पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व आरवली येथे जाण्याचा योग आला. जोरदार मस्त पाऊस आणि हिरव्यागर्द निसर्गाने वेडावलोच होतो. या दोन्ही ठिकाणी आणि आसपास काय नजरेस पडले ते यथावकाश सर्वांना सांगेनच. पण आज मात्र आरवली गावापासून अवघ्या दीड-दोन किलोमीटरवर असलेल्या शिरोड्याला जाण्याचा योग आला. योग आला म्हणण्यापेक्षा मला तेथे जायचेच होते. कारण अर्थातच सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे स्मारक!! शालेय व महाविद्यालयीन जीवनात सहित्यवाचनाची आवड निर्माण करण्यात खांडेकर यांचा मोठा वाटा आहे. आजच्या युगात खांडेकर आवडणे हे कदाचित कुचेष्टेचा विषय असेलही. परंतु मला मात्र त्यांचे आकर्षण आजही वाटत आहे. त्यांची काही मते पटत नाहीत हे मान्य करूनही मराठी साहित्य दालनात त्यांना मानाचे स्थान आहे, हे नाकारता येत नाही. शिवाय खांडेकर यांच्या ‘ययाति’ कादंबरीस १९७६मध्ये साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले आहे.
शिरोडा या गावास त्यांनी आपली कर्मभूमी मानली होती. शिरोडा येथे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘मिठाचा सत्याग्रह’ ही केलेला होता तर अशा या शिरोड्यात ट्युटोरियल हायस्कूलमध्ये त्यांनी अनेक वर्षे शिकवले. काही काळ ते या शाळेचे मुख्याध्यापकही होते. अशा या शाळेत त्यांचे संग्रहालय नसते तर नवल! संग्रहालय नीटनेटके आहे. कमालीचे स्वच्छ आहे. शाळेच्या एका वर्गात केलेल्या या संग्रहालयात जाताना पादत्राणे काढूनच आत जावे लागते. खांडेकरांच्या आयुष्यातील प्रमूख घटना तसेच त्यांचा साहित्यिक प्रवास निटकेपणाने मांडून ठेवलेला आहे. त्यावेळच्या शाळेच्या मस्टरवरील सह्याही जपून ठेवलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर ज्या खुर्चीवर बसून ते लिखाण करत असत त्याची प्रतिकृतीही मांडून ठेवलेली आहे. पहिल्या चित्रपटाच्या लेखनाचा उल्लेख यात दिसतो.
इतके सर्व चांगले असताना खांडेकर यांचा पुतळा ज्या तऱ्हेने ठेवण्यात आलेला आहे तो प्रकार मात्र खचितच नाराज करणारा आहे. खरे तर पुतळा सुंदर आहे. परंतु ज्या साहित्यिकाने आयुष्यभर बंदिवासाला विरोध केला, त्याचाच पुतळा गजाआड केल्यासारखा ठेवलेला आढळला. त्याची कारणेही काही शिक्षकांनी सांगितली. भटक्या कुत्र्यांमुळे पुतळ्याच्या अवतीभोवती असलेली वाळू सतत विखुरली जाते, म्हणून ही जाळी बसवली असे सांगण्यात आले. भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे हे मान्य केले तरीसुद्धा स्मारक समितीने त्या पुतळ्यासमोर पारदर्शक काच वा तस्मम काही तरी उभारले पाहिजे होते की जेणेकरुन त्या सौम्य प्रकृतीच्या सहित्यकाराचा पाहणाऱ्यावर एक चांगला परिणाम झाला असता. या संग्रहालयातून परतत असताना आम्ही याबाबत जरूर विचार करू असे आश्वासन मिळाले. खरे तर मराठी साहित्य महामंडळ वा कोकण मराठी साहित्य परिषदेने कुणाचीही वाट न पाहता याकामी पुढाकार घ्यावा असे सुचवावेसे वाटते.

खांडेकर संग्रहालय पाहिल्यानंतर त्यांचे घर पाहण्याची इच्छा झाली. हे नैसर्गिकच होते. परंतु काळाच्या ओघात खांडेकरांच्या एका छोट्या खोलीचे आता मोठे घर झाले आहे. पूर्वीही हे घरच होते. येथील एका छोट्या खोलीत ते राहत असत, असे आता त्या घरात राहणाऱ्या खांडेकरांनी सांगितले. (यांचे वि. स. यांच्याशी नाते नाही, आडनावबंधू) त्यानंतर खांडेकरांच्या स्मरणार्थ उभारल्या गेलेल्या खुर्चीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पावसाने हा शोध काही पूर्ण होऊ दिला नाही. गावकऱ्यांनी मात्र अशी खुर्ची नसल्याचे सांगितले. तर काहींनी ती आता जीर्ण झाली असल्याने ग्रामपंचायतीनेच हलवली असे स्पष्ट केले. वि. स. खांडेकर यांच्या विधानाने या लेखाचा समारोप करतो…
“मी चित्रपट लिहितो ते पोटासाठी, लघुनिबंध व रुपककथा लिहितो त्या स्वतःच्या आनंदासाठी, आणि टीका, निबंध, लघुकथा व कादंबऱ्या लिहितो, त्या कलेच्या द्वारे जीवनाच्या सेवा करण्याच्या तत्त्वावर माझी श्रद्धा आहे म्हणून..”
जाता जाता एक आठवले त्याचा उल्लेख जरूर करावासा वाटतो. म्हणूनच हल्लीच्या राजकीय परिस्थितीवर अनेकांना प्रख्यात साहित्यिक स्टीफन झवाईंग आणि अर्णस्ट टोलर यांची नावे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सतत ऐकू येत असतात. या दोघांचाही उल्लेख पद्मभूषण साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीच सर्वप्रथम १९४२च्या आसपास केलेला होता…

