Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीवैभव चेंबर्सबाहेर अधिकाऱ्यांच्या...

वैभव चेंबर्सबाहेर अधिकाऱ्यांच्या रांगा का लागतात?

राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून होणारा भ्रष्टाचार फक्त मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालतो असे मानण्याचे काही कारण नाही. तसे असते तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयटी इमारतीसमोरील वैभव चेंबर्समध्ये अधिकाऱ्यांच्या रांगा का लागतात, त्यांना का जावे लागते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

हे सरदेसाई कोण?

राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आदी विषयांवर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. या सरकारच्या काळात राजरोसपणे भ्रष्टाचार होत आहे. हे सरदेसाई कोण आहेत? वरूनच आलेले हे सरदेसाई आहेत. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था कशाला लागते? त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे? अधिकाऱ्यांना त्यांचे फोन का जातात? कंत्राटदारांना, ठेकेदारांना ते का फोन करतात, याची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे ते म्हणाले.

रिझवी कॉलेजजवळ गाड्यांच्या रांगा का लागतात?

जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातून तर भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघाले आहेत. यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या ब्लँकेट, फॅन आदी वस्तूंचा पुरवठा कोणाच्या इशाऱ्यावरून होतो? वांद्र्याच्या कार्टर रोडवरील रिझवी कॉलेजच्या बाजूला असलेल्या बंगल्यावर गाड्यांच्या रांगा का लागतात? नाईटलाईफ गँग येथे कार्यरत का राहते? हा दिनो मोरिया कोण आहे? दोन-चार चित्रपट त्याचे निघाले. हा सरकारचा जावई आहे का? मुंबई महापालिका, सरकारचे अधिकार याला कोणी दिले? हा कोणाचा मित्र आहे? चेतन कदम, आदित्य झव्हेरी, गोम्स यांचा कोविड सेंटरशी काय संबंध? तेथे काय लागते हे ठरवणारे हे कोण, असा सवाल राणे यांनी केला.

५ आणि ८ हे आकडे फार आवडीचे!

पाच आणि आठ हे आकडे यांच्या जास्त आवडीचे आहेत. ते दिवस आहेत, तास आहेत की टक्के आहेत, हे आपण ठरवा. तिथे सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बेडच्या बाजूला डेडबॉडी ठेवली जाते. टेंडर काढायचे नाही. राजरोस चोरी करायची हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. धारावी मॉडेलचे सरकार कौतुक करते. याचे श्रेय मुंबई महापालिकेला अजिबात नाही. त्यांना आयुक्त बदलावा लागला. हे सारे श्रेय आरएसएससारख्या स्वयंसेवी संस्थांचे आहे. त्यांनी काम केले म्हणून हे झाले. आम्हीही मुंबईत राहतो. आम्हालाही समजते. आम्ही काही लंडन, अमेरिकेत राहत नाही, असेही ते म्हणाले.

हा तर परिवार मंत्री!

सरकारने एक काम करावे. या राज्याला परिवहन मंत्री द्यावा. आमच्याकडे परिवहन मंत्रीच नाही. परिवार मंत्री आहे. एकाच परिवारामागे तो घुटमळत असतो. जरा कलानगरच्या पलीकडेही बघा, आम्हीही आहोत. एसटी डेपोकडे बघा. तेथील कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे बघा. काही नाही. आज आमच्या चित्रा वाघ यांच्या वाहनामागे गाडी लावून पाठलाग केला जातो. आमदारांना धमक्या दिल्या जातात. हे प्रकार वाढले तर भाजपाचे कार्यकर्तेही उद्या कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतील. आम्हीही ३९ वर्षे मुंबईत आहोत. बाळासाहेबांची शिकवण आम्हालाही आहे. आले अंगावर तर शिंगावर घेण्याची ताकद आहे आमच्यात. हल्ली कोणी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर हे त्याचे जुने उकरून काढतात. या गोष्टी बंद करा. आम्हीही बऱ्याच गोष्टी उकरून काढू शकतो. मग सोनू निगमही निघेल. तेव्हा मग बोलू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

वर्षाताई, याचे ट्रेनिंग चालू करा

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर १२ साऊंड क्लिप वायरल झाल्या. १२ दिवस हे बिळात का होते? शक्तीप्रदर्शन कोणाला घाबरावयला केले? बंजारा समाजाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी चालविला? अशामुळे यांची हिम्मत वाढते. गेल्या एक-दीड वर्षांत येथे एक कवच तयार झाले आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याचे काम केले जात आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांचे नाव चिठ्ठीत लिहिले. गुन्हा दाखल झाला का? पूजा चव्हाणच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का? आठ फेब्रुवारी २०२० रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला. ती ज्या पार्टीत होती ती कोणी आयोजित केली होती? तिचा होणारा पती रोहन रॉय, तिचे आई-वडिल कोठे गायब झाले, पत्ता नाही. हे कसे गायब करायचे याचे ट्रेनिंग बहुदा यांना मिळाले आहे. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की, या ट्रेनिंगचेही क्लासेस चालू करा. पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख टिकवायची असेल तर हे थांबले पाहिजे. नाहीतर या अत्याचाराविरूद्ध जनता रस्त्यावर उतरेल, असेही नितेश राणे म्हणाले. वनखात्याची जमीन लाटत त्यावर मुख्यमंत्र्यांचे कुटूंबच घरे बांधत असतील तर अपेक्षा कोणाकडून ठेवायची, असा सवालही त्यांनी केला.

कलानगरमध्ये फोन हॅकिंग

येथे सायबर गुन्हेही वाढले आहेत. कोण काय बोलते हे हॅक करण्यासाठी कलानगरमध्ये पथक बसवले गेले आहे. कोण काय बोलतो याची माहिती घेतली जात आहे. याचीही चौकशी करा, अशी मागणी राणे यांनी केली.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content