“The war on drugs is identical to the prohibition of alcohols. All you are doing is making criminals rich and free to fly” गेल्या सुमारे दोन अडीच महिन्यांपासून म्हणजे पुणे येथील ड्रगमाफिया ललित याच्या पलायनानंतर जवळजवळ राज्यभर अंमली पदार्थाविरोधी मोठी मोहीम राबवली जात असतानाही नववर्षाच्या पूर्वसंध्येस ठाणे मुक्कामी रेव्ह पार्टीवर धाड घालून 90च्यावर नशेबाजांना पोलिसांनी रंगेहात पकडल्यावर वरील वाक्य आठवणे अपरिहार्यच होते.
पोलीस वा राज्ययंत्रणेला दोष देण्याचा प्रश्न नाही. परंतु आपल्या सडलेल्या व्यवस्थेमुळे असे वारंवार घडत असताना असहाय्यपणे पाहणे नशिबी आल्याचे दुःख होत आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नशाखोरांना मुद्देमालासह पकडल्याने पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला जाईलही! परंतु ठाणे शहर आणि आसपासच्या भागात गेल्या 15/20 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि रोकड रक्कम जप्त होत असताना कासारवडवली पोलीसठाण्यापासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर (गाडी वा बाईकने गेल्यास अवघी पाच/सात मिनिटे)असलेल्या खाडीकिनारी तेही फ्लॅश लाईट आणि कर्णकर्कश डीजेच्या ‘झूम बराबर’ आवाजात… यह कुछ हजम नहीं हो रहा है..
बरे आवाज आणि लाईटचे बाजूला ठेवू. खाडीकिनाऱ्याला भेट दिली असता तेथे दोन प्रचंड मोठे मंडप आणि एक अर्धा मंडप अस्तव्यस्त पडलेले दिसत होते. हे सर्व मंडप काळ्या रंगाच्या ताडपत्र्यांनी आच्छादलेले होते. आजूबाजूला फ्लॅश लाईट असले तरी मंडपात रंगीत मंद प्रकाशाची सोय केलेली होती जेणेकरून प्रत्येक महिला अप्सराच वाटावी व पुरुष इंद्रदेव!! (हल्लीच्या भाषेत तो ‘फील’ नको का?) आणि मोठाले संगीत नसले तर अप्सरा नाचणार कशा? आणि इंद्रदेव तिची अदा पाहणार तरी कशी? याचाच अर्थ छोट्याशा डान्स बारची प्रतिकृतीच निर्माण केली गेली होती. समोर मंचही साकरण्यात आला होता. गोल टेबले.. त्याच्याभोवती रेलून बसता येईल अशा खुर्च्या.. (जेणे करून अदा पाहण्यास अडचण निर्माण होऊ नये)

इतकेच नव्हे तर समारंभस्थळी नीट जाता यावे म्हणून खाडीकिनारी झटपट कच्चा रस्ताही तयार केला गेला. मंडपाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तर नुकताच तयार केलेला कच्चा रस्ता डोळ्यात येत होता. कसारवडवली बसथांब्याला उतरून समोरच्या सिग्नलपासून खालील बाजूस रिक्षाने गेल्यास 10 मिनिटांत खाडीकिनारी पोचतो. मध्ये आगरी समाजमंदिर लागते. नंतर एका अरुंद बोळातून पुढे गेल्यास खाडी जवळ आल्याचा अंदाज करता येतो. खरेतर ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाण्याच्या महापालिका आयुक्तांनी या परिसराला एकदा जरूर भेट द्यावी कारण खाडीकिनारा हा जिल्हाधिकारी महोदयांचा तर रस्तेबांधणी हा आयुक्तांचा विषय असल्याने रस्त्याची कशी ‘काशी’ करण्यात आलेली आहे ते प्रत्यक्षच पाहता येईल.
आता पुन्हा पार्टीकडे.. तर इतका जामानिमा असलेली मोठ्या पार्टीची जमवाजमव करण्यात किमान आठ दिवस तर गेलेच असतील. इतक्या खुर्च्या-टेबले, लाईटव्यवस्था वगैरे करण्यास काही दिवस तर लागले असणारच. मग हे सर्व कासारवडवली पोलिसांसमोर घडत असताना पोलिसांनी काय डोळे बंद करून घेतले होते, की ते झोपलेले होते? याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. तेथे एक रेस्ट्रो बारही आहे. निदान तशी पाटी तरी आहे. हा बार कळीचा मुद्दा आहे. तो अधिकृत आहे की नाही येथपासून शंका सुरू होतात. तेथील अनेक मजुरांनी या बारमध्ये शुक्रवार, शनिवारी बराच धिंगाणा चालतो, असे सांगितले.
पोलिसांनी या पार्टीत काय काय सापडले ते तपशीलाने सांगितलेले आहे. त्याचा पुनःरूच्चार करत नाही. ललित प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचे काही साथीदार ठाण्याच्या भीमनगरमध्ये राहण्यास होते अशी माहिती पोलिसांनीच दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचेच असल्याने त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच कुणी तर हे करत तर नाही ना याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. हे संभवत नाही तरीही चौकशी झालेली बरी! जाता जाता “I have never had problem with drugs. I have had problem with the police” हे वचन खोटे पाडायचे असल्यास महाराष्ट्र पोलीस, मुंबई आणि ठाणे पोलिसांनी एकत्र काम करून ड्रग माफियांना मुहतोड जबाब देणे गरजेचे आहे.

