ठाणे रेल्वेस्थानक परिसराची दुर्दशा कधीच संपणार नाही का? हा प्रश्न सतत विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का? असा प्रश्न मला माझे अनेक मित्र विचारतात. मी त्यांना एकच सांगतो की दुर्लक्ष करायला जसा रेल्वे प्रशासनाला कंटाळा येताना दिसत नाही मग मी कशाला कंटाळू? गेल्या आठवड्यातील रेल्वे महाव्यवस्थापकासंबंधीच्या लिखाणामुळे प्रशासनाला बऱ्याच मिरच्या झोंबल्या असे समजले. त्यांनी बोरीबंदरहून काही भेटींचा तपशील मागवला. परंतु त्यांच्या हाती ठोस असे काहीच न लागल्याने सर्वांचीच निराशा झाली.
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील ओला, उबरचा वाद पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर स्थानक परिसराला भेट दिली असता प्री पेड टॅक्सी बुकिंगच्या केबिनवजा टपरीवर जाऊन पाहिले असता त्या टपरीला चक्क गंजलेले टाळे लागलेले दिसले. इतकेच नव्हे तर हे टाळे गेल्या दोन वर्षांत तरी उघडलेले दिसले नाही, असे तेथील पॉलिशवाल्याने सांगितले. जर या टपरीचा वापरच होत नाही तर ती अद्याप उठवण्यात का आली नाही? की येथे कुणाला नवीन दुकानदारी सुरू करायची आहे काय, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
या परीसरात टॅक्सीथांब्याच्या जवळ एका नगरसेवकाच्या कृपेने पाणपोई निर्माण करण्यात आलेली आहे. कल्पना चांगली आहे. पण आता ही पाणपोई इतकी कळकट झालेली आहे की संबंधित नगरसेवकही येथे पाणी पिणार नाही. वरपासून खालपर्यंत काळपटपणा गुणागुणाने वाढत गेलेला दिसतो आहे. या पाणपोईच्या शेजारीच डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वाचनालय उघडण्यात आले होते व ते अजूनही आहे. मात्र तेथे वाचण्यासाठी ना वर्तमानपत्रे आहेत ना पुस्तके.. तेथे आहे फक्त मोडकळीस आलेले सर्व सामान. दिवंगत वसंत डावखरे आमचे मित्र होते. वाचनालयाची अवस्था पाहून त्यांच्या आत्म्यास खचितच अतीव दुःख वा वेदना होतील याची खात्री आहे.

ठाणे स्थानकाच्या वाटेवर सॅटीस पुलाच्या एका खांबावर या हद्दीच्या पुढे फेरीवाल्यांना मनाई आहे असा ठळक बोर्ड आढळतो. पण या दिसण्याव्यतिरिक्त तेथे काहीच कारवाई दिसलेली नाही. गर्दीच्या वेळी महावीर दुकानाच्या कॉर्नरवर एक फेरीवाला ठाण मांडून बसलेला नाही परंतु उभा मात्र असतो. त्याच्यासमोर केक मांडलेला चौकोनी लाकडाचा एक ट्रेवजा पाट मांडलेला असतो. ऐनगर्दीच्या वेळी जाण्या-येण्याला त्याचा त्रासच होत असतो. त्याच्या पाट्याला कोणाचा धक्का लागला तर तो उलट देखनेको होता नहीं क्या? असा उर्मट सवाल प्रवाशांना विचारत असतो. खरे तर स्थानक परिसरात इतकी विविध प्रकारची दुकाने असताना त्याची गरजच काय असा प्रश्न आपल्याला पडत असला तरी प्रशासनाला मात्र आतापर्यंत पडलेला दिसत नाही. तीच गोष्ट त्या पदपथावरील इतर फेरीवाल्यांची आहे. येथून पुढे गेलो की संध्याकाळी रिक्षावाले प्रवासी मिळवण्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंबलत असतात. त्याबरोबरच त्यांची वरात स्थानकाकडे जाणारा रस्ता अडवते. दररोज संध्याकाळी सुमारे चार तास हा गोंधळ सुरू असतो. संतापजनक बाब म्हणजे या रस्ता अडवण्यापासून वाहतूक पोलिसांची चौकी दोन पावलांवर आहे. शिवाय तेथे अंमलदारही असतात. पण पुढे काहीही होत नाही.
मागे एकदा उल्लेख केल्याप्रमाणे एकेका फेरीवाल्याबरोबर किमान पाच-सहा माणसे तरी असतातच. म्हणजे काही गडबड झाली की फेरीवाल्यांचे हजारो भाऊबंद विनासायास गलका वा हुल्लड करायला आयते तयारच असतात. ठाणे महापालिका आयुक्त बांगर यांनी एकदा आपला लवाजमा बरोबर न घेता अचानक स्थानक परिसराला भेट देणे गरजेचेच आहे, तसेच त्यांनी ठाणे पालिकेची परिवहन सेवा देणारी टीएमटीची ही झाडाझडती घेणे आवश्यक आहे. टीएमटी ही स्वतंत्र असली तरी ती महापालिकेचीच सेवा असल्याने पुलावर गाड्या कशा लागतात, कशा सोडल्या जातात व त्यापेक्षाही प्रवाशांना किती वेळ रांगेत उभे राहवे लागते याचा काहीसा अंदाज तरी लागेल. आयुक्तांनी येथेच थांबू नये तर वेळ काढून टीएमटीच्या आगारांनाही भेटी देऊन तेथे कशाप्रकारे कामे केली जातात हे पाहवे. गाड्यांची देखभाल करणारे कर्मचारी, कामगार काय लायकीची देखभाल करतात हे त्यांना याची डोळा… पाहता येईल.
शेवटी एक अतिशय हास्यास्पद पाटी… तीही स्थानक परिसराच्या दर्शनी भागात. म्हणे फेरीवाल्यांना मनाई!! या पाटीच्या नाकाखालीच फेरीवाल्यांचा सुळसुळाट असतो, हे ठाणेकर नेहमीच पाहत आलेले आहेत. लवकरच ठाणे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ठाणेकरांच्या दृष्टीने आपल्या विभागाप्रमाणेच स्थानकाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोज याच्याशी पंगा घ्यावा लागतो, म्हणूनच केवळ ठाणे सुंदरचा नारा नको. आमचे ठाणे स्थानकही आधी चमकवा ही मागणी ठाणेकरांनी लावून धरली पाहिजे. असो. ठाणे रेल्वेस्थानक परिसराचे रडगाणे बरेच गायले आहे. यात क्रांतिकारी बदल होणार नाही याची जाणीव आहे. मात्र स्थानक परिसरात जाणे सुखावह होईल इतकी काळजी प्रशासनाने घेतली तरी ठाणेकर दुवा देतील!!

