तुम्हाला संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचेच आहे तर मग ते नेमके गणपतीमध्ये कशाला? इतर वेळेलाही तुम्हाला ते बोलवता येऊ शकते, असे मत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना केले.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. सध्याचे केंद्र सरकार हिंदू द्वेष्टे आहे. सरकारला माहित आहे की, महाराष्ट्रात गणपतीच्या काळात घराघरात उत्सव असतो. कोकणी माणूस तर यानिमित्ताने आपापल्या गावी असतो. सर्व आमदार, खासदार त्यांच्या-त्यांच्या गावी असतात. मग अशावेळी संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ यावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन जर बोलवत असाल तर मग लोकसभा आणि विद्यापीठांच्या निवडणुका एकाचवेळी घेणार का, हेही सरकारने स्पष्ट करायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आजच्या बैठकीत आम्ही इंडिया आघाडीचा लोगो तयार करण्यासाठी लोकांच्या सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे दोन-तीन पर्याय तयार आहेत. लोकांच्या सूचना आल्यानंतर या पर्यायांचा त्या दृष्टिकोनातून विचार करून लोगोला अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
परिवारवादाबद्दल तुम्ही बोलता. भारत हा परिवार नाही का? ‘सबका साथ, सबका विकास’ हे निवडणूक आल्यावरच तुम्हाला कसं आठवतं? नंतर सर्वांना लाथ… निवडणूक आली की सूट, आणि नंतर लूट… हे या हुकूमशाही सरकारचे धोरण आहे. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध, या मित्रपरिवाराविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मणिपूर जळत होता तेव्हा विशेष अधिवेशन का नाही घेतलं? जेव्हा देशातली जनता नोटबंदीने हैराण झाली होती तेव्हा या विषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन का बोलवण्यात आले नाही?
आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, सध्याचे केंद्रातले मोदी सरकार हे स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट आणि सर्वात अहंकारी सरकार आहे. ही 26, 27, 28 पक्षांची आघाडी नाही तर ती देशातल्या 140 कोटी जनतेची आघाडी आहे. मोठ्या संख्येने या आघाडीत लोक सहभागी होत आहेत आणि 21व्या शतकातला भारत कसा असावा याचा निर्णय घेणार आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव म्हणाले की, चंद्रावर यान पाठवणाऱ्या इस्रोला माझे आवाहन आहे की, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्यावर पाठवून द्यावे. परदेशातून काळा पैसा आणण्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा सिद्ध शाबित झाला आहे.
इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीत चार प्रमुख निर्णय घेण्यात आले. शक्य त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीला आघाडीतर्फे एकच उमेदवार देण्यात यावा. जुडेगा भारत, जितेगा भारत… या घोषवाक्यानुसार ठिकठिकाणी आघाडीच्या जाहीर सभा व्हाव्यात. जागावाटप वरच्या पातळीवर न करता ते खालच्या पातळीवर करावे आणि त्याला लवकरात लवकर सुरुवात करावी, या मुद्द्यांचा यात समावेश आहे. एका समन्वय समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. त्यात महाराष्ट्राकडून शरद पवार, संजय राऊत, अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, भालचंद्र कांगो, प्रियंका चतुर्वेदी, वंदना चव्हाण आणि अरविंद सावंत यांचा समावेश आहे.

