंघर्ष  नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. आसामध्ये येत्या नऊ एप्रिल या एकाच दिवशी १२६ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी अटतटीची लढत बघायला मिळेल असे वातावरण आहे.  हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातून भाजपा पुन्हा एकदा सत्ता संपादन...

विधिमंडळाच्या अधिवेशनाचे फलित- खचलेले विरोधक तर हतबल मित्रपक्ष!

राज्याच्या पाच आठवडे चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्यक्षात वीस दिवसच कामकाज झाले. अधिवेशनात विरोधी पक्षाकडून एकाही विषयावर सरकारला धारेवर धरले गेले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यtच्या घटनेवर चर्चा घडवावी यासाठी विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले नाही. कलंकीत मंत्र्यांना...

सुशांत सिंगसाठी बिहारमध्ये एफआयआर! मात्र, अजितदादांचे वावडे!!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. अधिवेशन पाच आठवडे. पण, प्रत्यक्षात वीस बैठका झाल्या. या काळात १९७ तास ३७ मिनिटे कामकाज झाले. पण, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूविषयी चर्चा झाली नाही. विरोधी पक्षांनी अजितदादांच्या...
Skip to content